फर्मी साहेबाची ऐसी तैसी
तुम्ही कधी रात्री आकाशाकडे बघितले आहे काय? अर्थात पुणे मुंबई सारख्या शहरांतून अशी अवस्था आहे की फक्त ठळक ठळक तेजस्वी दहा पंधरा तारे आणि चंद्र उगवला असेल तर तो, एवढेच आपण बघू शकता. जरा शहराच्या बाहेर दूर जाऊन आकाश पहा. आकाशगंगा अगदी स्वच्छ दिसेल.हे आकाश पाहून तुमच्या मनात काय विचार येत असतील. ते तुमच्या मूडवर अवलंबून आहे. मी जेव्हा अश्या आकाशाकडे बघतो तेव्हा मला माझ्या क्षुद्रपणाची प्रकर्षाने जाणीव होते. म्हणजे असे पहा पृथ्वीवर जितक्या चौपाट्या आहेत, त्या सर्व चौपाट्यांवरच्या वाळूच्या प्रत्येक कणामागे १०००० तारे ह्या विश्वांत आहेत.एकावर चोवीस शून्य द्या इतके तारे ह्या विश्वांत आहेत.थोडी गणिते करून खगोल शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे की विश्वांत कमीत कमी एक लाख आपल्यासारखे प्रगत समाज असतील. मग ह्या लोकांनी अजूनपर्यंत आपल्याशी संपर्क का साधला नाही?
“ सगळेजण गेले कुठे?”
सुप्रसिद्ध वैज्ञानिक एन्रिको फर्मी दुपारचे जेवण करत असताना एकदम उठून उभे राहिले आणि म्हणाले,” “ सगळेजण गेले कुठे?” फर्मीच्या ह्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. ‘सगळेजण’ म्हणजे फर्मीना ‘परग्रहावरचे बुद्धिमान जीव’ असा अर्थ अभिप्रेत होता. फर्मीनी हा प्रश्न १९५० साली विचारला होता. आज २०२० साली सुद्धा ह्या ‘परग्रहावरच्या बुद्धिमान जीवांचा ’ शोध चालूच आहे. दरम्यानच्या काळांत मानवजातीने विज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये अभूतपूर्व प्रगती केली आहे. त्या सर्व तंत्रांचा वापर करून मानव विश्वाचा कोपरान कोपरा तपासून पहात आहोत. पृथ्वीवरून विश्वांत असे संदेश प्रसारित करत आहोत की त्याचा अर्थ कुठल्याही प्रगत समाजाला सहज समजला जावा.
आपण त्यांच्या उत्तराची वाट पहात आहोत.
टेरानवरचे ---- म्हणजे तुम्ही ज्याला पृथ्वी म्हणता -----कित्येकजण शपथेवर सांगत आहेत की त्यांनी उडत्या तबकड्या पाहिल्या आहेत. काहीजण तर असे सांगतात की परग्रहावरील जीवांनी त्यांचे अपहरण करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या इत्यादी इत्यादी. देशोदेशीची सरकारे त्यांना वेडे, सटकलेले अशी शेलकी विशेषणे लावून दडपून टाकत आहेत.
तुमचे मत काय आहे? बसमध्ये तुमच्या बाजूच्या आसनावर बसून मोबाईल बघण्यात मग्न आहोत असा अविर्भाव करणारा सहप्रवासी—तो कशावरून एलिअन नसेल? शेजारच्या फ्लॅटमधे रहाणारे बंडोपंत! कशावरून ते तुमच्यावर लक्ष ठेवून तुमची बित्तम बातमी मंगळावरच्या त्यांच्या मुख्यालयांत रोज पाठवत नसतील? ते दिसतात तसे बावळट. पण ----- कुणाचा नेम नाही. काल तो हॉटेलमध्ये तुमच्या समोर थोडा पलीकडे बसलेला माणूस तुमच्याकडे टक लावून बघत होता. का? तुम्हाला असे प्रश्न पडत नाहीत? असे संशय येत नाहीत? तस असेल तर तुम्ही खरोखर सुदैवी आहात. मी मात्र तुमच्या इतका सुदैवी नाही.
मी तसा सुखवस्तू माणूस आहे. तसा म्हणजे बराच .बराच म्हणजे खूपच! ह्यापेक्षा तुम्ही काही जास्त विचारू नका. विच्रारलत तरी मी थोडाच सांगणार आहे? जगांत इतके कोट्याधीश अब्जाधीश लोक आहेत त्यांना तुम्ही कधी विचारता? नाही ना. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचे आदर्श घालून देता. उलट एखादा गरीब बिचारा शाळामास्तर आला तर हा आता काय भीक मागायला आला ह्या कल्पनेने अंग चोरून घेता. त्याची घाई घाईने एका चहावर बोळवण करून—बिस्कीट पण नाही—सुटलो म्हणून निश्वास सोडता. होय की नाही. तो बिच्रारा शाळेच्या काही कामासाठी वर्गणी गोळा करायला आला असणार. तुम्ही त्याच्याशी इतके तुसडेपणाने वागता की त्यालाही संकोच वाटतो. तो मग तुमच्याकडे काहीही न मागता निघून जातो. कुणाच्या वर्मावर बोट ठेवायचा माझा हेतू नाही. एक आपले सहज जाता जाता.
म्हणून जेव्हा मला ती ई-मेल आली तेव्हा प्रथम मला संशय आला. कारण मेल पाठवणाऱ्याला मी ओळखत नव्हतो. अश्या अनोळखी व्यक्तींच्या मेल मी उघडत पण नाही. त्या मेल बरोबर जर काही अॅटॅच्मेंट असेल तर अजिबातच नाही. कारण बहुतेक वेळी त्यांत वायरस असतो.
ही मेल थोडी जरा निराळी वाटली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मराठीत लिहिली होती. मराठी असे आमुची मायबोली ---- यस तीच मराठी. जर तुम्ही विसरला असाल तर आठवण करून दिली. दुसरे म्हणजे मेल पाठवणारा जो होता त्याचे नाव होते बटाटा. बटाटा! मेल उघडावी की न उघडावी अश्या द्विधा मनस्थितीत मी होतो. शेवटी हुशार आणि आयुष्यात यशस्वी ठरलेल्या व्यक्ति जे करतात ते करायचे असा विचार करून ती मेल वाचायचा विचार तहकूब केला. मी लाल बहाद्दूर शास्त्री ह्यांचा शिष्य आहे. थंडा करके खाओ. माझे अजून एक तत्व आहे ------- गळ्यापर्यंत आल्याशिवाय निर्णय घेऊ नका. ह्या दोन तत्वानुसार मी ठरवले की उद्या बघू.
मी माझ्या सवयीनुसार संध्याकाळी म्हाताऱ्या लोकांच्या विरंगुळा केंद्रांत गेलो. ह्या शहरांत टाइमपास करायला खूप काही आहे. त्यांत ही एक बाब. इथे टाइमपास करायला सिनिअर लोकांची एक गॅंग येते. चकाट्या पिटणे आणि दोन चार चहा ढोसणे हा यांचा उद्योग! हे लोक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा, रशियाच्या राष्ट्राध्यक्षाचा, पाकिस्तानच्या पंतप्रधानाचा उल्लेख एकीरीत करतात पण इथले नगरपालक, आमदार, खासदार ह्यांना आदरार्थी संबोधन वापरतात. उदा. “ ट्रंपला काही अक्कल आहे का?” किंवा तत्सम. “ पुतीन ट्रंपला भारी पडतोय.” “ दादांचा काय वट आहे.” “ साहेबांना आपण मानले बर का. ” इथे जाण्यात माझा अजून एक हेतू होता, इथे कॉलोनीतल्या सर्व बातम्या इथ्थंभूत ऐकायला मिळत असत. विनायास आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवाण्याची सुविधा होती.अजूनपर्यंत तरी काही संशयास्पद नजरेला पडले नव्ह्ते.
पण ही इमेल आल्यावार मी अस्वस्थ झालो. कोण होता हा बटाटा? मी तर हे नाव प्रथमच ऐकत होतो.मराठी लोकांच्या आडनावां इतकी आडनावे जगांत कुठल्याही लोकसमुदायांत नसावीत. काही नावे तद्दन विनोदी तर काही किळसवाणी.काही लोकांना आपली नावे सांगताना लाज वाटावी अशी. पण बटाटा हे नाव मी प्रथमच ऐकत होतो.
शेवटी मी
माझ्या सुरक्षा सल्लागाराला मेल टाकली. त्याचा मजकूर काहीसा असा होता. “ इकडे
वादळाची चिन्हे दिसत आहेत. तुमच्याकडे हवा कशी आहे? तुमचा काय विचार आहे?” दहा एक
मिनिटांनी त्याचे उत्तर आले. “ सर, तुम्ही उगाचाच बाऊ करत आहात. आम्ही एकपण काळ ढग
बघितलेला नाही. तरी पण काळजी घ्या.”
रात्री मी झोपायचा
प्रयत्न केला. झोप येणे थोडे कठीण होते. व्हेलिअम घेऊन झोपायचा प्रयत्न केला. झोप लागणार
अस वाटत होते. इतक्यांत वाऱ्यामुळे आवाज होऊन झोप डिस्टर्ब झाली. पुन्हा डोक्यांत
बटाटा आला. मी आयुष्यात इतके झमेले केले. कधी इतका अस्वथ झालो नव्हतो. आता काय
सुखी, निष्काळजी जीवनाची सवय झाल्यामुळे मन कमकुवत झाले असणार. शेवटी निश्चय केला.
घाबरायचे नाही. पूर्वीचे दिवस आठवले. मी जी जी लफडी केली होती त्याची शिक्षा
म्हणून खर तर मी आत्ता तुरुंगांतच असायला
पाहिजे होतो. पण माझ्या हुशारीने आणि चातुर्याने मी इथे जीवनाचा बिनधास्त आनंद घेत
होतो. पण बटाटा माझ्या सुखी जीवनांत घोंघावणाऱ्या वादळासारखा आला होता.त्याचाच
विचार करता करता थकवा आला असावा. त्यामुळे मला थोडी झोप लागली. सकाळी उठलो तेव्हा
मी निश्चय केला. संकटाला धैर्याने सामोरे जायचे. बटाट्याची मेल उघडली. मेल मध्ये
बटाटा लिहित होता, “ सर, मी आपला फोटो फेसबुक वर बघितला. मला एकदम स्ट्राईक झाले
की हा तर आपला बालमित्र बबड्या! आपल्याला भेटायची खूप उत्सुकता आहे. उलट टपाली
आपला पत्ता आणि आपलयाला केव्हा भेटावे ते जरूर कळवा. आपला लॉंग लॉस्ट मित्र
बटाटा.” एकदा ह्याला निपटून टाकावे म्हणजे निदान स्वस्थ झोप या विचाराने मी
बटाट्याला माझा पत्ता आणि भेटायची वेळ सांगितली.
बटाट्याचे मी माझ्या आउटहाउस मध्ये स्वागत केले. प्रथम जेव्हा मी त्याला पहिले तेव्हा माझी मलाच कीव वाटली. ह्या इतक्या फालतू माणसाला आपण घाबरत होतो? बटाटा हा अगदी साधा भोळा माणूस दिसत होता. माझ्याच वयाचा, थोडा बुटका, वर्ण ही जसा सगळ्यांचा असतो तसा म्हणजे काळा नाही ,गोरा नाही, शरीर सैल ,ढगाळ सुटलेले, पोट पॅंटमध्ये खोचून भरलेले ! केस कलप लावून काळे केलेले. त्याला बघितल्यावर मला मुक्रीची आठवण झाली. उगाचच मी घाबरत होतो.
त्याला घाम आला होता. बिचारा घामाघूम झाला होता.
“ बसा पत्ता सापडला की विचारावे लागले?” मी त्याला पाण्याचा घास देत विचारले.
आधी तो घटाघटा पाणी प्याला. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव तरळले. खिशातून रुमाल काढून चेहरा पुसला. कसल्यातरी उग्र अत्तराचा दर्प दरवळला. “ तुमच्या इथल्या पाण्याची चव फारच छान आहे बरका बाकी. अगदी थेट आमच्या गांवातल्या काटकरांच्या मळ्यातल्या विहिरीतल्या पाण्यासारखी.” बिसलेरीच्या बाटलीतले पाणी कुणा काटकरांच्या मळ्यातल्या विहिरीत पोहोचले होते. हा माणूस दिसतो तसा बावळट नाही. सावधान !
“ हाहाहा मी विसरलोच. बोलता बोलता कुठून कुठे पोहोचलो. तुमचा पत्ता ना? लगेच मिळाला. तुमची ही जी कॉलनी आहे त्या कॉलनीच्या प्रवेशद्वाराशी हा जो तुमच्या कॉलनीचा एक नकाशा लावला आहे, तो बघितल्यावर हा जो तुमचा बंगला आहे तो लगेच मिळाला.” मला मराठी चित्रवाहिनीच्या निवेदिकेची आठवण झाली. हा जो आहे तो -------- इत्यादि.
“ तुम्ही इथे हे जे आउट आहे, इथे रहता काय. मग हा जो बंगला आहे तो तो कुणाचा?”
“ ते आमचे शेठ आहेत. मी त्यांच्याकडे कामाला असतो. मला रहायला जागा नव्हती म्हणून त्यांनी कृपाकरून माझी सोय केली.” मी त्याला जुजबी माहिती पुरवली. मी चक्क खोटं बोलत होतो. आयुष्यांत मी इतक्या थापा मारल्या, इतका खोटेपणा केला, इतकी खोटी कागदपत्रे बनवली, इतक्या ठिकाणी दुसऱ्या लोकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या गिरवल्या त्याच्यापुढे हे काहीच नव्हते. सगळे लोक तेच करतात. महाजनो येन गतः स पंथाः|
तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्नाः
नैको मुनि र्यस्य वचः प्रमाणम्
।
धर्मस्य तत्त्वं निहितं
गुहायाम्
महाजनो येन गतः स पंथाः ॥
“ वा. वा. छान. छान. असे मालक विरळाच बाकी.” बटाटा अजून मूळ मुद्द्यावर यायला तयार नव्हता.
“ मिस्टर बटाटा, आपण कसे येणे केलेत ?” मी त्याला लाइनीवर आणण्याचा प्रयत्न केला.
“ त्याचे काय झाले, मी आपला फेसबुकवरचा फोटो बघितला. एकदम उडालोच म्हणालो “ हा तर आपला शाळा सोबती बबड्या! खूप बदल झाला आहे तुझ्यांत. नाक मात्र अजून तसेच आहे. त्याच्यावरून तर ओळखला. म्हणालो आता ह्याला पकडायलाच पाहिजे.” बबड्या. आता तरी आठवले का?”
मी पण त्याच्या कलाने घ्यायचे ठरवले. आगे आगे देखेंगे होता क्या है असा विचार करून मी खुर्चीवरून उडी मारली आणि ओरडलो. “ अरे बटाट्या,तू? प्रथम मी तुला ओळखले नाही. केवढा जाड्या झाला आहेस तू! फुग्यासारखा फुगला आहेस!” त्याने माझ्या कुत्सित बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
“ बबड्या, आपले ते शाळेतले दिवस आठवले नि अंतःकरण भरून आले बघ. तुला ते सर आठवतात? ते गृहपाठ विसरला की शर्टाला गाठ मारणारे? मी एके दिवशी गृहपाठ तर विसरलोच पण आदल्या दिवशी सरांनी शर्टाला मारलेली गाठ देखील सोडवायला विसरलो. काय धबाधबा पिटलं रे मला त्यांनी. काय नाव बरं त्यांचे?”
मी देखील
काही कमी नव्हतो. खेळ चालू ठेवणे जरुरीचे होते. “ अरे ते बापट मास्तर. गोरे गोरे
बुटके. माझ्या शर्टाला पण त्यांनी दोनदा तीनदा गाठी मारल्या होत्या.”
“ तुझं काय रे. तू पडला
स्कॉलर. तू त्यांचा पेट ! तू कधी गृहपाठ विसरलास? मला नाही आठवत.” कसे आठवणार ? ज्या गोष्टी कधी झाल्याच नाहीत
त्या कशा आठवणार. स्वतःला बटाटा म्हणवणारा तो माणूस रंगात येऊन बोलत होता. माझी
खात्री झाली होती की हा माणूस टोटल फेकू आहे. त्याचा इथे येण्याचा उद्देश काय असेल
हे काढून घ्यायला पाहिजे. कदाचित माझ्या पैशावर ह्याचा डोळा असेल.आम्ही दोघेही
असेच एकमेकांना हुलकावणी देत बोलत होतो.
“ चहा घेणार न बटाट्या? थांब फक्कड पैकी चहा करतो.” त्याच्या होकाराची वाट न बघता मी किचनमध्ये जाऊन दूध आणि चहाचे पाणी गॅस वर ठेवले. तेवढ्या वेळांत बटाटा काय करतो आहे ते सीसी टीवी वर बघत होतो. तो टेबलाचे खण उघडून तपासणी करत होता. मला ह्या गोष्टीची अपेक्षा होती म्हणून मी आमची भेट आउट हाउस मध्ये ठेवली होती. तिथे काहीच पुरावा सोडला नव्हता.
मी टाइम काय झाला म्हणून बघायला गेलो तर घडाळ्याचे काटे उलटे फिरत होते. तबकडी ही उलाटी होती. म्हणजे क्लॉकवाइजचे अॅंटीक्लॉकवाइजचे झाले होते. माझ्या माहितीप्रमाणे विश्वांत फक्त ग्यानिमिड वरची घड्याळे अशी उलटी चालतात. म्हणजे हा पाहुणा ग्यानिमिड वरून मला शोधत शोधत पोहोचला आहे. शेवटी त्यांनी माझा पत्ता शोधून काढला होता. हा माझे अपहरण करून ग्यानिमिडवर घेऊन जाणार. तेथे माझ्यावर खटला चालणार आणि कदाचित माझ्या सर्व शक्ति काढून घेतल्यावर मला उर्वरित आयुष्य त्यांच्या तुरुंगात सडत काढावे लागणार. अरेरे, हेची फल काय मम तपाला. असा धीर सोडून नाही चालणार. मग माझ्या सुरक्षा सल्लागाराने दिलेल्या त्या कुपीचा उपयोग काय?
चहा झाल्यावर बटाट्याच्या कपांत त्या कुपीतल्या द्रवाचे दोन थेंब टाकून मी बाहेर आलो. चहा आणि बिस्किटे समोर ठेवून मी बोललो, “ बटाट्या तुझ्यासाठी खास लंडनहून मागवलेला चहा केला आहे. पी. आयुष्यांत कधी प्याला नसशील असा चहा आहे.”
चहा पिऊन झाल्यावर कप खाली ठेऊन बटाटा म्हणाला, “ अप्रतिम! आता आपण कामाचे बोलूया.” म्हणजे इतका वेळ काय चालले होते? मी प्रश्नार्थक चेहरा केला. बटाट्याने पॅंटच्या खिशातून एक नळकांडे बाहेर काढून माझ्यावर रोखले. ती लेझर गन होती. मी उसने अवसान दाखवून त्याला विचारले, “ हे काय आहे ? हे लहान मुलांचे खेळणे कशाला आणलेस? माझ्याइथे कोणी लहान मुलगा मुलगी असे कोणी नाहीये.”
“ मिस्टर यानी कानी हे हत्यार काय आहे ते तुम्हाला चांगले माहीत आहे. शेवटी आम्ही तुम्हाला शोधून काढलेच. ग्यानिमिडच्या अध्यक्षांचा संदेश देण्यासाठी मी आलो आहे. ह्या नवीन अध्यक्षांनी नुकताच कारभार हातांत घेतला आहे. आमच्या देशाची ढासळलेली अर्थाव्यवस्था कशी सुधारायची ह्या विचारांत असताना तुमची केसफाइल त्यांच्या हाती लागली. तुम्ही केलेल्या आर्थिक लफड्यांनी, बॅंक घोटाळ्यांनी ते इतके प्रभावित झाले कि ताबडतोब तुमचा शोध घेऊन तुम्हाला परत आणावे असे आदेश त्यांनी आम्हाला दिले. ग्यानिमिडच्या रिझर्व बॅंकेच्या अध्यक्षपदी आपली नेमणूक करायचा त्यांचा इरादा आहे. हे पहा त्यांनी आपल्याला देण्यासाठी मला दिलेला लखोटा. फॉर युअर आईज ओन्ली! असं लिहिले आहे त्याच्यावर. तुम्हीच तो उघडा आणि वाचा. ”
मी तो लिफाफा उघडला.त्यांत लिहिले होते की ग्यानिमिडच्या अध्यक्षांनी माझ्यावरील सर्व आरोपांचा पुनर्विचार केला होता आणि त्यांना असलेल्या खास अधिकारांचा वापर करून मला पूर्ण आणि बिनशर्त माफी दिली होती. दुसऱ्या पत्राप्रमाणे अध्यक्षांना मला रिझर्व बॅंक ऑफ ग्यानिमिडच्या मुख्य पदावर नेमताना अति आनंद होत आहे असा मजकूर होता. ती पत्रे वाचल्यावर माझा जीव थोडा भांड्यांत पडला. पण मला तेवढ्यांत धोक्याची घंटा ऐकू आली. ही मला फसवण्याची चाल कशावरून नसेल? मी सरळ सरळ सापळ्यात स्वतःहून चालत जातो आहे, लावलेल्या आमिषाला भुलून. केवढा मूर्खपणा झाला असता. वैश्विक भामट्यांच्या संघटनेच्या सर्व सदस्यांमध्ये माझी केवढी छीथू झाली असती! मला गुरुस्थानी मानणाऱ्या माझ्या भक्तांना काय वाटले असते. शिवाय टेरा सोडून ग्यानिमिडला परत जायची माझी मुळीच इच्छा नव्हती. टेरावर क्रिकेट होते. त्यावर बेटिंग करता येत होते. कुठल्या सामन्यांत कुठला खेळाडू फितूर झाला असेल ह्याचे अंदाज बांधण्यात जी मजा येते! इथे चित्रवाहिन्यांवर कजाग सासू, गरीब सून, बुळा नवरा, कारस्थानी नणंदा, प्रेमळ नोकर रामूचाचा, भावासाठी/बहिणीसाठी कष्ट उपसणारा भाऊ/बहीण किंवा अगदी ह्याउलट असणाऱ्या व्यक्तिरेखा म्हणजे गरीब बिच्चाऱ्या सासू सासऱ्यांना घराबाहेर काढणारी हिटलर सून आणि तिच्या ओंजळीने पाणी पिणारा नवरा! अशा सीरिअल ग्यानिमिड टीवी वर थोड्यांच बघायला मिळणार? तसेच इथे गल्लोगल्ली मिळणारे वडापाव, भजी, मिसळपाव, पावभाजी आणि वर कटिंग चहा असे स्वस्त आणि चवदार पदार्थ! इथली खुली हवा, चार चार मजल्यांवर पसरलेले शॉपिंग मॉल हे सगळे सोडून ग्यानिमिडला जाऊन चोवीस तास, बारा महिने जमिनी खाली ऑक्सिजनचे सिलिंडर पाठीवर घेऊन कृत्रिम प्रकाशांत आयुष्य व्यतीत करायची कल्पना सुद्धा मला सहन होईना. भलेही ग्यानिमिड टेरापेक्षा तांत्रिक बाबतीत फार पुढे गेलेला असेल. पण इथे कुणा लेकाला पाहिजे आहे ते.
“ बटाट्या, ग्यानिमिडच्या अध्यक्षांना माझे सादर प्रणाम! त्यांच्या ह्या जेस्चरमुळे माझा मोठा बहुमान झाला आहे अशी माझी धारणा आहे. पण मला अर्थशास्त्रांतले अ का ज्ञ समजत नाही. त्यामुळे आणि टेरामधल्या माझ्या कार्य बाहुल्यामूळे मला त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारता येत नाही याबद्दल मला अत्यंत दुःख होत आहे. ग्यानिमिडचे दयाळू अध्यक्ष मला क्षमा करतील अशी आशा करतो.”
“ खरं तर ह्या पदासाठी अर्थशास्त्राचे ज्ञान असायची काही गरज नाही.कुठल्याही पदासाठी कुठलेही ज्ञान असायची गरज नाही असे आमच्या महान –- देव त्यांना चिरायू करो – अध्यक्षांचे मत आहे. ग्यानिमिडचे दयाळू अध्यक्ष तुम्हाला क्षमा करतील की नाही ह्याची मला कल्पना नाही. मी मात्र तुम्हाला पडलं तर बळजबरी करून इथून घेऊन जाणार आहे. मला दस्तूर खुद्द अध्यक्षांचा तसा हुकुम आहे. अध्यक्षांची इच्छा धुडकावणाऱ्यांची काय अवस्था होते तुम्हाला ग्यानिमिडला गेल्यावर समजेल.” असे धमकीवजा भाषण देऊन आपली लेझर गन त्याने माझ्यावर रोखली, “ शहाणा असशील तर हात वर कर. काही संशयास्पद हालचाल केलीस तर मला तेरावा खून करावा लागेल.”
माझे अजून एक तत्व आहे. ज्याच्या हातात लेझर गन असते, तो शहाणा असतो. त्याच्याशी कधी वादविवाद घालायचे नसतात. निरर्थक रक्तपात टाळण्यासाठी मी स्वतः कधी गन ठेवत नसतो. आपले काम डोक्याचे हिंसाचाराचे नाही !
मी नाईलाजाने हात वर केले. “ नाक खाजवायला काही हरकत नाही ना का ती संशयास्पद हालचाल ठरेल?” मी टेन्शन कमी करण्यासाठी जोक केला. टेन्शन मला नव्हते त्याला होते, “ एक गोष्ट लक्षांत ठेव. ह्याइथे न्यायाचे राज्य आहे. मी कोर्टांत जाऊन स्टे ऑर्डर आणेन. किडनॅप करणे हा एक महाभयंकर गुन्हा आहे ह्या देशांत.
“ असे पाचकळ विनोद करू नकोस.मी काय सांगतो ते नीट ऐक आणि त्याप्रमाणे वाग.त्यातच तुझे भले आहे. आता मागे न बघता पुढे चाल आणि दरवाजा उघड. माझ्याकडे उडती तबकडी आहे. त्यातून आपल्याला ग्यानिमिडवर जायचे आहे.”
“उडती तबकडी? कुठे आहे ? मी तर बघितली नाही.”
त्याने आपल्या खिशातून शर्टाच्या बटणा दिसणारी एक वस्तू काढून दाखवली. एकूण मी ग्यानिमिडवरून परागंदा झाल्यावर बरीच प्रगती झाली होती.
मी दरवाजा उघडायचे नाटक केले, “ मला वाटतेय की दरवाजा बाहेरून बंद झाला आहे. तुला किंवा मला बाहेर जाऊन उघडायला पाहिजे. किंवा दरवाज्याच्या खात्यात दहा रुपये भरायला पाहिजेत म्हणजे तो उघडेल. मला माझा संगणक चालू करून ते करावे लागेल. आणि हात खाली केल्याशिवाय तसे करणे अशक्य आहे.”
“ मी तो धोका पत्करू शकत नाही. त्यापेक्षा मी बाहेर जातो आणि दरवाजा उघडून परत येतो.” त्याने माझ्या हातांत आणि पायांत ई-बेड्या ठोकल्या. मला ई-बेड्या ठोकणारा तो पहिलाच नव्हता आणि ई-बेड्यातून सुटका करून घेण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग नव्हता. मला वाटते हे बटाट्याला माहीत नसावे. बटाटा आता त्रीमितितून –(3D) 4D मध्ये जात होता. तो प्रथम चपटा झाला आणि दरवाजाच्या खालच्या फटीतून बाहेर जायचा प्रयत्न करत होता.खरे तर त्याने स्वतःचे प्रथम चपटांत, मग सरळ रेषेत, शेवटी बिंदूत परिवर्तन करून मग प्रयत्न करायला पाहिजे होता. पण कुठेतरी माशी शिंकली होती. आता तर तो दरवाजाच्या फटीत अडकला गेला होता. आणि बाहेर पडायची केविलवाणी धडपड करत होता. मला त्याची दया आली. मी माझी ई-बेड्यातून सुटका करून घेतली,( थॅंक्स टू जादुगार सरकार!) आणि त्याला जोर लगाके खेचून बाहेर काढला.
बिचाऱ्याचा चेहरा अगदी पडला होता.चेहऱ्याची रया पार गेली होती. त्याची लेझर गन माझ्याकडे आली होती. ती मी त्याला परत दिली. “ अरे तुला बंद खोलीतून बाहेर पडायचे तंत्र कशिनाच्या पोलीस प्रशिक्षण संस्थेत शिकवले नाही का? मग तू असा साडेतीन मितीमध्ये (3.5D) कसा फसलास? ”
मला उत्तर माहीत होते. हा तो त्या कुपीतल्या द्रवाच्या दोन थेंबांचा परिणाम होता.
“ बबड्या
मला खूप झोप येतीय रे.”
“ काही काळजी करू नकोस.
तू खुशाल झोप. तुझी झोप झाली की आपण बाहेर जाऊन काहीतरी स्नॅक्स खाऊ . खूप मजा
करू. भेळपुरी, वडापाव खाऊ आणि वर लेमन पिऊ.---” मी असे बोलत आहे तोपर्यंत बटाटा
गाढ झोपून घोरायला लागला होता. मी प्रथम बटाट्याचे खिसे तपासले त्याचे आय कार्ड,
पैशाचे पाकीट.एटीम कार्ड आणि मोबाईल होते. त्यातली कार्डे कात्रीने कापून
कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिली. मोबाईल फॅक्टरी रिसेट केला. पैशाच्या पाकिटात काही
पैसे होते. त्यात थोडी माझ्याकडून बक्षिसी भर म्हणून ठेऊन दिली. त्याच्या
बदली त्याची उडती तबकडी काढून घेतली. कधी उपयोगी पडेल. दरवाज्याच्या खात्यांत दहा
रुपये भरून दरवाजा मोकळा केला. शेवटी माझ्या सुरक्षा सल्लागाराला फोन केला आणि
झालेला प्रकार कथन केला.
“ वेरी गुड. अभिनंदन!” पलीकडून आवाज आला.
“ म आता मी काय करू?” मी विचरले.
“ काही करू नका. थोड्या वेळांत तो जागा होईल. त्याला लाथ मारून बाहेर काढा. औषधाच्या प्रभावाने त्याचे उर्वरित आयुष्य त्याला बहुतेक वेड्यांच्या इस्पितळात काढावे लागेल. वाईट वाटून घेऊ नका.तुम्ही हे केले नसते तर तुम्हाला पुढचे आयुष्य तुरुंगात काढावे लागले असते आणि आम्ही एक चांगला क्लाएन्ट गमावला असता.” त्यांनी फोन बंद केला.
मी बटाटा केव्हा भानावर येतो त्याची वाट पहात बसलो आहे. मनांत सहजच फर्मी साहेबाचे विचार आले. त्यांना कधी समजले नाही की आम्ही टेरा वर टेरानमध्ये वावरतो आहोत.त्यांच्या आजूबाजूला फिरत आहोत. आणि हे मूर्ख टेरान, म्हणजे ज्यांना तुम्ही मानव म्हणता ते, सगळ्या विश्वांत आमचा शोध घेण्यासाठी धडपडत आहेत !!
“ सगळेजण गेले कुठे?”
आम्ही इथेच
तुमच्या आजूबाजूला आहोत, फर्मी साहेब!
Comments
Post a Comment