ती आणि तो

 

ती नेहमी येते. आजही आली होती.

संध्याकाळचे सहा वाजले. भेळवाल्याने मनातल्या मनात नोंद केली.

ती हळूहळू चालत नेहमीच्या बाकड्याकडे जाते.

तिच्या चालीत काहीही विशेष नाही. आठ महिन्यापूर्वी जशी आली होती तशी ती दररोज येते.

आठ महिन्यापूर्वी उत्साह होता. चालण्यात डौलदार संथपणा होता. उत्सुकता होती. हुरहूर होती.

आशा आणि भीति यांचा पाठशिवणीचा खेळ.

आता त्या भावना विरून गेल्या होत्या.

जिथे सागरा धरणी मिळते

तिथे तुझी मी वाट पहाते.

अस केव्हातरी अल्लड बोलणे झाले होते.  तेच निभावते आहे.

वूडस आर लवली  डार्क अॅंड ग्रीन

बट आय हॅव प्रोमिसेस टू कीप.

केवळ म्हणून ती येते.

हाच तो बाक. श्री प्रकाश कट्टी ह्यांनी सौ. प्रतिभा कट्टी ह्यांच्या स्मरणार्थ...

प्रत्येक बाकाची एकेक कथा.

आणि व्यथा.

बिचाऱ्यांना वाचा नाही म्हणून.

बाकावर टेकणाऱ्याच्याही कथा. 

काही कणभर. एखादी मणभर.

तिचीही एक कथा होती.

मॅडम, विसराना आता प्लीज.

एक मरतुकडे कुत्रे आशेने तिच्याकडे येते. काहीतरी खायला मिळेल...

जा रे बाबा, तिच्या कडे देण्यासारखे काही उरले नाहीये. जे देण्यासारखे होते ते देऊन झाले होते.

तो आला. उशीर झाला होता खरा. त्याच बाकावर तिच्या शेजारीच पण थोडे अंतर ठेवून बसला. काय बोलावे, कशी सुरवात करावी? काही सुचेना. शेवटी धीर केला.

हॅलो.तिने ऐकले कि नाही? रागावली आहे बहुतेक. अर्धा तासच तर उशीर झाला होता. राग नुसता नाकाच्या शेंड्यावर. त्याचच चुकलं होतं. येताना तिच्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा आणायला हवा होता. कसा विसरलो मी. पण घाई होती ना. ती वाट पहात असेल म्हणून पळत आलो.

मिस्टर, खर तर तुम्ही टॅक्सी करायला पाहिजे होती.

टॅक्सीच केली होती पण...

पण काय?...”

मला जरा हिच्याशी बोलू द्याल का? नंतर मी सांगेन सविस्तर.  सुलू, प्लीज... इकडे माझ्याकडे बघ एक क्षण. रागावू नकोस ना. तू रागावलीस ना कि माझा जीव कासावीस होतो. टांगणीला लागतो.

सागराच्या लाटावर लाटा. काय उपयोग?

हिला ऐकू येत नाहीये का? कि मुद्दामहून दुर्लक्ष?

तो उठला. तिच्या समोर जाऊन उभा राहिला. तरीही तिचे लक्ष नाही. आरपार नजर. त्याने आवाज चढवला. अक्चुली ओरडला.

ऐक सुलू ऐक. ह्या रोरोवणाऱ्या सागराला साक्षी ठेवून सांगतो आहे. आय लव यू.

दाही दिशातून त्या आक्रंदनाचे प्रतिध्वनी उमटले.

सुलू, आय लव यू. आय लव. लव लव ल... यू ...

तिने आपल्या चिमुकल्या मनगटी घड्याळ्यात पाहिले. त्याची यायची वेळ टळून गेली होती.

आता थांबण्यात काही अर्थ नव्हता. ती आपल्या पर्स मधून छोटा रुमाल काढते. डोळे पुसते. पूर्वी डोळ्यात अश्रू यायचे.

उद्या पुन्हा इथेच ह्या बेंचवर. वाट बघायची.

ती उठली. पर्स सावरली. परतीची वाट चालायला लागली.
ती येते आणिक जाते.
येताना आशा घेऊन येते.
जाताना निराशा घेऊन जाते.

सात वाजले. भेळवाल्याने मनोमन नोंद केली.

Comments

Popular Posts