टाईम मशीन

 (माझी ““पॉपकार्न परत आले” ही कथा “ऐसी अक्षरे” च्या २०२१ दिवाळी अंकात आली आहे. ही कथा त्या कथेचा दुसरा भाग)

Statutory Warning
Throughout this book(story), the author sometimes attempts to use humor to explain certain concepts in a light-hearted manner. However, the author is not professional comedian, and thus cannot assure the desired effect. Be assured, however, that the author does not intend to offend any dead, alive, zombie, or otherwise undecided cats in superposed status
Exploring Quantum Physics Through Hands-On Projects

डॉक्टर ननवरे आता आपल्यांत नाहीत. “आपल्यांत नाहीत“ ह्याचा अर्थ असा नाही की ते जिवंत नाहीत. उगीचच काही अनर्थ काढू नका. ते आपल्यांत नाहीत म्हणजे ते ह्या पृथ्वीतलावर नाहीत एवढेच! तसा मी त्यांच्या संपर्कांत असतोच.
“पॉपकार्न परत आले” ही कथा आपण वाचली नसेलच. कशी वाचणार? कारण ती भविष्य काळात विलीन झाली आहे. जेव्हा तो भविष्य काळ वर्तमान होईल तेव्हा ती कथा आपण वाचू शकू. जेव्हा “उदंड जाहले पॉपकार्न” अशी अवस्था झाली होती तेव्हा मी थोडा कॉमन सेन्स वापरून डॉक्टरांना त्यावर उपाय सांगितला. त्यामुळे आम्हा दोघांची त्या चमत्कारिक त्रांगड्यातून सही सलामत सुटका झाली.
डॉक्टर माझ्यावर बेहद खुश झाले होते त्यांनी जागेवरच मला
‘प्रयोगशाळा मदतनिसाच्या’ जागेवर नियुक्त केले.
“अहो डॉक्टर, तुम्ही इथे जे काय प्रयोग करता त्यांतले मला शष्प देखील समजत नाही, मी काय तुम्हाला मदत करणार?” मी त्यांच्या अति उत्साहाला थोडा आवर घालण्यासाठी बोललो.
“अरे तुला तो – काय त्याचे नाव — आपला हा, मायकेल फॅरडे तो तुझ्या पेक्षाही अशिक्षित होता. पण काय जबरदस्त उत्साह त्याचा! त्या उत्साहाच्या जोरावर त्याने आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया रचला. तू त्याच्यापेक्षा तसूभरपण कमी नाहीस. तुलापण फिजिक्स आणि उच्च गणित ह्यांचा गंध नाही. असाच माणूस मला मदतनीस म्हणून हवा आहे. तुला “न्यूटन आणि दोन मांजरे” ही कथा माहीत आहे? काही हरकत नाही. कधीतरी मला आठवण करशील मग सांगेन. तर सांगायचा मुद्दा असा की माझ्या सारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या डोक्यांत कधी कधी साध्या गोष्टी चटकन लक्षांत येत नाहीत. तिथे तुझा कॉमन सेन्स मला उपयोगी येईल. आता पगाराचे बोलूया.”
मी इथे माझ्या पगाराबद्दल काही लिहिणार नाही. कारण इथे कोणी इन्कमटॅक्सवाला असेल तर तो मला लगेच नोटीस पाठवून देईल. असे समजून चला की डॉक्टर मला पोटापुरते देत होते. त्यात मी खूष होतो.
“प्रभुदेसाई, इथे जे काही तुला दिसेल त्याबद्दल बाहेर काहीही बोलायचे नाही. मला वचन दे.” मी सरकारी नोकरी केली असल्याने हे काही माझ्यासाठी अवघड नव्हते.
मी हे वचन मोडून डॉक्टरांच्या कथा लिहितो आहे असे आपल्याला वाटत असेल पण ते तसे नाहीये. मी त्यांची परवानगी घेऊनच कथा लिहिल्या आहेत. त्यांनी आणि मी मिळून अनेक प्रयोग केले. त्यातल्या अगदी मोजक्याच प्रयोग–कथा मी लिहिणार आहे. (सीआयए. केजीबी, एमआय१८, मोसाद. रॉ आदींच्या एजंटांना नम्र विनंती---- इकडे लक्ष देऊ नका. कारण माझी जरी दिवसाचे सव्वीस तास तपासणी/उलटतपासणी केलीत तरी माझ्याकडून आपल्याला काहीही माहिती मिळणार नाही,)
दुसऱ्या दिवशीपासून मी कामाला सुरुवात केली. काम अगदी हलक्या प्रतीचे होते. डॉक्टरांच्या आजूबाजूला राहून त्यांना पाहिजे ती मदत करणे हेच माझे काम होते. लॅब मध्येच ‘एनी टाईम फूड’ ATF मशीन असल्यामुळे खाण्यापिण्याची चंगळ होती. डॉक्टरांना चहा “ढोसायची” सवय असल्यामुळेच बहुतेक त्यांनी ATF मशीनचा आविष्कार केला असावा. तेव्हढा तो चहा ATF च्या नळाखाली खायच्या कपात भरून घ्यायचा आणि डॉक्टरांना वेळोवेळी द्यायचा हे महत्वाचे काम होते. चहा पिऊन झाल्यावर कप खायचा असल्यामुळे कप विसळून ठेवण्याची कटकटही नव्हती. मधून मधून डॉक्टर माझा sounding board सारखा उपयोग करत असावेत असा मला संशय आहे. त्यांच्या डोक्यांत विचारांची गर्दी होऊन डोके जाम झाले की ते मला समोर उभे करून भडाभडा बोलत असत. त्यामुळे कदाचित त्याना स्वतःच्या चुकीच्या विचारांची जाणीव होत असावी.
असेच एके दिवशी मला समोर उभे करून त्यांनी बोलायला सुरुवात केली. “तुला तो पॉपकॉर्नचा प्रयोग आठवतो?”
डॉक्टर अजून पॉपकॉर्न विसरले नव्हते. डॉक्टरांना माझ्याकडून अर्थातच कुठल्याही उत्तराची अपेक्षा नव्हती. मी काही हो नाही बोलायच्या आधीच त्यांनी सुरवात केली.
“विज्ञानाचे मुलभूत तत्व असे आहे की वर्तमान हे भूतकाळात केलेल्या कर्मांचे फलित आहे आणि भविष्यकाळ हा आज केलेल्या कर्माचा परिपाक आहे. आज केलेल्या कर्मामुळे आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही. काळ हा एक बाण आहे. जेव्हा ह्या विश्वाची निर्मिती झाली तेव्हा हा बाण सोडला गेला. तो दर सेकंदाला एक सेकंद ह्या गतीने पुढे पुढे जात आहे. “सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती पुन्हा कधी न यायचे” हा त्या बाणाचा बाणा आहे. ही वन वे गल्ली आहे. उलटे येण्यास सक्त मनाई आहे!”
“भौतिकशास्त्राचे सिद्धांत आणि समीकरणे ही जशी वर्तमानकाळांत लागू पडतात तशीच ती भूतकाळांत वा भविष्यकाळात देखील लागू पडतात. खरं तर भूत, वर्तमान आणि भविष्य नेहमी असतातच. आपल्याला त्याची जाणीव नसते एवढेच. म्हणजे मी उद्या सकाळी काय ब्रेकफास्ट करणार आहे हे सर्व आधीच ठरलेले आहे. “उद्या” मध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला त्याचा अनुभव किंवा प्रचीति येते. ‘फ्री विल’ ‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे सर्व कल्पनांचे खेळ आहेत. निव्वळ भुलभुलैय्या! असे समज की तू प्रवास करत आहेस. कारने प्रवास करतो आहेस. गेलेली शहरे, नद्या, रस्ते पूल तुझ्या चांगले लक्षांत आहेत. येणाऱ्या दृश्याची तू उत्सुकतेने वाट बघत आहेस. तू प्रवास कर किंवा नको करूस, येणारी शहरे, नद्या, रस्ते पूल तुला नवीन असतील. पण त्याचा अर्थ असा नाही की ती नव्हती. ती अनादी अनंत कालापासून तिथेच आहेत. तिथेच रहातील!”
“लांबी, रुंदी, उंची ह्या त्रिमितींशीवाय काल ही वास्तवाची चौथी मिती आहे. दुर्दैवाने काल आपण उलट्या दिशेने फिरवू शकत नाही. का? हे कोडे शास्त्रज्ञांना अजून उलगडलेले नाही.”
“ह्या कोड्याचे एक उत्तर कदाचित असे असू शकते की निसर्ग thermodynamics च्या नियमांचे पालन कारतो. ह्या नियमाप्रमाणे कोणत्याही प्रणालीतील ‘बेशिस्त’ एकतर तशीच रहाते किंवा वाढत जाते. अंडे फोडल्यावर आपण त्याचे आम्लेट बनवतो. त्याचे पुन्हा अंडे बनवता येत नाही. न फोडलेल्या अंड्याचे अनेक गोष्टींत रुपांतर करता येते पण एकदा आम्लेट झाले की त्या सर्व शक्यता संपतात.”
“प्रभुदेसाई, पण तुझ्या हुशारीमुळे आणि माझ्या ज्ञानामुळे आपण हे सृष्टीचे बंधन तोडले. आपण पॉपकॉर्नचे पुन्हा त्याच्या मुलभूत द्रव्यांत रुपांतर केले! केव्हढा हा चमत्कार!”
“आता हे “एनी टाईम पॉपकॉर्न” मशीन आता ATP राहिले नाही तर ते “टाईम मशीन” झाले आहे. ह्या मशीन मध्ये आरूढ होऊन आपण “काळ प्रवास” करू शकतो. भूतकाळांत जाऊन आपण प्रभू श्री रामचंद्रांचे लंकेहून अयोध्येला पुनरागमन बघू शकतो, येशू ख्रिस्तला जेव्हा क्रुसावर चढवण्यात आले त्या दुःखद प्रसंगाचे साक्षीदार होऊ शकतो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक “याच देही याच डोळा” बघू शकतो. महाराजांच्या जन्मतारखेचा वाद निकालांत काढू शकतो.”
माझ्या डोक्यांत एक आयडीया आली. भूतकाळांत जाऊन आपल्या चुका सुधारता आल्या तर. ही एक मोठी संधी होती. राहून राहून मला मी केलेल्या दोन चुकांची खंत मनाला खात असे. एक म्हणजे पी डब्ल्यू डी मधली नोकरी आणि लग्न! पी डब्ल्यू डी च्या नोकरीचा कॉल आला होता तेव्हा एका खासगी कंपनीत नोकरी करायची संधी आली होती. पण त्यावर माझ्या तीर्थरूपांनी लाथ मारून मला पी डब्ल्यू डीच्या दावणीला बांधले. लग्नाच्या वेळी देखील एक सुस्वरूप, शिकलेली कन्या सांगून आली होती. पत्रिका जमत नाही असे कारण सांगून माझ्या पिताश्रींनी तिला नकार दिला. आता असलेली माझी पत्नी ओके तशी ठीक आहे. तरी पण--- .आता ह्या चुका सुधारण्याची संधी मला मिळत होती, तर का सोडा?
मी उत्साहाने डॉक्टरांना सांगितले की मी ह्या यंत्रातून भूतकाळांत चक्कर मारायला तयार आहे, “भूतकाळात जाऊन पूर्वी केलेल्या चुका दुरुस्त करायची संधी मिळेल.”
“नाही नाही” डॉक्टरांनी माझ्या उत्साहावर बोळा फिरवला, ”असं नाही करू शकत आपण. मी आपल्या मनीला भूतकाळांत पाठवणार आहे. तुला माहीत नसेल पण आपली मनी एर्विन स्क्रोडिंजर आणि न्यूटन ह्यांच्या मांजरांची वंशज आहे. स्क्रोडिंजरच्या मांजरीचे( का तो बोका होता? स्क्रोडिंजरलाच माहीत असणार) नाव सगळ्यांना माहीत आहे. तसेच आपल्या मनीचे नाव “पहिली कालप्रवासी” म्हणून जगांत गाजेल. त्या लायका कुत्रीसारखे! वर ती आपल्या पूर्वजांना भेटून त्यांची ख्याली खुशाली विचारून येईल! आपल्या खापरपणजीला म्हणजे स्क्रोडिंजरवाल्या मांजरीला आणि तिच्या खापरखापर------- पणजीला म्हणजे---न्यूटनवालीमांजर---भेटून तिला पण जरा बरं वाटेल. बरेच दिवस झाले माहेरी गेलेली नाही बिचारी. काय कसाकाय वाटतो माझा विचार?”
ह्यावर मी काय बोलणार? माझ्या उत्तराची अपेक्षा नव्हतीच. डॉक्टरांनी एका वाटीत दूध काढून कालयंत्रात ठेवले आणि मनीला आत ढकलले. यंत्राचा दरवाजा बंद केला आणि यंत्र चालू केले. यंत्रातून मनीचे म्याऊ स्पष्ट ऐकू येत होते. ते हळू हळू कमी होऊ लागले. म्याऊ म्याऊ जणू काय दूर दूर जात होते. मनी खूप लांबच्या प्रवासास निघाली होती. थोड्याच वेळांत तिचे म्याऊ ऐकू येई नासे झाले. मनी आणि म्याऊ दोनीही भूतकाळांत विलीन झालं. मला वाईट वाटलं. गेली बिच्चारी. परत येणार की नाही? मी जरा साशंक होतो.
डॉक्टर मात्र बिंदास! “अर्ध्या तासाची वेळ दिली आहे.” त्यांनी मला सांगितलं, “येईलच परत ती.”
दहा मिनिटं झाली असतील नसतील कालयंत्रातून मनीचे घाबरलेले म्याऊ ऐकू यायला लागले.
“प्रभुदेसाई, दार उघड. काहीतर गडबड झाली दिसते आहे. ‘
मी यंत्राचा दरवाजा उघडला. आतून भेदरलेल्या मनीने चपळाईने उडी मारून उघड्या खिडकीवाटे लॅबच्या बाहेर पोबारा केला. तिच्या पाठोपाठ एक ढाण्या पट्टेदार वाघाने बाहेर उडी मारली. तो वाघ बघून माझी पांचावर धारण बसली. मी “डॉक्टर” अशी किंकाळी फोडून पळण्यासाठी स्टार्ट घेणार तोच डॉक्टर माझ्यावर ओरडले, “अरे प्रभुदेसाई, असा घाबरतोस काय. तो वाघ काही खाणार नाही तुला. तो द्विमितीच्या सपाटविश्वातून आलेला आहे.”
काय आश्चर्य . तो वाघ जणू काय कार्डबोर्डवर रंगवलेल्या चित्रासारखा सपाट होता. चतुर्मितीच्या विश्वात आल्यामुळे त्याचा गोंधळ उडाला असणार. काय करावे हे न सुचल्यावर आपल्या इकडचे राजकारणी लोक जे करतात तेच त्याने केले. त्याने एक प्रचंड डरकाळी फोडली.
द्विमिती डरकाळी ऐकणारा पहिला ---आणि बहुतेक शेवटचाच-–- मानव म्हणून माझं नाव इतिहासांत अजरामर होइल. त्या दिवशी मराठी भाषा किती तोकडी आहे ह्याची दुखःद जाणीव झाली. त्या आवाजाचे वर्णन करायला मराठी भाषेत शब्द नाहीत. मी केवळ वाघाच्या “प्लेन“ मध्ये उभा असल्यामुळे मला ती डरकाळी ऐकू आली. पण वाघ म्हणजे मला वाघाच्या उंचीची सरळ रेखा दिसत होती. डॉक्टर वाघाला बाजूने बघत असल्यामुळे त्याना वाघ पूर्ण दिसत होता पण त्याची डरकाळी मात्र ते ऐकू शकले नाहीत कारण ती त्यांच्या ‘ प्लेन’ मध्ये नव्हती,
ती रेषा हलली, आणि माझ्यावर चाल करून आली.
डॉक्टरांना वाघाने माझ्यावर घेतलेली झेप दिसली असणार. ते ओरडले, “ मूर्खा बाजूला हो.” मी चपळाई करून बाजूला झालो. ती सरळ रेषा समोरच्या भिंतीवर जाऊन आदळली. मी वाघाच्या “लाईनीतून” बाजूला झाल्यामुळे मला आता वाघ पूर्ण दिसू लागला. द्विमिती वाघाला वळता येत नसल्यामुळे तो एक एक पाउल उलटा चालत होता. डॉक्टर त्याच्या जवळ गेले आणि त्यांनी त्याच्या पाठीवर थोपटले, त्याला गोंजारले, कवेत घेतले आणि त्याला मशीन मध्ये ढकलले,
नंतर त्यांनी मला द्विमिती विश्वाची कल्पना समजवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्यांचे “प्रवचन” ऐकून मला माझ्या चित्रकलेची आठवण झाली. एकदा आमच्या ड्रॉइंग मास्तरांनी “बसस्टॉप आणि बसची वाट पहाणारी माणसे” असा विषय चित्रासाठी दिला होता. त्या चित्रातील अर्धी माणसे उजव्या दिशेला बघत होती तर उरलेली डाव्या बाजूला. समोर बघणारा एकही माणूस नव्हता. तुम्ही हसता आहात ते मला चांगले ऐकू येत आहे. हसू नका. आजूबाजूला पहा. आज देखील फक्त उजव्या किंवा फक्त डाव्या बाजूला बघणारी माणसे तुम्हाला दिसतील!

आमच्या मनिम्यावच्या कालप्रवासाचा असा भीतीदायकदायक शेवट
झाला. त्या दिवसापासून मी त्या यंत्राच्या जवळपास जायला घाबरू लागलो. मला सारखी भीति वाटायची की डॉक्टर कधीतरी मला मशिनच्या आत ढकलणार! पण नाही. डॉक्टर अशा मनोवृत्तीचे नव्हते. त्यांना मशीनची पूर्ण खात्री होती. पण कालयंत्राने मनीम्याऊला भूतकाळात घेऊन जायला पाहिजे होते. त्या ऐवजी ते द्विमिती विश्वांत कसे गेले हे कोडे त्यांना उमगत नव्हते. सरतेशेवटी त्यांनी स्वतः कालप्रवास करण्याचा धाडशी निर्णय घेतला.
दुसऱ्या सकाळी त्यांनी जायची तयारी केली. मला सांगू लागले, “तुला माहित आहे? हॅम्लेटचा पहिला प्रयोग ईस्ट इंडिया कंपनीच्या ‘ड्रॅगन’ नावाच्या जहाजावर १६०७ साली खलाशांनी केला. किती दिवसापासून मनात होते. आज तो प्रयोग याच देही याच डोळा पाहून येतो. तेव्हा हे जहाज सिअरा लेओनच्या किनाऱ्यावर होते. जहाजाच्या कप्तानाने लिहिले आहे की त्यामुळे इतर खलाशांची आळस, जुव्वा आणि झोप यापासून सुटका झाली. मला वाटतेय की आपल्या इकडे ह्या नाटकाचे गावोगाव प्रयोग करायला पाहिजेत.”
“हां, अजून एक. त्या शेक्सपिअरला भेटून त्याच्याच तोंडून वदवून घेईन. बाबारे तूच सांग ‘हॅम्लेट खरच वेडा होता कि त्याने वेड्याचे सोंग काढले होते?’ एकदाचा वाद संपून जाईल.”
“वेळ भेटला तर येताना डॉन ब्रॅडमनची बॅटिंग बघून येईन म्हणतो. आमच्या कुमार जोशीसारखा खेळत असे असं सगळे म्हणतात.”
मला आठवले म्हणा वा सुचले म्हणा, मी डॉक्टरांना कॅमेरा घेऊन जायची आठवण केली, “नाटकाचा विडीओ आणा, आपल्याला यु ट्यूबवर टाकता येईल.”
“बरी आठवण केलीस. यासाठी तर तुला मी माझ्या हाताखाली घेतला आहे. मी पार विसरून गेलो होतो बघ. आणि हो, आज ATF मधून माझ्यासाठी जेवण काढू नकोस. मी “तिकडूनच” जेऊन येईन.”
अस बोलून डॉक्टर गेले कालप्रवासाला!
मी आपला लॅब मधे बाबुराव अर्नाळकरांचे “पाचवे युध्द” वाचत बसलो. मधेच एकदा लाईट गेले/गेली. (आमच्या कॉलनीचे व्यवच्छेदक लक्षण! दिवसातून किमान एकदा तरी हे व्हायलाच पाहिजे.) टाईम मशीन बंद पडले. मी उठलो आणि मशीन रिसेट करून पुन्हा चालू केले.
चला आता तीन चार तासांची निश्चिती झाली. खाऊन घेतले आणि दिली ताणून!
दुपारी केव्हातरी डॉक्टरांनी मला हलवून जागे केले, “अरे उठ. कसा ओंडक्यासारखा पडला आहेस.” मी खडबडून जागा झालो. समोर डॉक्टर उभे!
“मिळाला का हॅम्लेटचा पहिला प्रयोग?” मी विचारले.
“अरे सगळे मुसळ केरात. मला एक सांग मधेच सप्लाय गेला होता का? हो ना. त्यामुळे मी सरळ मागे भूतकाळात प्रवास करत असताना एकदम भूतकाळाला नव्वद अंशात टांग मारून पंचमिती विश्वात प्रवेश केला. बर झालं तिकडे एक सरळ साधा म्हणजे –अनक्रुकेड- माणूस भेटला. त्याने मला सांभाळून घेतले. आता त्या गोष्टी नंतर केव्हातरी सांगेन. हे बघ, येताना मी काय आणले आहे.”
डॉक्टरांनी खिशातून चार पाच चष्मे काढले. आपल्याकडे फूटपाथ वर मिळतात तसले. कचकड्याचे.
“हे काय एवढा काल प्रवास करून आलात आणि काय आणलेत तर कचकड्याचे चष्मे!”
डॉक्टर माझ्याकडे बघून गूढ हसले फक्त. “उद्या आपल्याला कुमार जोशीची भेट घ्यायला जायचे आहे.”
कुमार जोशी म्हणजे जगातील नंबर एकचा बट्समन. त्याला आम्ही का आणि कसे भेटणार? पण मला एक गोष्ट पक्की माहित होती. – डॉक्टर है तो मुमकिन है.
दुसऱ्या दिवशी आम्ही पत्ता शोधत शोधत शेवटी जगांतील नंबर एक बॅट्समन कुमार जोशीच्या बांद्रा येथील निवासबंगल्यावर पोहोचलो. तर टॅक्सीवाला कसा म्हणतो, “काय राव, तुमी मला पहिल्याझूट बोलायचे ना की कुमार जोशीच्या बंगल्याकडे घे. मग सतरा ठिकाणी नाचायची वेळ आलीच नसती. तुमी अपले “षटकार” बंगला कुठे आहे असे विचारत सुटलाय. अहो ह्या बंगल्याचे नाव आहे “सिक्सर”.”
टॅक्सीड्रायव्हरचे म्हणणे खरे होते. खरोखरच त्या बंगल्याचे नाव “षटकार” नसून “सिक्सर” असेच होते. बंगल्याच्या सभोवताली चांगले आठ फुट ,सॉरी, 2.4384 मीटर्स ( डॉक्टरांची सक्त ताकीद होती की फक्त एम के एस परिमाणे वापरायची) उंच भिंतीची भरभक्कम तटबंदी होती. अरेरे त्याची बॅटींग जर एव्हढीच भरभक्कम असती तर? आजकाल वेस्ट इंडिजच्या महाकाय वेगवान बॉलर समोर तो नांगी टाकायला लागला होता. त्याला चेंडू दिसत नाही अशी एक अफवा होती. टीवी वरच्या वादविवाद कार्यक्रमांत क्रिकेटची तज्ञावळ, तो डोळे तपासून का घेत नाही असे कुत्सित प्रश्न विचारू लागले होते. ताशी १४४ किलोमीटर्स इतक्या वेगाने येणारे चेंडू बॉलरच्या हातातून बॅट्समन पर्यंत पोचायला केवळ ०.५०६६६६६ सेकंद घेतात.त्यांतले ०.३ सेकंद केवळ नजर हलवायला लागतात. म्हणजे बॅट्समनला बॉलचा अंदाज घ्यायला फक्त ०.२ सेकंद मिळतात! तेव्हढ्या वेळांत बॅट्समनला किती निर्णय घ्यायचे असतात? जाउदे ही कथा क्रिकेटबद्दल नाही आहे नाहीतर मी तुम्हाला माझे क्रिकेटचे ज्ञान दाखवले असतं. टीवीवर बसून भंकस करायला सॉलिड अर्धा तास मिळतो. म्हणजे एक हजार आठशे सेकंद मिळतात. त्यामुळे काय वाटेल ते बोलायला तज्ज्ञ मंडळी मोकाट असतात. आणि सगळ्यांत मोठा विनोद हा की ही तज्ञमंडळी त्यांच्या क्रिकेट आयुष्यांत मोजून पंचवीस वेगवान चेंडू पण खेळू शकले नसतील.
डॉक्टरांना अर्थातच कुमार जोशीच्या अपयशाचे खूप वाईट वाटत होते. ते त्याचे फॅन होते. आपण एवढे मोठे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहोत पण त्याला कांही मदत करू शकत नाही ह्याची त्यांना वाटणारी खंत ते अधून मधून बोलून दाखवत असत.
आता बंगल्यांत प्रवेश कसा करायचा हा प्रश्न होता. डॉक्टर मोठ्या आत्मविश्वासाने सिक्युरीटी गार्ड च्या समोर गेले. “मी जगप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉक्टर ननवरे. क्वांटम दूरवहन पद्धतीने प्रकाशकणाच्या सहाय्याने विश्वाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकांकडे तत्काळ संदेशवहन कसे करायचे--------”
“काम काय आहे ते पटकन सांगा,” सिक्युरीटी गार्ड गडगडला.
“कुमारला भेटायचं. त्याच्या फायद्याची एक गोष्ट त्याला द्यायची आहे.”
गार्ड इतका वेळ चुना आणि तंबाखू मळत होता. त्याने तोंडात तंबाखूची फक्की मारून आंत कुणालातारी फोन लावला. “हो साहेब, बरं साहेब, सांगतो साहेब.” असे मवाळ आवाजांत काहीबाही बोलून फोन बंद केला. पुन्हा आमच्याकडे बघून तो कडाडला, “साहेब लोक आता नाही भेटत. आधी ठरवून मग यायचे एवढे समजत नाही?” मग त्याने नेम धरून मुखरसाची पिंक टाकली. ती इतकी जालीम होती की आमच्या जवळून २.५४--५.०८ सेमी ( चूक भूल देणे घेणे ) वरून ती गेली पण आमच्या अंगावर एकही कण उडाला नाही.
“कुणाला फोन करायचा त्यांचा नंबर मिळेल काय.” मी उगाचच मध्ये तोंड खुपसले.
“तो पण आम्हीच द्यायचा काय?”
“सिक्सर” बंगल्याबाहेर तीन चार चॅनेलचे वार्ताहार कायमचे तळ ठोकून बसलेले असतात असे मी ऐकून होतो. ते तिथे होतेच. आम्हाला बघून ते घाई घाईने पुढे आले.
आमचा संवाद चानेलवाले लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांना ताबडतोब स्कूपचा वास आला. डॉक्टर? क्वांटम दूरवहन? फायद्याची एक गोष्ट? एकाने(किंवा एकीने) डॉक्टराच्या दंडाला पकडून बाजूला खेचले. “मी फलाणा ढिकाना चॅनेलची आहे. या इकडे अस्से. हा. मी तुमची मुलाखात घेते. संध्याकाळी आमच्या ‘खेल समाचार’ मध्ये ती प्रसारित होईल. आमच्या प्रेक्षकांना ते ‘क्वांटम दूरवहन’ थोडक्यांत समजावून सांगाल काय?” दुसऱ्या असाच कुणा सटरफटर ने माझा हात पकडून ओढायला सुरवात केली.
डॉक्टर पण खमके. चानेलवाल्यांना झिडकारून आम्ही आमची टॅक्सी पकडली.
आमच्या ड्रायव्हरनेही वाचमनच्या पिंक मध्ये आपली पिंक टाकली.( ह्याला सिम्पथेटिक पिंक असे म्हणतात. सिम्पथेटिक व्हायब्रेशन असतात तशी. एकाने जांभई दिली की सगळे एकापाठोपाठ जांभया द्यायला लागतात. म्हणजे एकाने कांही कृती केली लगेच दुसऱ्याला त्याची नक्कल करायची आतून ऊर्मी येते. एकाने नाक खाजवले की दुसऱ्याच्या नाकाला खाज सुटते. )
“आता कुठे?”
“जिथून आम्ही टॅक्सी पकडली तिथे परत घे.” परतीच्या प्रवासांत मी आणि डॉक्टरानी चकार शब्द काढला नाही. माझा विरस झाला होता. डॉक्टरांना नानाकळा अवगत होत्या. त्यांनी मनांत आणले तर ते कुमारला जन्माची अद्दल घडवू शकले असते. पण डॉक्टर त्यांतले नव्हते. त्यांना राग यायच्या ऐवजी कुमार बद्दल करुणा वाटत असणार याबद्दल माझी खात्री होती.
घरी येऊन आणि मी आपल्या कामांत व्यग्र झालो. मी नवीन आलेल्या रसायनाच्या बाटल्या टेबलावर लाईनीत लावत होतो तर डॉक्टर ग्रंथराज उघडून टिप्पणे काढण्यांत मग्न होते. मध्येच माझ्याकडे वळून डॉक्टर म्हणाले, “प्रभुदेसाई, बघ तो स्वतः आपल्या पायांनी इथे चालत येईल.”
तो म्हणजे कुमार जोशी हे माझ्या ध्यानात आले होते. “पण कसा? त्याला आपला बंगला कुठे आहे हे पण माहीत नसणार.”
मी मुर्खासारखे काहीतरी बोलायचे म्हणून बोलालो.
डॉक्टरांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहात मला उलट विचारले, “मला काही बोललास?”
मी चूप बसलो. क्षणापूर्वी “प्रभुदेसाई, बघ तो स्वतः आपल्या पायांनी इथे चालत येईल.” असे बोलणारे डॉक्टर निराळे होते आणि आता “मला काही बोललास?” असे विचारणारे डॉक्टर निराळे होते, ह्याची तीव्र जाणीव झाल्यामुळे मी गप्प बसलो.
वेस्ट इंडीज आणि भारत ह्यांचा अजून एक कसोटी सामना झाला. कुमार जोशी अजून एकदा नको त्या चेंडूच्या वाटेला गेला आणि स्लीप मध्ये झेल देऊन परत आला. नको त्या मुलीची छेडछाड केली की जे होते तेच इथे झाले होते.
“डॉक्टर, कुमार जोशी दोनी इनिंग्समध्ये फेल गेला.” मी माहिती पुरवली.
“कोण हा सुमार जोशी?” डॉक्टरांनी पुस्तकांतून डोकं वर न करता मला विचारले.
कुमारच्या बंगल्यावरच्या आमच्या अयशस्वी मोहिमेला आता जवळ जवळ आठ दिवस झाले होते. आम्ही तिथे का गेलो होतो हे देखील आम्ही विसारलो होतो. अशाच एका दुपारी चार पाचच्या सुमारास कुमार डॉक्टरांच्या बंगल्यासमोर टपकला. तो एकटा नव्हता तर त्याच्या बरोबर त्याचे संपूर्ण लटांबरपण होते. त्याचे लेंढार म्हणजे त्याचा पीए, सुरक्षा सल्लागार, त्याचा प्रसिध्दीप्रमुख, त्याचा डॉक्टर वगैरे वगैरे. प्रत्येकाची अलग अलग गाडी. मिळून सहा सात गाड्या असतील. आमच्या बंगल्याच्या सुरक्षा रोबोने सर्वांना अडवले. दरवाज्यावरून त्याने डॉक्टरांना फोन केला.
“फक्त त्या जोश्याला आत येउदे.” डॉक्टरांनी रोबोला सुचना दिली.
कुमार सरळ आमच्या लॅबमध्ये आला. आमचा अवतार आणि इकडे तिकडे पसरलेले सामान बघून त्याला काय वाटले असावे ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. त्याला बिचाऱ्याला बसायाला साधी खुर्ची नव्हती. आम्ही सगळे स्टुलावर बसून काम करत असू. शेवटी डॉक्टरांना स्वतःची लाज वाटली असावी. त्यांनी कुमारला आपली खुर्ची दिली.
कुमारने स्वतःची ओळख न देता सुरुवात केली. बरोबरच होतं, मोठे लोक आपली थोडीच ओळख करून देणार? म्हणजे टीवीवर तुम्ही कधी ऐकले आहे ----“मी, नरेंद्र दामोदर मोदी. भारताचा पंतप्रधान बोलतोय”----इत्यादी.
“मिस्टर ननावरे, ते तुम्हीच ना?.” उत्तराची वाट न बघता तो पुढे बोलू लागणार तोच डॉक्टरांनी मधेच त्याला अडवले, “मिस्टर ननावरे नाही. जगप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉक्टर ननवरे असे म्हणा. पण तू मला डॉक्टर म्हणालास तरी हरकत नाही.”
डॉक्टर त्याच्याशी एकेरीत बोलल्यामुळे कुमार थोडा चिडला असावा. मोठ्या कष्टाने संयम करत त्याने सुरवात केली, “हे तुम्ही काय चालवले आहे? रोज पहाटे तुम्ही माझ्या स्वप्नांत येऊन मला का त्रास देता आहात? रोजची कटकट साली. म्हणे ये आणि तुझी वस्तू घेऊन जा. रात्रंदिवस तुम्ही मला पछाडले. शेवटी माझ्या पर्सनल सायकिअॅट्रिस्टला फोन लावला. त्याने माझ्या सायकॉलॉजिस्टला फोन लावला. डॉक्टर, ह्या दोघांमध्ये एक्सॅट्क्ली काय फरक असतो हो? त्या दोघांनी खूप विचार करून मला माझ्या गुरुजींच्याकडे जायला सांगितले. सध्या मी मौनी बाबांचा शिष्य झालो आहे. आधी जटाधारी माझे गुरु होते.पण ते इतके पॉवरबाज नाहीत असे वाटल्याने मग ह्याला पकडला. लई पॉवरफुल. त्यांना गुरु केल्यावर तीन शतके ठोकली. एनीवे, काल तुम्ही माझ्या स्वप्नांत आला होता त्याच वेळी ते देखील आले आणि तुमच्याशी सर्व मॅटर डिस्कस केले. तुमची काय चर्चा झाली ते मला माहीत नाही कारण मी गाढ झोपेत होतो ना. तुम्हाला ते आठवत असेल.”
“ओहो, तो दाढीदिक्षित! त्याला मी सर्व समजावून सांगितले पण त्याला काही समजले असेल असे मला वाटत नाही. बरं झालं तूच इकडे आलास. अरे प्रभुदेसाई, तो चष्मा आण पाहू.” मी डॉक्टरांना चष्मा आणून दिला.
“कुमार, घे. हा केवळ तुझ्यासाठी! ”
“ह्या साठी तुम्ही मला एवढा मनस्ताप दिलात. अहो डॉक्टर, मी माझे डोळे माझ्या पर्सनल ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट कडून तीनतीनदा तपासून घेतले आहेत. माझी नजर अजूनही २०/२० आहे. पण तो फार वेगवान गोलंदाजी करतो आहे हो,” कुमार निराश आवाजांत बोलत होता, “अरे बरं झालं. 20/20 वरून आठवले. आज टी-२० सेरीजची पहिली मॅच आहे. मला सरावासाठी मैदानावर जायला पाहिजे. मी उगाचच झक मारली आणि तुमच्याकडे आलो. कृपा करून आतातरी तुम्ही माझा पिच्छा सोडाल का?” एवढे बोलून कुमार जाण्यासाठी उठला.
“ अं हं हं, इतकी घाई करायची नाही. हा साधा चष्मा नाही! हा ५ व्या मितीतला चष्मा आहे. कुमार तुला फिजिक्स समजते म्हणजे काही आठवते आहे कॉलेजमध्ये शिकवलेले?”
“डॉक्टर मी दहावीत असताना शाळा सोडली. तेव्हा माझी भारतीय कसोटी संघात निवड झाली होती. मग कुणा लेकाला फुडं शिकायचय. तोपर्यंत जे काय फिजिक्स शिकलो ते थोडं थोडं आठवतंय. झाडावरून सफरचंद केव्हां खाली पडतंय त्याची वाट बघणारा न्यूटन, वजने घेऊन मनोरा चढ उतार करणारा गॅलिलिओ, नागडा उघडा धावणारा अर्किमेडिज, गाईची धार काढणाऱ्या गवळणी ऐवजी गोस्तन देवीकडे ज्यास्त लक्ष पुरवणारा जेन्नर......”
“एक मिनिट .. तो जेन्नर फिजिक्सवाला नव्हता. तो औषधं देणारा डॉक्टर होता.” डॉक्टरांनी त्याला सुधरावयाचा प्रयत्न केला.
“काय फरक पडतो. आपल्याला स्पिन बॉलिंग आणि स्विंग बॉलिंग दोनी माझ्यासाठी एकच.” कुमारने बेदरकारपणे उत्तर दिले. ह्या त्याच्या गुणामुळे तो जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज झाला होता.
कुणाला काय कसे समजावयाचे एवढी जाणीव डॉक्टरांना होती. “हे बघ मी प्रात्यक्षिकच करून दाखवतो. तो चष्मा डोळ्यावर चढव आणि बघ,”
कुमारने नाराजीने चष्मा घातला. डॉक्टरांनी एक रबरी चेंडू घेऊन समोरच्या भिंतीवर जोराने फेकला. कुमार बघत होता. तो बघतच राहिला.
“आयला!!!” (ही कुमारची सिग्नेचर ट्यून होती). त्याचा चेहरा भूत बघितल्या सारखा झाला होता, “हे तर लई भारी काम दिसतंय. त्याने चष्मा सरळ खिशात टाकला, दुसऱ्या खिशातून पैशाचे पाकीट काढले, “बोला, किती द्यायचे?”
डॉक्टरांनी त्याच्या खिशातून चष्मा काढून घेतला. “हा चष्मा विकण्यासाठी नाही. हा तुला मी भेट म्हणून देणार आहे. त्याआधी तुला एक काम करावे लागेल. ‘अनाथ बालिका गृह’ ही एक सेवाभावी संस्था आहे. त्या संस्थेला दहा हजार रुपयांची देणगी देऊन टाक. इन्कम टॅक्समध्ये पण सूट मिळेल!”
“इन्कम टॅक्स गेला-------- ते माझा सीए बघून घेईल,”
कुमारने डॉक्टरांनी सांगितले तसे केले. जादूचा चष्मा खिशांत टाकून कुमारने डॉक्टरांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला आणि तो चालता झाला.
डॉक्टरांनी काय एवढी जादू केली असावी? कुमार का एवढा खुश झाला होता?
माझ्या मनात काही विचार आला. मी डॉक्टरांना विचारले, “डॉक्टर, मी एक चष्मा घेऊन जाऊ का. फक्त एका दिवसासाठी? उद्या परत करेन म्हणतो.”
“अरे, खुशाल घेउन जा. कायमचा घेउन जा. परत करायची गरज नाही.”
“पण डॉक्टर, माझ्याकडे दहा हजार नाहीत. शंभरएक निघतील.” मी खिशातून आपले पाकीट काढू लागलो.
डॉक्टर माझ्या पाठीवर थाप मारत म्हणाले. “एक केश कर्तन कलाकार दुसऱ्या केश कर्तन कलाकाराकडून, एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरकडून पैसे घेत नाही. तद्वत एक शास्त्रज्ञ दुसऱ्या शास्त्रज्ञाकडून पैसे घेत नसतो.”
रात्री वेस्ट इंडीज आणि भारत ह्यांच्यातला पहिला २०-२० सामना होता. मी मोठ्या उत्सुकतेने सामना बघत होतो. अर्थात् मला फक्त कुमारची फलंदाजी बघायची होती. टेस्ट मॅच मधील सुमार फलंदाजी नंतर ह्या सामन्यांत तो काय कमाल दाखवतो ते मला बघायचे होते. खरं तर मला डॉक्टरांच्या चष्म्याचा करिष्मा बघण्यांत रस होता.
डॉक्टरांनी दिलेला चष्मा घालून कुमार खेळायला आला. लगेच वेस्ट इंडिजच्या कप्तानने आपल्या त्या महाकाय वेगावान गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवला. गोलंदाजाने तोंडातली थुंकी चेंडूवर लावली आणि तो चेंडू ‘नको तिथे’ घासून घासून पॉलिश करू लागला. प्रेक्षकांची उत्सुकता जास्त न ताणता त्याने चेंडू टाकला. मैदानांत कुणालाही तो दिसला नसणार इतक्या वेगाने तो आला. पण कुमार आता पाचव्या मितीमध्ये गेला होता. त्याला त्रिमितीमध्ये ताशी १६० किमी वेगाने येणारा तो चेंडू पाचव्या मितीमध्ये हवेत तरंगत येणाऱ्या पिसासारखा दिसत असणार. त्याने हळुवारपणे चेंडूचे गालगुच्चे घेऊन त्या लब्बाड चेंडूचे लाड करत त्याला उचलून सीमापार फेकून दिले.
“ सिक्सर!!! ” सगळा स्टेडीअम एकदम जागा झाला. “कूSS मा SSSर! कूSS मा SSSर!” अश्या जयघोषाने अख्खा स्टेडीअम हादरून गेला.
पुढचा चेंडू टाकण्यासाठी महाकाय गोलंदाज हातांत चेंडू नाचवत उभा होता. आता “वुई वॉंट सिक्सर” चा नारा सुरु झाला. कुमार स्वतःवर जाम खुश झाला होता. त्याने प्रेक्षकांना शांत रहाण्याचे आवाहन करण्याचे नाटक केले. त्यामुळे तर प्रेक्षक अजून सैरभैर झाले, चेकाळले, आवेशात आले, बेफाम झाले.
थोडक्यांत काय तर कुमारने त्या सामन्यात वेस्ट इंडीजची गोलंदाजी फोडून काढली. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून त्याने नाबाद शतक पूर्ण केले. साहजिक भारताने सामना जिंकला. सामना संपल्यावर झालेल्या चर्चेत सगळ्यांनी कुमारची आरती केली. असा खेळाडू इतिहासात झाला नाही, सध्याच्या जमान्यात त्याला तोड नाही, भविष्यात होणे नाही असे सगळ्यांचे मत पडले. मला ह्या फलंदाजीच्या आतिषबाजीच्या मागची गोम माहीत असल्यामुळे हसू येत होते.
कुमारच्या झंझावाती इनिंग मुळे माझी उत्सुकता ताणली गेली. काय जादू होती त्या चष्म्यात? रात्रीचे साडेअकरा वाजले असावेत. झोपायच्या आधी चष्म्याची जादू बघायची तीव्र इच्छा झाली. मी खिशातून चष्मा काढला आणि डोळ्यावर चढवला. बायको टीव्ही वर ‘तारक मेहता’ बघत बसली होती. मित्रहो काय सांगू. ती ह्या क्षणी आमच्या लग्नात जेवढी सुंदर दिसत होती तेव्हढीच सुंदर दिसत होती.
“अहाहा!” मझ्या तोंडून सहजोद्गार निघून गेले.
“काय झाले? आणि हे चष्म्याचे खूळ कुठून आले.” बायाकोनं चमकून विचारले.
“असू देत. डॉक्टरांनी सांगितले आहे नेहमी वापरात ठेवा. म्हणजे डोळे बिघडणार नाहीत.”
पण बायकोच ती. तिने चष्मा काढायला लावलाच.
दुसऱ्या दिवशी लॅब मध्ये गेलो.
“डॉक्टर, काल जोश्याचा खेळ बघितला? तुमच्या 5 D चष्म्याची कमाल.”
डॉक्टर गडगडाटी हसले. “अरे वेड्या, कसली आली आहे चष्म्याची कमाल? खरा 5 D चष्मा इथे माझ्याकडे आहे. बाकी सगळे कचकड्याचे. त्याचे काय आहे हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात. त्या जोश्याचा आत्मविश्वास पार ढेपाळला होता. जेव्हा त्याच्या मनाची खात्री होती की आपल्याकडे जादूचा चष्मा आहे तेव्हा त्याचा कॉन्फिडंस परत आला. त्याला चष्मा देताना मी हातचलाखी करून खोटा चष्मा त्याच्याखिशात टाकला होता. कळलं?”
मी चुपचाप माझ्याकडचा “जादूचा” चष्मा डॉक्टरांच्या नकळत टेबलाच्या ड्रावर मधे टाकून दिला.
(समाप्त)


Prabhudesai
atulp403@gmail.com

Comments

Popular Posts