ते लोक

“लोचा”
मी जेव्हा प्लांट मध्ये काम करत असे त्यावेळची ही कथा आहे.
परब माझ्या शिफ्टमध्ये काम करत असे. माझे आणि परबचे एक अतूट नाते होते. परब जो एकदा माझ्या शिफ्ट मध्ये आला त्यानंतर तो कधीही दुसऱ्या शिफ्टमध्ये गेला नाही. कसं असतना कि ऑपरेटर आणि शिफ्ट इंजिनिअर हे अधून मधून बदलत असतात. सर्व साधारणपणे कोण ऑपरेटर कामचुकार आहे, कोण शिफ्टमध्ये झोपा काढतो, कोण ड्युटी चुकवून संडासात जाऊन झोपतो आणि कुणाची अक्कल गुढग्यात आहे ह्याची शिफ्ट इनचार्जला चांगली कल्पना असते. पण आमचा हा प्लांट असा डिझाईन केला होता कि प्लांटच्या कुठल्याही कोपऱ्यात माशी जरी शिंकली तरी सेन्ट्रल कंट्रोलरूम मध्ये अलार्म येणार. ही थोडी अतिशयोक्ति झाली म्हणा. सांगायचा मुद्दा हा कि जुन्या प्लांट्स मध्ये ऑपरेटरहा महत्वाचा दुवा असे, तसा तो ह्या प्लांटमध्ये नव्हता. म्हणून कोणी शिफ्ट इंजिनिअर ऑपरेटरबद्दल आग्रही नसत. कुणीही चालेल असा अटिट्युड असे.
कुणीही चालेल पण हा परब नको ह्याबद्दल, का कुणास ठाव, सगळ्यांचे एकमत होते. माझा अपवाद सोडून. परबबद्दल लोकांना एव्हढी अनामिक घृणा का वाटायची हे कोडे मला कधी सुटले नाही. नंतर हळू हळू मला समजायला लागले की लोक घृणा करत नाहीयेत तर ते परबला घाबरून आहेत. त्या अनामिक भीतीचे कारणही मला कधी समजले नाही. मला परबविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे हे सगळ्या सहकाऱ्यांना माहित होते, म्हणूनच कि काय परबचा विषय निघाला कि लोक चटकन  सांधा बदलत असत.
तर हा परब प्रथम माझ्या शिफ्टमध्ये आला त्याला आता जवळ जवळ दोन वर्षं झाली. त्यावेळी मला परबबद्दल काही घेणं देणं नव्हतं. मी जेव्हा राउंडवर होतो तेव्हा टर्बाईन समोर खुर्ची टाकून डोळे मिटून औपरेटर बसला होता. हे जरा नवीन होत. शिफ्ट सुरु होऊन एक तास देखील झाला नव्हता. आणि हा पठ्ठ्या  झोपला पण. मी त्याच्या खांद्याला हलकासा स्पर्श केला. तो खडबडून उठला. “येस्स सर?”

“जागा झालास? छान. लोंगशीट घेऊन माझ्या केबिनमध्ये ये.”
“सर मी झोपलो नव्हतो...”
मी राउंड घेऊन परतलो तर हा माझी वाट पाहत उभा होता.
मी त्याच्या लॉगवरून नजर फिरवली. त्याचे नाव परब होते. (ऑपरेटरला आपले नाव लॉगशीटवर लिहावे लागते.)
“परब, माझ्या शिफ्टमध्ये प्रथमच रिपोर्ट करतोयस?”
“हो.”
“शिफ्ट आता आत्ताच सुरु झाली नि तू लगेच झोपलास पण?” मी जरा कडक आवाजात विचारले.
खर तर काय आहे ना टर्बाईन असा एक सूर पकडून गात असतं कि त्या नादब्रह्मात कुणालाही झोप लागावी. तो एकसुर तोडावा लागतो. त्याच्या संमोहनातून बाहेर पडावे लागते.
ही वाक्ये माझ्या डोक्यात कशी आली? मला नाही माहित.
परब मला काही सांगत होता पण माझे लक्ष नव्हते.
“अं, परब, तू मला काही तरी सांगत होतास? सॉरी, माझे लक्ष नव्हते. पुन्हा बोल.”
“सर, मी एव्हढेच सांगत होतो कि मी झोपलो नव्हतो.”
“ओहो, त्याला ब्रह्मानंदी टाळी लागली असं म्हणायचं, झोप म्हणायचं नाही. असच ना? शिफ्टमध्ये हे चालत नाही...” मी बरच काही बोलून गेलो. तो शांतपणे ऐकत गेला. “जा. पुन्हा असं करू नकोस.”
“सर, मी झोपलो नव्हतो. मी एकाग्र चित्ताने टर्बाईनशी संवाद साधत होतो...”
हे म्हणजे फार झालं.
“अरेरे मी तुझी समाधी डिस्टर्ब केली. एनीवे काय म्हणत होते टर्बाईन?” मी कुत्सितपणे विचारले. पण माझा कुत्सितपणा त्याच्या पर्यंत पोचला नसावा. तो उत्साहाने म्हणाला, “टर्बाईन म्हणाले कि सगळे काही ठीकठाक आहे. आपल्या शिफ्टमध्ये ट्रिप होणार नाही.”
“छान! माझ्यावतीने त्याला सांग कि साहेबांनी “थँक यू” दिले आहे. जा आता तू.”
“अवश्य सांगेन सर.” लॉगशीट घेऊन तो चालता झाला.
सकाळी शिफ्ट संपवून मी घरी गेलो.
बायको छानपैकी कोबी पोहे बनवत होती. मी उगीचच टंगळ मंगळ करत किचनमध्ये फिरत होतो. डब्यांची उघडझाप करत तोंडात टाकायला काही मिळतंय का बघत होतो.
“आता एके जागी शांतपणे बस पाहू. गरमागरम पोहे झाले आहेत.”
पोह्यावर ताव मारत होतो तो बायकोने विषय काढला.
“कशी झाली शिफ्ट?”
पुष्पा कधी प्लांटचा विषय काढत नाही. प्लांटमधल्या राजकारणात तिला कवडीचाही रस नव्हता. मग आजच?
“काही नाही. अगदी मजेत गेली नाईट.”
“खरच? अगदी मजेत गेली? सांगण्यासारखं काही नाही?”
“अगदी काही नाही.” संभाषण कुठे चालले आहे? कळायला मार्ग नव्हता.
“अरे हो, एक गंमत झाली खरी. ऐकून तुला हसायला येईल. माझ्या शिफ्टमध्ये प्ररब नावाची एक वल्ली आली आहे. तो मला सांगत होता कि टर्बाईन त्याच्याशी गप्पा मारतं. आता बोल.” मी हसत हसत पुष्पाला सांगत होतो.
“त्यात हसण्यासारखं काय आहे? कुणाचं नातं कुठं जमेल त्याचा काही नेम नाही. माझे बाबा “त्यातले” होते. त्यांचा झाडांशी, गाय-गुरांशी, कुत्र्या-मांजारांशी संवाद चालायचा. गावी आमच्या घराच्या परिसरात आंब्याचे एक झाड आहे. बाबांचा त्यावर फार जीव होता. त्या झाडाचे आंबे त्यांनी कधी उतरवले नाहीत. बाबा म्हणायचे कि त्या झाडाने त्याना सांगितले होते कि “माझी फळं फक्त पक्ष्यांसाठी ठेव.” आणि पक्ष्यांनाही हे माहित होते. सकाळी उठून आम्ही बघायचो तर झाडाखाली अर्ध्या कच्च्या अर्ध्या पिकलेल्या आंब्याचा सडा पडलेला असे. रात्री बहुतेक वटवाघुळे आणि घुबडे येऊन ताव मारून जात असणार. बाबा गेल्यावर त्या आंब्याने कधी म्हणून फळ धरले नाही. आम्ही लाख उपाय केले पण...”
पुष्पीने ही स्टोरी मला आधी सांगितली होती. मी तिच्या बरोबर तिच्या माहेरी जेव्हा जात असे तेव्हा आवर्जून त्या दुःखी झाडाची भेट होत असे.
“ह्या वर्षीपण...” पुष्पा मला सांगायची.
केमिकल लोच्या! दुसरे काय. मी मनातल्या मनात म्हणालो.
“हे पहा पुष्पा, कुत्री, मांजरे, गुरे आणि झाडं ह्यांच्या गोष्टी मी ऐकल्या आहेत पण यंत्रांनाही भावना असतात? हे हे म्हणजे फार झालं. म्हणजे आमच्या किअर्टनने जर हे ऐकलं तर त्याला झीट यायची.”
हा विषय तेव्ह्ढ्यावर बंद झाला. पण परब माझ्या शिफ्टमध्ये कायमचा स्थिर झाला. मी रोज त्याला मिश्किलपणे विचारात असे, “काय परब, काय म्हणतय टर्बाईन?”
तो ही हसून उत्तर द्यायचा, “आज फुल लोडवर चालू आहे त्यामुळे मजेत आहे. तुम भी खुश हम भी खुश!”
एक दिवशी मात्र...
“सर, आज टर्बाईन ट्रिप होणार आहे.”
“का रे बाबा, आज का मूड खराब झाला?”
“टर्बाईन चंगा आहे. पण बॉईलर धोकेमे है.”
प्लांट तर अगदी नॉर्मल होता. असा कसा “बॉईलर धोकेमे है.”?
पण थोड्याच वेळात बॉईलर ऑपरेटरचा फोन आला, “सर, कोळसा ओला येतो आहे. फ्लेमचे काही खरं नाही. ऑइल बर्नर घेऊया का?”
कोळसा ओला येत होता. त्यामुळे बॉईलरची फ्लेम भगभगत होती. ओला कोळसा संपेस्तोवर लक्ष ठेवायला पाहिजे होतं. मी पण इरेस पेटलो होतो. स्वतःशी म्हणालो जर प्लांट बंद पडला तर मी पण नावाचा इंजिनिअर नाही. बघतोच कसा बंद पडतोय ते. तसं पाहिलं तर ऑइल सपोर्ट घेऊन पूर्ण आठ तास बॉईलर चालवू शकलो असतो पण ते माझ्या स्वभावात बसण्यासारखे नव्हते. ऑइल सपोर्ट देऊन बॉईलर चालवणे म्हणजे निसर्गापुढे शरणागती पत्करण्सारखं होतं. ते काय कुणीही करेल. मी नाही करणार. आज माझा मूड खतरनाक होता.
मी पण बॉईलर समोर खुर्ची टाकून बसलो. फ्लेमवर लक्ष ठेवून बसलो. जर का आत्मविश्वास डळमळला तर सपोर्ट घ्यायचा असं ठरवले.
असे तीन चार तास गेले. मधेच वाटायचे कि फ्लेम जाणार आणि ऑइल सपोर्टचे बटण दाबायला बोट शिवशिवत. पण नाही. ती एक हुलकावणी होती. मी आणि बॉईलर आमचा जणू बुद्धिबळाचा डाव चालू होता. तो एक चाल करायचा मी पण धीर न सोडता त्याला तोंड देत होतो. मी पण हा गेम एंजॉय करत होतो.
परबने सांगितले होते कि आज टर्बाईन  ट्रिप होणार आहे. माझी एकच इच्छा होती कि  त्याला खोटं पाडायचं.
पण एका गाफील क्षणी जिद्दीला पेटून मी सपोर्ट घेतला नाही  आणि नेमकं त्याच वेळी फ्लेम फेल्युअर होऊन बॉईलर ट्रिप झाला. बरोबरीने टर्बाईन पण   त्याचा काहीही दोष नसताना.
मी गेम हरलो होतो.
टर्बाईनने परबच्या माध्यमातून मला हे आधीच सांगितले होते. पण मी विश्वास ठेवायचं नाकारलं होते.
हे सगळे माझ्या समक्ष वर्तमानकाळात घडत होते आणि अविश्वसनीय- अनाकलनीय-अमानवीय होते.
म्हणावं तर “मेकॅनिकल लोच्या!”
माझ्या टीमने पंधरा मिनिटातच प्लांट नॉर्मल केला.
शिफ्ट संपवून घरी गेल्यावर मी ही घटना पुष्पाला सांगितली.
“मेकॅनिकल लोच्या!” एव्हढेच बोलून ती गूढ हसली.
कधी कधी मला संशय येतो कि माझी प्रिय पत्नी पुष्पा देखील “त्यांच्या” पैकी एक आहे. नाहीतर ती “मेकॅनिकल लोच्या!” हे अगदी माझ्या मनातले कसे बोलली?






Comments

Popular Posts