पंचवीस वर्षापूर्वी आणि नंतर. 1

 

I always think of him when the snow falls

मी आणि वसंत आबाजी सावळे.  दोघजणं  जीवश्च कंठश्च मित्र. एकाच कॉलेजमधून पास झालेले. आम्हा दोघांनाही एकाच प्लांटमध्ये नोकरी मिळाली. दोघांनी एकत्र रहावं म्हणूनच  विचार न करता ती नोकरी स्वीकारली. नोकरी काही खास नव्हती. बरी होती. पैसा बरा मिळत होता. ह्या पलीकडे विचार केला नव्हता. कदाचित वाट पाहिली असती तर चांगली मिळालीही असती. पण खात्री नव्हती.   दोघेही लोवर मिडल क्लासमधून आलेलो. कुणाच्या बापाच्या कुठेही ओळखी पाळखी नव्हत्या. आम्ही दोघांनी  शिकून डिग्री कमावली ह्याचेच  मुळी आमच्याच्या आई बाबांना अप्रूप. माझ्या आईचे मराठी वाचण्या इतपतच शिक्षण झालेलं. बाबा एका मोठ्या दुकानात हिशेब लिहायचे काम करत. आळीतल्या मारुती मंदिरात कीर्तन असेल तर बाबा कधी पेटी, कधी तबला जस पडेल तस वाजवत असत. वेळ पडली तर बुवांच्या मागे टाळ घेऊन री ओढायलाही तयार, बुवांना कपाळी बुक्का लावून मग आरतीचे तबक फिरवणार. अश्या सीध्या सरळ पापभीरू घरात वाढलेला मी. वसंताचीही माझ्या बॅकग्राउंडशी  मॅचिंग बॅकग्राउंड.
तशी नोकरी चांगलीच होती. पण एव्हढचं कि घरापासून दूर गावी होती. आणि शिफ्ट कराव्या लागत असत.
तुम्हा नाईन टू फाईव ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना शिफ्टचा इंगा नाही समजणार. प्लांटचं काय असतं कि तो 24by7 अथक चालू असतो. त्यामुळे त्याची काळजी घ्यायला त्याच्या आवती भोवती इजिनिअर्स आणि ऑपरेटर्स भिरभिरत असतात. चोवीस तास तीन शिफ्टमध्ये. सकाळी आठ ते दुपारी चार ह्याला B शिफ्ट म्हणतात. C शिफ्ट म्हणजे दुपारी चार ते रात्री बारा. रात्री बारा ते सकाळी आठ ही A शिफ्ट. शिफ्टमध्ये काम करायचा प्रॉब्लेम काय आहे ना की ती दर आठवड्याला बदलत असते. म्हणजे प्रत्येक आठवड्याला तुमचे बॉडी क्लॉक रिसेट करावे लागतं. पहिल्या पहिल्यांदा खूप त्रास होतो, पण नंतर सवय होऊन जाते. मानवाची ही आश्चर्यकारक शक्ति आहे. तो कोणत्याही खडतर परिस्थितीशी जमवून घेतो. तुम्हाला ती बेडकांची गोष्ट माहिती आहे का? बेडकाला तुम्ही उकळत्या पाण्यात सोडा. तो जीवाच्या आकांताने ताडकन उडी मारून बाहेर पडेल. तेच त्याला पाण्यात सोडा आणि पाण्याचे तापमान हळू हळू वाढवा. हजारो वर्षांनी उकळत्या पाण्यात सुखेनैव विहार करणारे बेडूक तयार होतील.
तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. आमच्या बरोबर एक टर्बाईन ऑपरेटर होता. पंचवीस वर्षे त्याने शिफ्टमध्ये टर्बाईन ऑपरेटर म्हणून काम केले होते
!  टर्बाईन फ्लोअरवर नॉइझ लेवल खूप हाय असते. त्यामुळे कि काय तो हळूहळू बहिरा होत गेला. त्याची बायको नेहमी तक्रार करायची की ह्यांना काही ऐकू येत नाही. बाजारातून भाजी आणायची असेल तर बायको त्याला काय काय आणायचे आहे ते लिहून द्यायची. त्याला चुका आणायला सांगितले तर तो हार्ड वेअरच्या दुकानातून खिळे घेऊन येणार. पण प्लांट मधल्या त्याच्या सहकाऱ्याचा   त्याच्याबद्दलचा अनुभव मात्र उलट होता. बाजूला टर्बाईन घोंघावत असताना तो कुजबुजला तरी त्याला स्वच्छ ऐकू येत असे. इतरांना  मात्र एकमेकांशी बोलताना टर्बाईनच्या वर ताण ओरडून बोलावे लागत असे.
सुरवातीचे एक वर्ष ट्रेनिंगचे वर्ष होते. आता ट्रेनिंग बद्दल लिहायचे तर वेगळा लेख लिहायला पाहिजे. एव्हढेच म्हणता येईल कि त्यावेळचे जीवन म्हणजे एक विनोद होता. केवळ अवती भोवती मित्र मंडळ होते म्हणून तो “विनोद” सुसह्य होता.
ह्या गोष्टीत जवळच्या रेल्वे स्टेशनचा महत्वाचा सहभाग होता. म्हणून त्याबद्दल थोडे लिहिणे भाग आहे.
ज्या प्लांटमध्ये मी आणि वसंत  काम करत होतो तो दगडी कोळशावर चालणारा प्लांट होता. दर तासाला साधारणपणे २०० टन कोळसा खाणारा प्लांट होता. म्हणजे जवळपास दोन दिवसाला एक कोळशाची गाडी यायला पाहिजे असा हिशेब. प्लांट मुंबई कोलकाता लाईन वर होता.  प्लांट यायच्या आधी पासून तिथे एक छोटसं स्टेशन होतेच. आजूबाजूला काही गावं होती. त्या गावकऱ्यांच्या सोयी साठी. पूर्वी तिथे फक्त प्यासेंजर गाड्या थांबत. पण प्लांट आल्यावर मात्र स्टेशनला थोडे बरे दिवस आले.  लोकांची ये जा वाढली. काही फास्ट प्यासेंजर गाड्या थांबू लागल्या. स्टेशनवर चहाचा ठेला आला. वर्तमानपत्र आणि पुस्तकांची गाडी फिरू लागली. मुंबईच्या पेपरांच्या लेट एडिशन  मिळू लागल्या. “मनोहर कहानिया” टाईपची मासिक मिळू लागली. एखाद्या वटवृक्षाच्या आधारे जशी एको-सिस्टीम फुलते तशी, स्टेशनच्या आधाराने एक गाव आकार घेत होते.
पॉवर प्लांट आणि रेल्वे स्टेशन ह्यांचे एक अतूट नाते असते. दोघांनाही एकमेकांची गरज असते. थर्मल प्लांटमध्ये वाघिणीतून कोळसा उतरवून घेण्यासाठी स्वतंत्र प्रणाली असते. ही यंत्रसामग्री सुस्थितीत ठेवणे मोठं जिकीरीचे काम असते. कोळशाची गाडी प्लांटच्या यार्डमध्ये आली कि ठराविक वेळात कोळसा उतरवून गाडी परत पाठवायची जबाबदारी प्लांटची. उशीर झाला तर दंड भरावा लागत असे. मग ही गोष्ट थेट हेड ऑफिसमध्ये जाऊन धडके आणि तिथे मोठ्या साहेबाला पाण्यात पाहणारी एक गॅंग होतीच. चान्स मिळाला की गॅंग वॉर सुरु.
हा दंड टाळायचा असेल तर एकच मार्ग आणि तो म्हणजे स्टेशन मास्टरशी सलोख्याचे संबंध ठेवणे. जर प्लांट अडचणीत असेल तर स्टेशन मास्टरच्या दाढीला गोंजारून कोळशाची गाडी स्टेशनवर काही तास थांबवणं शक्य असते.
जसा  प्लान्टला स्टेशन मास्टरच्या दाढीला हात लावावा  लागतो तस स्टेशन मास्टरला पण मोठ्या  साहेबाची गरज पडायची. स्टेशनपासून पंधरा वीस किलोमीटरवर प्राचीन शिवालय आहे. रेल्वेच्या बड्या बड्या अधिकाऱ्यांना सहकुटुंब सहपरिवार ह्या तीर्थक्षेत्राची यात्रा करायची हुक्की यायची. ऑफ़िशिअल टूरचे निमित्त करून मंडळी येत. रेल्वेचा बडा ऑफिसर म्हणजे काय त्याचा थाट. पण तो सगळा नखरा कुठे तर रुळावर. खाली रूळ नसतील त्या ऐवजी  जर का सिमेटचा रोड असेल तर ह्यांना कोण विचारणार हो.
अशावेळेला मग स्टेशन मास्टरला प्लांटच्या मोठ्या साहेबाची आठवण  यायची. साहेब पण उदार मनाने स्वतःची अडचण करून, आपली खाशी  अॅंबॅसेडार गाडी ड्रायव्हर सह पाठवून द्यायचे साहेबलोकांच्या सरबराईसाठी. प्लांट चालवणे साधे काम नाही. तेथे पाहिजे जातीचे. जमत नसेल तर इकडे फिरकायचे नाही. काय?
वश्याला आयुष्य म्हणजे नुसता विनोद वाटायचे. “प्रेम”, “आदर”, “भावना”, “भक्ति”, असे शब्द कानी पडले की त्याची हसता हसता पुरेवाट व्हायची. त्याच्या बरोबर हिंदी पिच्चर  बघणे म्हणजे मोठे जोखमीचे काम. भीती ही वाटायची की आजूबाजूचे लोक उठून मारायला धावतील. तिकडे पडद्यावर नायक नायिकेच्या प्रेमाच्या आणाभाकाकांची देवाण घेवाण चाललेली वश्याला कशी सहन होणार? इकडे ह्याची वाटेल त्या कमेंट टाकायला सुरवात,
“अग, हा तुला फसवणार आहे.”
“अबे ओ इत्ता समझता नाही क्या. लौंडी तेरे पैसे के पीछे है.”
“अरे सोड तिला...”

तो आणि त्याच्या उटपटांग थेरया.
वश्याने हिंदी चित्रपटांच्या स्टोरीचा फ्लो डायग्राम बनवला होता. स्टार्ट > निवडा> १)हिरो गरीब, हिर्वीन श्रीमंत. २)हिरो कोट्याधीश, हिर्वीनला संध्याकाळचे जेवण भेटणे मुश्कील वर आई/बाबा क्षय/कन्सर/हृदय रोगाने बेजार. कापऱ्या आवाजाने डायलॉग टाकणार, “बेSSSटी... कहा जा राही हो?” “बाबा, मै अभी गयी और अभी आई.” चालली मिलने सजनको. गाण्याचा स्पॉट. डायरेक्ट उटीला. ह्या ऑप्शनला चार पाच सबऑप्शन फुटणार.३) दोघेही श्रीमंत/गरीब...
आता विलनचे चार पाच टाइप्स...
सगळा डायग्राम इथे वर्णन करणे कठीण आहे. तर वश्या असा अफाट होता.

 

आज पाचवा दिवस. वसंताचा पत्ता नव्हता. डोळ्याचे पाते लवते ना लवते तेव्हढ्यात वसंता नाहीसा झाला होता. त्याचे शेवटचे शब्द होते, “आयला.”
इथे लिहा.
रात्रीची शिफ्ट सकाळी आठ वाजता संपते. आज बाजूच्या बॉईलर डेस्कवर वसंताच्या ऐवजी कोळे होता. तो कावला होता, त्याची बिचाऱ्याची जनरल शिफ्ट होती.
“ह्या वश्याने मला नाईटमधे फसवलं. माझी चांगली जनरल चालू होती तर ह्याने मधेच पाय घातला.  लोकांना बघवत नाही. $&@ साला. ए बे केश्या, कुठे गायब झाला तुझा पार्टनर?”
मी काय सांगणार? कालपासून जो भेटेल तो हाच प्रश्न विचारत होता. वश्या कुठाय.
वश्या माझा  दोस्त होता. अगदी जिवाभावाचा. पण मी  काय त्याचा बाप नव्हतो का त्याची माय नव्हतो. कि तो मला सांगून बाहेर जाईल. जर न विचारता, न सांगता तो कुठे गेला तर त्याला मी  काय करणार? वश्या कुठे आहे म्हणून कोणी विचारले कि मग मी शर्ट पॅंट चे खिसे उलटे पालटे करून दाखवायला लागलो. “नाई ब्बा, माझ्या खिशात तर नाई.”
पण मनातून मी वश्यावर जाम उखडलो होतो.
वसंता बरोबरीने असला कि नाईटमध्ये आम्ही दोघं आळीपाळीने थोडा थोडा वेळ “विश्रांती” घेत असू. आज मात्र अजिबात मूड नव्हता. वश्या कुठे असेल, काय करत असेल ह्याच विचारात मन अडकलेलं. कधी वाटायचं गेला असेल घरी. आपण कशाला काळजी करा? येईल दोन तीन दिवसांनी आपसूक. पण मला राहून राहून एका गोष्टीचे नवल वाटायचे ते हे कि त्याला त्या गाडीत असे काय दिसलं कि तो जीव खाऊन पळत जाऊन त्याने ती चालती गाडी पकडली? जणू काय त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. पाय सटकला असता नि गाडीखाली गेला असता बाराच्या भावात म्हणजे मग?
मधेच प्लांटमध्ये इमर्जन्सी आली. ऑपरेटर नेहमीच्या सरावाने परिस्थिती हाताळत होते. पाठीमागे आमचा शिफ्टचार्ज उभा होता. वश्याच्या नादात मी कुठलातरी पंप बंद करणार होतो. तेव्हड्यात शिफ्टचार्जने माझ्या हातावर फटका मारला. मी एकदम वश्याला झटकून टाकला आणि भानावर आलो.
“अबे काय करून रहायलास बे? काय डोस्क आहे कि खोकं? धून मध्ये काम करताय का? आता प्लांट ट्रिप केला असतास ना. बिस्तर गोल नि सबकी खटीया खडी.”
“सॉरी सर.”
“सॉरी तेरी नानी. प्लांट नॉर्मल कर आणि माझ्या केबिन मध्ये ये.”
ह्या वश्या मुळे सगळ्यांच्या समोर माझ्या इज्जतचा आज असा फालुदा झाला होता.
शिफ्टचार्जचे नाव होते धांडे. भला माणूस होता. सर्वाची काळजी घेणारा. त्यांच्या केबिनमधे पोचल्यावर  म्हणाले, “केशव काय प्रॉब्लेम आहे?” मग त्यांनी मुद्द्यालाच हात घातला.
“केशव, वश्याड पाटील कुठे गायब झाला आहे. निरोप नाही, चिठ्ठी चपाटी नाही.  सुट्टीचा अर्ज नाही. तू पण काही बोलला नाहीस. प्रायव्हेट मध्ये नोकरीला असता ना तर महिन्याचा पगार हातावर ठेवून गेट बाहेर काढला असता. इथे काय कसेही वागा. कोण विचारणार? अरे बोल काहीतरी. नुसता मुखस्तंभासारखा उभा आहेस?”
पुन्हा तेच. माझं डोकं ऑफ झालं. मी बसलो होतो तो उठून उभा राहिलो आणि जोरात ओरडलो, “सर मला माहित नाही. खरच मला काही माहित नाही.”
“खाली बस. आवाज कमी कर. कुठे आहेस कुणाशी बोलतो आहेस ह्याचा विचार कर. शांत हो. सावर.”
मी अगदी रडवेला झालो होतो. ज्याला मी वश्याचा पाचकळ विनोद समजत होतो तो आता माझ्या अंगावर यायला लागला होता.

 

 

मोठ्या साहेबांनी सविस्तर ऐकून घेतले. त्यांनी थोडा विचार केला. त्यांनी बहुदा मनातल्या  मनात हे प्रकरण कस निपटायचे ह्याचा आराखडा बनवला असावा.

 


 

 


Comments

Popular Posts