क्रॉसओव्हर आणि परत माघारी

 

 

 

क्रॉसओव्हर आणि परत माघारी

 

नोकरीसाठी वणवण पायपीट करणाऱ्या चिंटूसाठी आजचा दिवस महत्वाचा होता.

नोकरीसाठी दिसेल त्या ठिकाणी अर्ज टाकण्याचा त्याने सपाटा लावला होता. एमएस्सी फिजिक्स करून देखील त्याला म्हणाव्या तश्या नोकरीचे इंटरव्यू कॉल देखील येत नव्हते. नोकरी मिळायची तर गोष्टच  निराळी, त्याने कुठे कुठे अर्ज नाही केले? काही दिवस त्याने कुरिअर बॉयची नोकरी केली, काही दिवस मॉलमध्ये सामान हलवून शेल्फवर लावायची हमाली केली. काही दिवस कॉल सेंटर मध्ये नोकरी  करत परदेशी लोकांच्या शिव्या खाल्ल्या. ज्या वेगाने त्याने नोकऱ्या धरल्या त्याच  वेगाने सोडल्या. कारणंही तशीच होती.

एकदा मॉलमध्ये बिस्किटांचे पुडे रॅकवर लावताना त्याला कॉलेजमधली सोनाली भेटली. अय्या तुम्हाला पण ही बिस्किटं आवडतात? मला पण! आपल्या आवडी निवडी कित्ती मिळत्या जुळत्या आहेत नै. तू काय करतोस सध्या? ”

मी ना? मी फलाणा ढिकाना कंपनीत अमुक तमुक आहे.मी कशी बशी वेळ मारून नेली. दुसरे काय सांगणार? एकदा वाटले की तिला सांगावे, मी इथे डिस्प्ले मॅनेजर  आहे म्हणून. आणि तू काय करते आहेस?”

मी ना मी किनई कायाकल्प क्लिनिक मध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर आहे.

म्हणजे ही बहुतेक रिसेप्शनिस्ट असणार. आज इथे आमच्याकडे  डिस्प्ले मॅनेजरच्या पोस्टसाठी इंटरव्यू होते. त्यासाठीतर ही आली नसेल ना? मी तत्काळ ती नोकरी सोडून दिली. मॉलमध्ये, कुरिअरवाल्यांकडे काय किंवा कॉल सेंटर मध्ये काय नोकऱ्या केव्हाही मिळतात. आता पहा माझ्या ओळखीचा एक सिनिअर आहे. त्याने पैसे भरून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. त्याचा बाप व्यवहारी होता. इंजिनिअरिंगला काही लाख टाकण्यापेक्षा तेव्द्याच पैशाचे बँकेकडून कर्ज घेऊन चहा, भजी, वडापावचा स्टॉल टाकणे ज्यास्त फायदेशीर आहे असं त्याचं प्रामाणिक मत होते. त्याने मुलाला निक्षून सांगितले, “हे तुझ्याचानं आणि माझ्याचानं होण्यासारखे नाही. तुला अभ्यास झेपणार नाही आणि मला खर्च झेपणार नाही. तेव्हा हा नाद सोड.  मुलगा बापापेक्षा जास्त जिद्दी.  तुमच्याकडे पैशासाठी तोंड वेंगाडणार नाही. मग तर झालं?” त्याला दरवर्षी एटीकेटी का काय ते मिळत गेली. कॉलेज बंद झाले की तो कॉल सेंटरला जाऊन नोकरी करायचा, थोडे पैसे जमवायचा. एटीकेटी सरली की पुन्हा कॉलेज सुरु. असं करत करत तो सहा वर्षांत बीई झाला. त्याच कॉल सेंटर मध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी सुरु केली. ते कॉल सेंटर म्हणजे जणू काय त्याचं दुसरं घर होतं.

तर नोकरीसाठी वणवण पायपीट करणारया चिंटूसाठी आजचा दिवस महत्वाचा होता. त्याला त्याच्याच कॉलेजमध्ये फिजिक्स डिपार्टर्मेंटमध्ये डेमोचा इंटरव्यू कॉल होता. ही नोकरी त्यालाच मिळणार ह्याची त्याला खात्री होती. सरांशी-म्हणजे एचओडींशी- त्याचं बोलणं झालेलं होत. सारं काही सेट झालं होत. इंटरव्यू केवळ नाममात्र, सोपस्कार म्हणून.

चिंटूचे तीर्थरूप त्याला नेहमी ऐकवत असत, ते आज ही बाहेर पडायच्या वेळेला बोलले, “चिंट्या लेका, तुझ्या कुंडलीत ग्रह असे फिट्ट जागा पकडून बसले आहेत की. त्यातून आज आहे अमावस्या. वर शुक्रवार- तुझा घातवार. बघ ट्रायल घेऊन बघ काय होत ते.चिंटू तीर्थरूपांचे असे बोल मनावर घेणाऱ्यापैकी नव्हता. कारण हे डायलॉग रोजचेच झाले होते.

बाबा, बघा आज मी नेमणुकीचे पत्र घेऊनच घरी येणार!

अस्स? अरे वा!बाबा त्याची चेष्टा करत उद्गारले, “हा पहा आमचा शूरवीर चिंतो अप्पाजी चालला ग्रहगोलांशी  कुस्ती खेळायला. आकाशस्थ देवदेवतांनो  ढोल, नगारे, पडघम, शंखभेरी, श्रृंगें, टिमकी, तुताऱ्या, दुंदुभी, काहाळ, धामामा, पुंगी, टाळ, मृदंग, मोहरी  सगळी वाद्ये वाजवा आणि पुष्पवृष्टी करून आमच्या चिंटूला आशीर्वाद द्या.

चिंटू  ह्या कुचेष्टेकडे दुर्लक्ष करीत कॉलेजकडे निघाला. कॉलेजला पोचला तर काय सगळीकडे ओसाड. चिटपाखरू पण नाही. धडधडत्या अंतःकरणाने पुढे गेला. तो बाहेर काळी पाटी!

कळवण्यास अतीव खेद आहे की आपल्या सर्वांचे आवडते, लोकप्रिय प्राध्यापक मा. डॉक्टर फिकीरनॉट आज सकाळी आठ वाजून चार मिनिटे आणि साडेबत्तीस सेकंदांनी ईश्वर चरणी विलीन झाले. देव मृतात्म्यास शांति देवो. शोकसभा संध्याकाळी ठीक साडेसहा  वाजता ए-६  क्लासरूम मध्ये.

हुकमावरून.

कुठला इंटरव्यू आणि कसल काय. अश्याप्रकारे चिंटूच्या तीर्थरूपांची बत्तीशी खरी ठरली. चिंटूने स्वतःला ढकलत  ढकलत घराची वाट पकडली. चिंटू चालू लागला.

रेल्वेचा क्रॉसओवर ब्रिज ओलांडला की पलीकडे त्याला घराकडे जाणारी बस मिळणार होती.पुलावर नेहमीप्रमाणे खेचाकेच गर्दी होती. तिकडे जाणाऱ्या आणि तिकडून इकडे येणाऱ्या लोकांची गर्दी. लोक इतक्या घाईत की आयुष्य जणू काय त्या क्रॉसओव्हरवर अवलंबून होते. पलीकडे गेले की तेथे सुखाची सुपर फ़ास्ट एक्सप्रेस गाडी उभी असणार. घाई करायला पाहिजे नाही तर ती चुकायची! सगळ्या लोकांप्रमाणे चिंटूदेखील क्रॉसओव्हरच्या शोधात होता. पण हा पूल निश्चितच क्रॉसओव्हर नव्हता.

आज मात्र चिंटूला पलीकडे जायची घाई नव्हती. एक बस तर चुकली होतीच. अजून एक चुकेल! काय फरक पडतो? नशिबात असेल तर ती पण चुकणार नाही. घरी जायला हजार बश्या आहेत. घरातून बाहेर पडायला एकपण नाही. नशिबांत काय असेल ते होईल. पुलावर चालता चालता पूल कोसळला तर? दुसऱ्या बाजूच्या निसरड्या घसरड्या लोखंडी  जिन्याच्या पायरीवरून पाय घसरला तर?

आयुष्याचे ओझे उचलत चिंटू जिना चढून वर आला. वर पुलावर नेहमीसारखीच माणसांची खेचाखेच गर्दी होती. लोकांनी तऱ्हेतऱ्हेचे स्टॉल लावले होते. काहीजण जमिनीवरच पथारी पसुरून माल विकत होते. एक म्हातारी मिरच्यांचा वाटा लावून गिऱ्हाईकांची अधाशीपणाने वाट पहात होती. दुसरीकडे काळी टोपीवाला जोशी पोपट घेऊन बसला होता. समोर एक पाटी होती,

"देशबंधुंनो विचार करा, टॅॅरटपेक्षा पॅॅरट खरा."

त्याच्यासमोर कोणी दीनवाणा बापुडा होऊन आपले रडगाणे गात होता. जोश्याने पोपटाच्या पिंजऱ्याचे दार उघडून पोपटाला मोकळे केले. पोपटाने तिरकी मान करून समोरच्याला एकदा नीट बघून घेतले, त्याच्या आयुष्याची कहाणी वाचली आणि एक पाकीट उचलून जोश्याच्या समोर टाकले. घे लेका तुझे भविष्य! जोश्याने बाजरीचे चार दाणे पोपटासमोर फेकले. पोपटाने त्यांच्याकडे तुच्छतापूर्वक दुर्लक्ष केले आणि तो पोपटांच्या जीवनाचे सारह्या विषयावर गहन विचारमंथनात गढून गेला.

लई माज चढला आहे रे तुला. फुकटचे गिळायला मिळतय ना.

( चिंटूला क्षणभर वाटले कि आपले तीर्थरुपच बोलतायेत.)

जोश्याने पाकीट उघडून उकिडवा बसलेल्या समोरच्याला दिले.

तुझ्या भविष्याचा तूच वाचनकार! बेटा वाच तुझे भविष्य तूच वाच.

समोरच्याने निराशेने मान हलवली, “वाचता येत असतं तर आज मी कुठल्यातरी सोसायटीच्या गेटावर वाचमन नसतो झालो? तुम्हीच वाचा आणि मला सांगा.

पाकीट उघडून जोश्याने छापील भविष्य वाचून दाखवायला सुरुवात केली.

पल्याड डोक्याला लाल पटका बांधलेला वैदू घोरपडीचा काढा आणि शिलाजित विकत होता. शिलाजित हासिल करायला किती जोखीम उचलावी लागते ते दाखवणारा चित्र फलक पुलाच्या कठड्यावर टांगलेला होता. त्या चित्रांत एक वैदू सिंह, अस्वल, मगर, अजगर ह्यांच्याशी लढत गिर्यारोहण करत पर्वतावरून शिलाजित आणणार असतो.

इकडून जाताना कधी चिंटूला आपले भविष्य बघायची हुक्की येत असे. पण आज त्याची गरज नव्हती. त्याचे भविष्य आता भूतकाळात जमा झाले होते. त्याला पुलावरच्या कोलाहलाची, गोंगाटाची आणि कलकलाटाची  टोकदार जाणीव झाली. गर्दीत कुणीतरी त्याला धक्का दिला आणि सॉरी म्हणायच्या ऐवजी उलट शिवी देऊन पुढे गेला. चिंटूने खिसे तपासले. पाकीट पैसे शाबूत असल्याची खात्री करून घेतली.(पाकिटात फक्त दहा रुपयेच होते म्हणा.) त्याने अर्धा पूल मागे टाकला होता.

पुलाच्या बाजूला थोडी बघे लोकांची गर्दी होती. गंमत म्हणून चिंटूने डोकावले. हा सेल्समन पुलावर नवीनच होता. एका घडीच्या टेबलावर छोट्या बाटल्या पडल्या होत्या. एक सँपल हातांत घेऊन तो जोरजोरांत लेक्चरबाजी करत होता. मेहेरबान कद्रदान! दस रुपयोमे आपकी जिंदगी बनावो! दस रुपयोमे आपका लंगडा नसीब  भागने लगेगा. क्या दस रुपये आपके जिंदगीसे भारी है? क्या आपके हरेक काममे बाधा आ रही है? क्या आपके जिंदगीमे बदलाव लाना चाहते है?”

ऑफ कोर्स!चिंटू स्वतःशीच बडबडला. दहा रुपयात जर नशीब बदलत असेल तर काय हरकत आहे? जर  हा माणूस फ्राड असला तर? असु दे. लोक कोटी कोटींचा गफला करून गायब होतात. तिकडे पुलाच्या खालच्या बाजूला पन्नास रुपयात टेरीकॉटचा शर्ट विकणारे, पाचशे रुपयात मोबाईल विकणारे, जमिनीवर हातरुमाल पसरून तीन पत्ते फिरवणारे बोलो एक्का किधर गया राणी किधर हैअजूनही असेच कितीतरी. तो सगळा पूल आणि आजूबाजूचा परिसर ह्यासाठीच तर प्रसिद्ध होता. पलीकडे चित्रपटगृह होते. तिथं काय चालत होतं? तिकिटाचे दोनशे रुपये वसूल करून लोकांना खोटी स्वप्ने विकायचा धंदा. तो मात्र मोठा सज्जनपणाचा.

जिंदगीमे बदलाव लाने के लिये चिंटू गर्दीत घुसला. चिंटूसाठी आजचा दिवस निराळाच होता. बदनसीबका मारा क्या कुछ नही करेगा. एक डाव ह्या बाटलीचा. होऊन जाऊ दे. गेले दहा रुपये तर गेले.

जीवन बदलूबाटली विकणारा एकदम हिरो स्टाईल होता. त्याचा आवाज, त्याची बोलण्याची पद्धत  चिंटूला मोहिनी घालणारी होती. त्याने एक बाटली उचलली. बाटलीचा स्पर्श होताक्षणी त्याच्या शरीरातून अनामिक लहर निघून गेली. बाटलीला नुसता स्पर्श केला तर उत्साह दाटून आला. मग आतले रंगीत पाणी प्यालो तर काय होईल?

घेऊन टाका साहेब. माझ्या मित्राने एक बाटली घेतली तर तर त्याची लाखाची लाटरी लागली. मला पण एक घ्यायची आहे पण खिशात फक्त सात रुपये.चिंटूच्या शेजारचा कोणी बडबडत होता. चिंटू विचारात पडला. घ्यावी कि न घ्यावी. त्याने बाटली पुन्हा खाली ठेवली.

मागून कुणीतरी चिंटूला धक्का दिली,  काय साहेब घेऊन टाका की.तिसरा एक धटिंगण पुढे झाला, “ऐसा नही चलेगा. आपने चमडेका हात लगाया है. अब तो आपको लेनाच पडेगा.हा त्या सेल्समनचा हंडीबाग असणार. चिंटू भांबावला. आपण पुरते फसलो ह्याची दुःखद जाणीव झाली. ही चक्क बळजबरी झाली. इतक्यात पुलाच्या एका टोकाकडून लोक पळत आले. भागो. पोलीस पोलीस. म्यु्नसिपाल्टीवाले आये है. धंदा बंद करो. और भागो.

पथारीवाल्यांची दाणादाण उडाली. सामान सुमान गोळा करून चादरीत, बॅग मध्ये भरून सटर फटर विकणाऱ्यांची पळापळ झाली. काही मिनिटातच पूल रिकामा झाला. गर्दी पांगली. लोक बऱ्या वाईट कॉमेंट्स टाकत चालू लागले.

अरे ये पूरा नाटकबाजी है. अंदरसे सब मिले है.

चिंटूच्या हातात ती रंगीबेरंगी बाटली तशीच राहिली. आयला, मजाच आहे. दहा रुपये खिशात राहिले वर नसीब बदलने वालीती बाटली फुकट!चिंटू खुश झाला. आता पूल उतरून खाली जावे आणि उडप्याकडे जाऊन चहा प्यावा.

अर्थात पूल उतरेपर्यंत त्याच्या जिवात जीव नव्हता. त्या सेल्समनच्या कुण्या पित्त्याने पकडले तर? नाही चिंटूचे नशीब बलवत्तर होते. रंगी बेरंगी बाटली खिशांत टाकून चिंटू झपाट्याने पुढे चालू लागला. बाटलीपरी बाटली मिळाली वर दहा रुपये खिशातल्या खिशांत राहिले. आता स्वस्थ हॉटेलांत जाऊन चहा प्यावा. हॉटेलात तशी गर्दी होती पण चिंटूला जागा मिळाली.. अजूनही त्याला भीती वाटत होती. समजा त्या विक्रेत्याचा कोणी हंडीबाग आजूबाजूला असला तर? नसती आफत यायची. मनाची खात्री झाल्यावर चहाचा घुटका घेत त्याने हळूच खिशातून बाटली बाहेर काढली. चपट्या सहा इंची पव्वाच्या बाटलीच्या सारखीच ती बाटली होती. नाही म्हटले तरी खालीबाटलीवाल्याने पन्नास एक पैशांत ती बाटली विकत घेतली असती. ह्या बाटलीतल रंगी बेरंगी पाणी आपल्या जीवनात क्रांती घडवणार? आपल्याला नोकरी मिळवून देणार? काहीच्या काही मजा आहे खर. म्हणतात ना... दुनिया झुकती है१ झुकानेवाला चाहिये.

मी इथे बसू? नाही म्हणजे तुमचं कोणी इथे बसलं नसेल तर.ह्या वाक्याने चिंटू तंद्रीतून बाहेर आला. चिंटूच्या परवानगीची वाट न बघता तो समोरच्या जागेवर स्थानापन्न झाला सुद्धा. चिंटू थोडा आक्रसून बसला. समोर बसलेला असेल तीसबत्तीसचा. वयापेक्षा जरा जास्त दिसत होता.

अरेच्चा तुम्ही पण घेतली का?” चिंटूच्या हातातल्या बाटलीकडे त्याचे लक्ष होते. आपल्या खिशातून बाटली काढत तो म्हणाला, “ही पहा मी पण एक घेतली. ह्याने काय फायदा होईल? नाही म्हणजे तुम्हाला काय वाटते? मी आपली अशीच घेतली. म्हटलं फायदा झाला तर झाला, नाही तर नाही. काय फरक पडतो?”

हो ना. काय फरक पडतो? दहा रुपयांचा तर प्रश्न आहे. आजकाल दहा रुपयात काय मिळते.चिंटूने त्याच्या होत हो मिसळले.

माझे नाव काशीराम भोईटे. मी भय कथा, विचित्र कथा, थक्कथा अश्या गोष्टी लिहितो. तुम्ही कधी माझे नाव ऐकले आहे? नसणर, कारण मी तुमच्यासारख्या जेंटलमन लोकांसाठी नाही लिहित. माझ्या गोष्टी वाचणारे लोक तिकडे कामगार वस्तीत रहातात. भुंगानावाचे एक साप्ताहिक आहे. त्यांत दर रविवारी माझी एक गोष्ट असते. जरूर वाचा.त्याने इकडे तिकडे खिसे चाचपले आणि आपल्या कापडी पिशवीतून एक मासिक बाहेर काढले, “अरे व्वा. मिळाला. तुमी पण राव काय लक्की आहात. हा पहा पुणेरी माणसेचा ताजा अंक. ह्यांत माझी लाव जगाला भिंगरीनावाची गोष्ट आली आहे. एवढे बोलून काशीने मासिक पुढे केले. नाईलाजास्तव चिंटूने अंक उचलला. तुम्ही काय करता?”

मी? मी चिंटू. गेल्या जून मध्ये ग्रॅजुएट झालो. नोकरी शोधतो आहे.

छान, मिळून जाईल हो. नाव तुमचे चिंतू असेल पण नोकरीची चिंता करू नका. ह्या ह्या ह्या.

भोईटे साहेब, आपली ओळख झाली. बर वाटलं. पुन्हा भेटू

का नाही? अवश्य भेटू. तेव्हढी ती लाव जगाला भिंगरीगोष्ट मात्र जरूर वाचा.

 

 

 

 

 

Zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz

त्या चपट्या बाटलीतले रंगीबेरंगी रसायन प्याल्यावर चिंटूच्या मेंदूत अभूतपूर्व बदल झाले. त्याला कथा लिहिण्याची सुरसुरी स्फुर्ति आली. चिंटूने धाडकन एक विज्ञान कथा लिहून टाकली. 

विज्ञान कथा लिहून लिहून चिंटू तडकला होता. आतापर्यंत जवळ जवळ वीसेक  कथा लिहून झाल्या असतील. कुठल्याही प्रस्थापित प्रतिष्ठित मासिकांत त्याची कथा प्रसिद्ध झाली नव्हती. त्याच्या कथावाचनाशिवाय विश्वाचा गाडा अडला नव्हता कि ठोका चुकला नव्हता. कुणालाही चुकल्या सारखे वाटत नव्हते. चिंटूला ह्या गोष्टीचे राहून राहून आश्चर्य वाटत होते. एवढा महान लेखक कुठल्यातरी चाळीत दहा बाय पंधराच्या खोलीत सपाट जीवनाच्या अफाट पाट्या टाकत होता ह्याची कुणाही मराठी माणसाला ना खंत ना खेद! इये मराठीचीये नगरी आपला जन्म झाला ह्याचे वैषम्य वाटायचे दिवस होते. इंग्रजीवर प्रभुत्व नसणे ह्या क्षुद्र कारणामुळे चिंटूचे तेज झाकाळले गेले होते, नाहीतर आज? जाऊ दे झालं.

पण हे असं किती दिवस चालणार? हिरा कोळशाच्या खाणीत सापडतो म्हणे. पृथ्वीच्या पोटांत दडलेले रत्न कधीतरी पारख्याच्या हाती पडणारच! महान तत्वज्ञ सर भवभूती ह्यांनी म्हटले आहेच की --------
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥

आणि आज अगदी तसेच होणार होते.

कुणीतरी चिंटूच्या  खोलीचा दरवाजा ठोठावत होतं. चिंटूच्या अंगावर काटा आला. हा देणेकरी नाहीतर घरमालक असणार. ह्याला कसा टोलवायचा? सतराशे साठ सबबी सांगून झाल्या होत्या. रोज रोज नवीन कुठून शोधून काढायच्या? विज्ञानकथा लेखक असला तरी काय झालं.

पुन्हा दरवाजा ठोठावला गेला. नाईलाजाने चिंटूने दरवाजा उघडला. काळा सूट आणि काळा चश्मा समोर उभा होता. शेजारच्या खोलीतली चकणी बाई  मजा पहायला दारांत उभी होती. उंची सूट परिधान करणारा कोणी चाळीत पहिल्यांदाच अवतीर्ण झाला होता. चकणी टकामका बघत होती. चिंटूला प्रथम स्वतःची, मग त्या चकण्या शेजारणीची, नंतर चाळीची, मुंबईची आणि सरते शेवटी सगळ्या जगाची लाज वाटली. काळा चश्मा बरोबरच्या धिप्पाड माणसाबरोबर हलक्या आवाजांत काहीतरी बोलला. तो गोरीला लवून म्हणाला, “येस् स्सर.मग दमदार पावले टाकत तो झपाझप गायब झाला. (त्याच्या त्या दमदार चालीने सगळी चाळ हादरत होती.)

काळा चश्म्याने काळा चष्मा राजीनिकांंतच्या स्टाईलने  दूर केला आणि राजकुमारच्या स्टाईलने संवादफेकी चालू केली.

तुम्ही मला ओळखत नसाल. कदाचित असाल देखील. पण मी मात्र तुम्हाला ओळखतो. तुम्ही चिंतामणी आत्माराम बारटक्के. मराठीतील सुप्रसिध्द विज्ञानकथा लेखक. बरोबर आहे न. असणारच. कारण की मी खात्री केल्याशिवाय बोलत नाही. माझी...

चिंटूसाहेब, मी आत येऊ शकतो काय?” नाईलाजास्तव तो मराठीत बोलला.

चिंटूने स्वतःला सावरले, “अर्थात! गरीबाच्या झोपडीत आपले स्वागत आहे.हाडाचा लेखक असल्यामुळे चिंटू असल्या वाक्यांची फेक करणे त्याच्या डाव्या हातचा मळ होता.

त्या इसमाला संकोच वाटत असावा. चतुर चिंटूला त्याचे कारण समजले. त्या दलिद्दर खोलीत केवळ एकच खुर्ची होती. चिंटूने तीच झटकून त्याच्या समोर झटकन पुढे केली, “बसा ना. उभे कशाला?”

त्या सद्गृहस्थाने आवंढा गिळला, “आपण असे करू या का? “हॉटेल सन्नाटा इंटरनॅशनलमध्ये जाऊ या. तिथे आपल्याला निवांतपणे बोलता येईल.

काय उत्तर द्यावे ते चिंटूला समजेना. सन्नाटा मध्ये जाण्यासारखा पोशाख त्याच्याकडे नव्हता. त्या अनोळखी माणसाने स्वतःहून त्याचा प्रश्न सोडवला. ठीक आहे, तुम्हाला इथेच जर कम्फर्टेबल वाटत असेल तर इथेच बोलूया.

प्रथम माझी ओळख करून द्यायला पाहिजे. नाही का?” त्याने बोलायला सुरुवात केली, “मी फारसे वाचत नाही. मराठी तर जवळ जवळ नाहीच. तुमची ती पुणेरी माणसेह्या मासिकांत आलेली अदृश्य होणारा माणूसगोष्ट माझ्या असिस्टंटने त्यांच्या सर्क्युलेटिंग लायब्ररीत वाचली. त्यांत माझे नाव, आमच्या कंपनीचे नाव, आमच्या रिसेप्शनिस्टचे नाव वाचून  त्याला धक्का बसला.  तुमच्या गोष्टीत आमच्या रिसेप्शनिस्टचे आणि आमच्या ऑफिसचे केलेले वर्णन अगदी जुळते. माझ्या  केबिनमध्ये सय्यद हैदर रझा यांचे कॉम्पोझिशन जिओमॅट्रिकहे पेंटिंग आहे हे पण तुम्ही लिहिले आहे. माझ्या असिस्टंटचा आधी असा समज झाला की आमच्या  ऑफिसमधल्या कुणीतरी ही माहिती तुम्हाला पुरवली असणार. त्याला काय वाटले कुणास ठाऊक पण हा आश्चर्यजनक योगायोग बघून त्याने मला गोष्ट वाचायची विनंती केली. ते मासिक माझ्याकडे बरेच दिवस पडले होते. मला वाचायला वेळ मिळायला पाहिजे ना! शेवटी दोन दिवसापूर्वी मी ती गोष्ट वाचली."

आता त्या अनाहूत मानवाचा मोबाईल वाजत होता.

खरेदी करा. तर मी काय म्हणत होतो, माझी. हा प्रथम माझी ओळख करून देतो. मी ईश्वरीलाल रुणझुणरुणझुणवाला. आधी आम्ही म्हणजे आमचे वाडवडील लडिवाला या नावाने प्रसिद्ध होते. तेव्हा आम्ही लडी विकत असू, नंतर आम्ही रुणझुण रुणझुण विकायचा धंदा सुरु केला. झालो रुणझुणरुणझुणवाला! माझी खात्री आहे हे तुम्हाला नवीन असणार. मी खात्री केल्याशिवाय बोलत नाही. माझी बायको..पुन्हा त्याचा फोन वाजला.

विकून टाका.

 

"रुणझुणरुणझुण इज नॉट अ थिंग. इट्स ए कन्सेप्ट! मी  कन्सेप्ट विकतो. पूर्वी काय होतंं कि आपण बहुश्रुत आहोत हे दाखवण्यासाठी इंग्रजी मराठी पुस्तक विकत घेऊन बुककेस मध्ये लाइनिनी ठेवावी लागत असत. दर आठवड्याला ती आपल्या कामवाल्या बाईकडून साफ सुफ करून घ्यावी लागत.  आता तुम्ही काय करायचं की आमच रुणझुणरुणझुण अॅप डाऊन लोड करायचं, आपल्याला पाहिजे त्याला रुणझुणकरायचं, आमच्या साईटवर जाऊन रजिस्टर करायचं. तुम्ही कुणालाही तुमच रुणझुण करू शकता, तुमचा कुत्रा, मांजर, तुमची बेबी, काही लोकांनी प्रेयसीलाच रुणझुण केल. दोन प्रतिष्ठित भेटले कि पूर्वी हवा पाण्याबद्दल गोड तक्रारी एकमेकांना ऐकवत. आता हवा पाण्याची जागा रुणझुणने घेतली आहे. तुमच्या रुणझुणचे फोटो मग तुम्ही ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम वर टाका आणि  लाईक्स  वसूल करत बसा. एक मिनिट.... हा भिंतीवर टांगलेला फोटो कुणाचा आहे? हा काय अंडरवर्ल्डचा दादा आहे का? नाही म्ह्णजे बाजूला गन ठेवली आहे म्हणून विचारलं. हा हा विकून टाक.

तो होय? ते गनधारी बाबा आहेत. माझे बाबा त्यांचे भक्त आहेत.चिंटूने माहिती पुरवली.

कुठल्या सेक्टरमध्ये काम करतात? इन्कमटॅक्स, शेअर मार्केट, राजकारण? का आपल नुसतेच अध्यात्म? मला एका पॉवरफुल बाबाची गरज आहे. स्पोर्ट सेक्टर मध्ये. ते राहू दे. मी काय बोलत होतो बर? हा तुमची ती गोष्ट. त्या गोष्टीतला तो अदृश्य होणारा माणूस!"

लगेच संध्याकाळी मला तो माणूस भेटला.

चिंटू ही कथा कशी विसरणार? त्या कंजूस संपादकाने कथेसाठी पन्नास रुपये द्यायाचे कबूल केले होते. आजवर पै सुद्धा पाठवली नव्हती. आणि आता एक दमडीपण मिळायची आशा नव्हती.

काल संध्याकाळी तो मला भेटायला आला होता. त्याने म्हणे अदृश्य होण्याचे टेकनिक शोधून काढले होते. मी त्या शोधाचे हक्क विकत घ्यावेत किंवा त्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवावेत अशी त्याची इच्छा होती. मी त्याला ठाम नकार दिला आणि ठणकाऊन सांगितले की असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवायला मी काही भोळा सांब नाही. जाताना दरवाजाने  बाहेर जायच्या ऐवजी कानाची पाळीच्या मागची नस दाबून तो अदृश्य झाला. हे सगळे तुम्ही तुमच्या कथेत वर्णन केले आहे तसेच झाले. तो नाहीसा झाल्यावर, माझ्या नजरेसमोर हवेत विरून गेल्यावर मला ४४० वोल्ट विजेचा धक्का बसला. त्याच वेळीच तुमची भेट घ्यायचा माझा निर्णय पक्का झाला. मग मी आज इथे आलो. एवढे वर्णन केल्यावर माझी ओळख करून द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही.

आता शॉक बसायची पाळी चिंटूची होती. म्हणजे तुम्ही रुणझुणरुणझुणवाला, रुणझुणरुणझुणवाला, रुणझुणरुणझुणवाला आणि रुणझुणरुणझुणवाला प्रायवेट लिमिटेडचे एम् डी  ईश्वरीलाल रुणझुणरुणझुणवाला असणार, बरोबर?” चिंटूने लिहिलेल्या कथेत हेच नाव होते. चिंटूने नाव सांगितले खरे पण आता त्याला संशय येऊ लागला.

एक शास्त्रज्ञ अदृश्य व्हायची ट्रिक शोधून काढतो. हे गॅजेट त्याला विकायचे असते म्हणून तो ईश्वरीलाल रुणझुणरुणझुणवाला नावाच्या इन्व्हेस्टरकडे जातो. ईश्वरी त्याला फ्रॉड समजून  ऑफिसमधून हाकलायला बघतो. तर हा त्याच्या डोळ्यासमोरच अदृश्य होतो! काय, आहे की नाही क्लासिक कथा

बरोबर.असा प्रतिसाद देण्याऐवजी भगत म्हणाले, “एक रुणझुणरुणझुणवाला तुम्ही जास्त लावले! काही हरकत नाही. तुमच्या तोंडात साखर पडो. तो एक्स्ट्रा रुणझुणरुणझुणवाला यायच्या मार्गावर आहे. मी ज्या कामासाठी आलो आहे त्याबाबत बोलतो. तुम्ही मला सांगा भविष्यांत घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला आधीच कशा समजतात? का उलट तुम्ही लिहिता तसे भविष्यांत होते? ही विद्या तुम्ही कशी हस्तगत केलीत? कुणी तुम्हाला ही शक्ती प्रदान केली? का तुम्हाला कर्णपिशाच्च वश झाले आहे?”

प्रश्नांच्या भडीमाराने चिंटू भांबावून गेला होता. हे पहा साहेब, मला ह्या प्रकाराची काडीमात्र कल्पना नाही. आता आपण म्हणता आहात म्हणजे असे काहीतरी झाले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. माझा स्वतःचा असल्या भाकड कथांवर अजिबात विश्व्सास नाही. आणि हो जर तुम्ही त्या माणसाला शोधायला म्हणून इथे आला असाल तर तुमची घोर निराशा होणार आहे. ह्याही पलीकडे जाऊन तुम्हाला अजून जास्त चवकशी करायची असेल तर इथून दोन चाळी सोडून तिसऱ्या चाळीत  एक आमच्या गावचा पंचाक्षरी देवॠषी आहे. त्याची गाठ घ्या. तो असा सरळ बधणार नाही. फार आतल्या गाठीचा माणूस आहे तो. बरोबर आहे म्हणा. हल्ली गवरमेंटचे बारीक लक्ष असते म्हणे. पण माझे नाव सांगितलेत तर घेईल कदाचित तुमची केस. पहा ट्राय करून. काम झाले तर पैशे द्यायचे.

चिंटूला वाटले, आपण जरा जास्त बोललो तर नाही. पण रुणझुणरुणझुणवाला साहेबांनी शांतपणे ऐकून घेतले. चिंटूचे बोलणे संपल्यावर ते बोलायला लागले, “हे पहा, आपण समजता तितका मी मूर्ख नाही. तुम्ही गोष्ट लिहिलीत ती पूर्ण झाली. त्या कथेत जेव्हढे कथानक होते  ते प्रत्यक्षांत झाले. कथा संपली, प्रत्यक्षांत उतरली आणि विरून गेली.  रात गयी बात गयी!  मी तुम्हाला भेटायला आलो त्याचे कारण वेगळे आहे. तुम्ही बेस्केट बघता की नाही?”

संभाषण चिंटूच्या गोष्टीवरून बेस्केटवर गेले. एके काळी बेस्केट ऊर्फ ला घोरी  हा देशातला  अत्यंत लोकप्रिय खेळ होता हे काय सांगायला पाहिजे? “हो, त्याचा इथे काय संबंध?”

त्या खेळाचे देशांतील जी नियंत्रण करणारी संस्था आहे तिचा मी सीइओ आहे.त्याने आपल्या कार्ड केस मधून एक कार्ड काढून माझ्या समोर ठेवले.

त्याचे काय?” चिंटूच्या  डोक्यात अजूनही प्रकाश पडत नव्हता.

त्याने आपल्या कोटाच्या खिशातून पिस्तुल काढून टेबलावर ठेवले. चिंटू मनातून चरकला. हा रुणझुणरुणझुणवाला दिसतो तितका साधा नाही.

आता मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जाणार नाही अशी मला आशा आहे. माझ्या म्हणण्याचा मतितार्थ असा की मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जायला नाही पाहिजे.

हार्डी बॉइजच्या कथा वाचून चिंटूला एक गोष्ट चांगली माहीत होती की ज्याच्याकडे पिस्तुल असते त्याच्याशी कधी आर्ग्युमेंट करायचे नसते. हो नाही म्हणायचा प्रश्नच  नव्हता.

पूवी बेस्केटच्या काही काही मॅचेस आम्हाला फिक्स कराव्या लागत होता. फिक्स म्हणजे काय ते माहीत आहे ना?”

म्हणजे थोडं थोडं ऐकून आहे.चिंटू घाबरत बोलला.

आम्हाला फिक्सिंग नाईलाजाने करावे लागत होते. का? त्याला अनेक कारणे आहेत. त्याच्याशी तुम्हाला देणंघेणं  नाही. पूर्वी  आमच्याकडे एक रायटर होता. तो आमच्यासाठी स्क्रिप्ट लिहित असे. ते स्क्रिप्ट दोन्ही संघाच्या जबाबदार खेळाडूंना, कोचना आणि मालकांना समजाऊन सांगावे लागत असे. बऱ्याच वेळा काहीतरी घोळ होत असे. म्हणजे असंं की काही खेळाडू फॉर्मांत यायचे; त्यांचे त्यांच्या खेळावरचे नियंत्रण जात असे. काही नेम चुकायचे. काही वेळा घाईघाईत "ला गोरी" नियमाप्रमाणे लावली गेली नाही तर ती रद्दबातल  होत असे. मग काय सगळा खेळ हे-वायर! खूप डायसी होता सगळा प्रकार. खेळ स्क्रिप्टबरहुकूम झाला नाही तर बऱ्याच लोकांचे नुकसान व्हायचे. आणि खेळ स्क्रिप्टबरहुकूम झाला तर, खेळ लुटूपुटूचा नुरा चालला आहे असा संशय लोकाना येऊ लागायचा. सगळीकडे आरडाओरड झाल्यावर  स्क्रिप्टिंग बंद करण्यांत आले.

ह्या राजेशाही खेळाचा असा पचका, बोऱ्या, फज्जा, विचका-- काहीही म्हणाझाल्यावर माझ्या आधीच्या सीइओने  त्याची जबाबदारी पत्करून राजीनामा दिला. परिणामस्वरूप खेळ लोकांच्या मनातून उतरला. जाहिरातदारांचे अतोनात नुकसान होऊ लागले. साबण, केशतेल, फसफसणारी पेये आणि पोट साफ करण्याची औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना जाहिराती करण्यासाठी एवढा मोठा बांधील प्रेक्षकवर्ग कोठे मिळणार? जाहिराती थांबल्या तसे लोक खरेदी करेनासे झाले. जाहिराती नसल्यामुळे अमुक अमुक साबण तेजस्वी अंगकांती देतो, तमुक तमुक तेलामुळे केस अमेझानच्या जंगलाप्रमानणे घनदाट होतात, फसफसपेये प्यालावर अफाट आणि अचाट कामे सहज करता येतात अश्या गोष्टीवरुन लोकांचा विश्वास उडाला. थोडक्यांत देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडायच्या बेतात आली. कारण काय तर 'ला गोरी' ऊर्फ बेस्केट खेळाची झिंग, चकाकी आणि झळाळी खतम झाली म्हणून! हा इतिहास तुम्हाला माहीत असेलच!

“'ला गोरी'चा  जीर्णोद्धार करून त्याचे वैभव, त्याची शान परत आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यांत आली आहे. त्या निमित्ताने मी तुम्हाला भेटायला आलो आहे.असे बोलून  त्या साहेबाने आपले भाषण संपवले.

व्वा! अप्रतिम! छान! आपण फार मोलाचे काम करत आहात. पण ह्यांत माझा संबंध कुठे येतो?” चिंटूच्या डोक्यांत अजून प्रकाश पडत नव्हता.

सांगतो, तुम्हाला बाहेर जायची घाई आहे का? नाही ना. मग मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. ह्या रविवारी पुणे फेरी टेल्स विरुद्ध सातारा तारा रा रा रा ह्या संघांचा सामना आहे. सातारा तळागाळातील संघ आहे. तो पुण्याविरुद्ध जिंकणे शक्य नाही. तुम्हाला तुमच्या दिव्य लेखणीतून अशी कथा लिहायची आहे की  सातारा अटीतटीच्या सामन्यांत विजयश्री खेचून आणतो. हा सामना बघण्यात प्रेक्षकांना रस नाही, साताऱ्याचे पारडे जसे जसे जड होऊ लागेल तसे  प्रेक्षकांना झटका बसेल आणि सगळे येऊन टीवीला चिकटतील. असेही लिहा. माझा होरा खरा असेल तर तुम्ही जे लिहाल तसेच होईल. माझी खात्री आहे. प्रेक्षक पुन्हा ला घोरीकडे वळतील. माझा हेतू साध्य होईल.

त्यानंतर अघटीत घडले. साहेबाने पाकीट काढले, दोन हजारांच्या पाच नोटा टेबलावर ठेवल्या. ही घ्या तुमची अगाऊ बिदागी.

चिंटू  कोलमडून पडणार होता, त्याने टेबलाचा आधार घेऊन स्वतःला कसेबसे सांभाळले. चिंटूने स्वतःचे रिकामे पाकीट काढले आणि नोटा आत सरकवल्या.

जर मला आणि माझ्या सहकाऱ्यांना गोष्ट पसंत पडली आणि आपला हा प्रयोग यशस्वी झाला तर मग आपण पक्का करारनामा करू. मात्र ह्याचा फायदा घेऊन तुम्ही बेटिंगच्या लफड्यात पडू नका.नंतर छद्मी हास्य फेकत तो म्हणाला, “सट्टा बेटिंग आपल्या देशात गुन्हा आहे हे लक्षांत असू द्या.

समजा, आपला बेत फिझल आउट झाला तर?”

तुम्ही काळजी करू नका, मी ते दहा हजार परत मागणार नाही.हा ईश्वर म्हणजे मनकवडा दिसतो आहे!

उद्या माझा माणूस येऊन तुम्हाला एक मोबाईल देईल. तो आपल्या दोघात संपर्क साधण्यासाठी वापरायचा. त्यात माझा क्रमांक हार्ड कोडेड आहे.

इतक्यांत दारावर टकटक झाली. ह्यावेळी कोण आलं असावं? चिंटू हलायचा अगोदर  ईश्वर जणू काय आपले घर आहे अश्या थाटात उठला आणि त्याने दरवाजा उघडला. दारात गोरिला उभा होता.

माझ्याकडे वळून ईश्वर बोलला, “मी जातो. परवा पर्यंत मला कथा मिळायला पाहिजे.त्याचा सूर धमकवणीचा होता. सवाल दहा हजारांचा होता. दहा हजाराला जर पाय फुटले असते तर पळून जायला दहा हजार वाटा होत्या. आधी गोष्ट लिहावी मग स्वस्थपणे दहा हजार कसे उडवायचे त्याचा विचार करावा. हे ठीक राहील.

ईश्वरीलाल रुणझुणरुणझुणवाला साहेब गेला. गेला पण जाताना मागे अद्भुतरम्य भीतीदायक भावना सोडून गेला. हा माणूस खरा होता कि कुणी भामटा लुबाडायाला आला होता? म्हणा माझ्याकडे लुबाडायला आहे काय? उलट जाताना दहा हजार टिकवून गेला. चिंटू विचार करत राहिला.

ह्या प्रमाणे चिंटूच्या हस्ते 'ला गोरी' चा पुनरुध्धार झाला.  जाहिरातदारांनी पुन्हा उत्साहाने (देशाच्या हितासाठी) जाहिरातींचा ओघ सुरु केला. 'ला गोरी'ला जुने वैभव प्राप्त झाले. सारे काही चिंटूच्या स्क्रिप्ट बर हुकुम होत होते. चिंटूला थोडा मेहेनताना मिळत होता. ईश्वरला जे काय मिळायचे ते मिळत होते. कोल्ड ड्रिंक, बिस्कुट, टू मिनिट्स, पोट साफ तर सर्व रोग माफ इत्यादी इत्यादी बनवणारे बख्खळ पैसा कमाऊ लागले, जनतेचे आणि म्हणून अर्थव्यवस्थेचे आरोग्य सुधारून पूर्वीसारखे झाले. तेरी भी विन मेरी भी विन असे सुख समाधानाचे  पर्व देशात आले.

दुपारचे काहीतरी वाजले होते. चिंटू तृप्त मनाने अंथरुणावर लोळत पडला होता. सगळे जग आपल्यात मग्न होते. हिंजवडी, हडपसर मध्ये भारतीय एमएनसी मध्ये  सॉफ्टवेअरच्या पाट्या टाकल्या जात होत्या. फॉरेनमध्ये कोणीतरी महाल बांधत होते. तिथं ह्यांची हमाल गिरी चालली होती. कोण जास्त हमाली करतो ह्याची स्पर्धा चालली होती. तू संध्याकाळी सात वाजेपर्यंत बसतोस काय साल्या. बॉस वर इम्प्रेशन मारायला. बघ मी रात्री दहा वाजेपर्यंत बसतो. अखेर प्रमोशन मीच घेणार आहे.

इकडे बँकेत पन्नास हजारी क्लार्क निर्विकारपणे दुसऱ्यांच्या कोट्यावधी रुपयांची  उलाढाल करत होते.

एंटर फिगर दाब की. नेक्स्ट एन्ट्री.

तिकडे शाळा कॉलेजमध्ये गुरुजी मुलांचे, देशाचे आणि स्वतःचे भविष्य घडवत होते. वर्गात दंगा

चालला होता. देशातही. मास्तर शिकवत होते, “माझ्या मना बन दगड.पण एकाही दगडाचे

त्यांच्याकडे लक्ष नव्हते.

 

त्या तिथे पलीकडे तिकडे कार खान्यात कार जोडणी जोरात आहे. ओ नो. ते रोबो नाहीयेत. रोबो

सारखे दिसताहेत खरे  पण तुमच्या आमच्यासारखी माणसेच आहेत. नजीकच्या भविष्यात रोबो

आपले जॉब हिसकावून घेणार आहेत ह्याची त्यांना जाणीव आहे. माहित आहे रोबो तिकडून

निघाले आहेत. रोबोज आर कमिंग. सध्यातरी रोबो पेक्षा माणूस सस्ता आहे. सो नो प्रॉब्लेम.

 

अश्याप्रकारे जग दरीच्या काठावर उभे आहे. तळाचा थांगपत्ता नसलेल्या दरीत डोकावून बघायची

हिंमत नाहीये. जर का तोल गेला तर?

आपला चितामणी  मात्र ह्या जीवनाच्या जाचातून मुक्त आहे. त्याला ना आजची काळजी ना

उद्याची.

फोनची घंटी वाजली.

चिंटू खडबडून जागा झाला.

मी बोलतोय. रुणझुणवाला शेठचा पीए. ऑफिसवर इडीची धाड पडली आहे. सोबत सीबीआय,

इओडब्ल्यू, सेबी, एसीबी, आहेत. शेठनं तुमचं नाव घेतलं आहे. बाकी तुमच्याकडे कांदे काय

भावाने चालले आहेत? , अरे ह्यांना ती फाईल देरे,”

जरा खाल्ल्या आवाजात. तो सीबीआयचा माणूस आला होता त्याला हूल म्हणून कांद्याचं काढल.

तर  शेठला घेऊन मंडळी तुमच्याकडेच येत आहेत. तेव्हा घाई करा आणि अंडरग्राउंड व्हा,

चांगल्या लॉयरला पकडा आणि मार्ग काढा.

फोन बंद झाला.

चिंटूला आधी काय झाले ते समजलेच नाही. त्याच्या डोक्यात जश्या जश्या गोष्टी उलगडत गेल्या

तसा तसा त्याला घाम फुटत गेला. आता ते यमदूत येणार आणि आपल्याला प्स्कडून घेऊन

जाणार. केव्हढी ही नाचक्की.

आई बाबांचे काय होणार? सगळे तोंंडावर अरेरे म्हणणार पण ह्यांनाच पाठीमागून आनंदाच्या

उकळ्या फुटणार.

वाटल नव्हत एव्हढा फ्रॉड ......

दिसतो कसा शामळू. तोंडावरची माशी पण हलत नव्हती....

सध्या असा काळ आला आहे कि कुणावर म्हणजे कुण्णावर भरंवसा ....

तरीच आजकाल चैनीत उंडरत होता...

क्यारॅक्टरलेस चिंटू.....

चिंटूला वाटल आत्ताच्या आत्ता जाव आणि त्या क्रॉसओवरवरच्या जादुगाराचे पाय धरावे. म्हणावे, “आता तूच वाचीव रे.

पण तो आता कुठ भेटणार? त्यापेक्षा इथूनच प्रार्थना करावी.

जय देवा महाराजा जादुगरा रंगीतपाणिबाटलीवाल्या.....

चिंटूने मनोभावे प्रार्थना केली. जेहत्ते कालाचे ठायी महाराजा प्रार्थनेचा महिमा काय वर्णावा.

चिंटूच्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला.

त्याने मोबाईल चालू केला आणि टकटक टंकायला सुरवात केली. लिहिली कथा आणि दिली

पाठवून रविवारच्या भुंग्याला.

        xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

थोड्याच वेळात कुत्र्यासारखे विव्हळणाऱ्या लाल बत्तीवाल्या सायरन गाड्यांची वरात

चिंटूच्या सोसायटीत दाखल झाली. चिंटूच्या फ्लॅटची बेल वाजली.चिंटूने दरवाजा उघडला.

समोर झाकप्यॅाक पोशाख केलेली मंडळी उभी होती.

पोलिसी खाक्याचा एकजण पुढे होऊन चिंटूला म्हणाला, “गुड मोर्निंग सर. माय नेम इज

रणदिवे. डेप्युटी असिस्टंट पोलीस कमिशनर साउथ-वेस्ट डी वार्ड.

मराठीत बोललात तरी हरकत नाही. मला मराठी समजतं. आणि माय नेम इजअस

म्हणायच्या ऐवजी आय अॅमअसं म्हणणं चांगलं वाटतं. साउथ-वेस्ट म्हणजे नैॠत्य ना!

काहो नैॠत्य मान्सूनला एवढा उशीर का झाला?”

रणदिवे डेप्युटी असिस्टंट पोलीस कमिशनर साउथ-वेस्ट डी वार्ड. एकदम गडबडला.

उशीर? कुठे काय साहेब. अरे मानकामे ह्यांची काय कांप्लेंट आहे बघा. सर, मान्सून विल

कम सून सर. मी स्वतः लक्ष घालतो.

ओके, आज इकडे यायचे कारण?”

सर, कमिशनर, (ऑल वार्डस् दाही दिशा) साहेबांनी आपल्याला शुभेच्छा पाठवल्या आहेत.

कमिशनर? कोण?”

कसबेकर साहेब आय पी एस २००२ बॅच.

त्याच्या आयला कसब्या कमिशनर झाला? त्या साल्याला म्हणाव एकदा येऊन भेट तरी.

होय साहेब. त्या सा..... साहेबांन्ला सांगतो आपला निरोप.

चिंटूने असा आय ए एस, आय पी एस, आय आर एस, आय ए & ए एस, आय इ एस

इत्यादींच्या आयांची दाखल घेत सर्वांचा निरोप घेतला.

जायच्या आधी सर्वांनी येऊन चिंटूशी हस्तांदोलन केले. मात्र मानकामे थोडे रेंगाळले. खालच्या

आवाजात खासगीत म्हणाले, “तेव्हढे माझ्या प्रमोशनचे बघा प्लीज. मोठी मुलगी लग्नाची

झाली आहे ...म्हणून सर.

चिंटूच्या मनाची तार कुठेतरी झंकारली. मनात गल्बली झाली. त्याच्या बहिणीची आठव आली.

निश्चित! मानकामे करून टाकतो. काळजी नको.

कुणाकुणाची किती दुःख, जीवन पोखरणाऱ्या किती काळज्या. चिंटू बंबवाल्यासारखा आग

विझवण्यासाठी कुठे कुठे धावणार. आगी सगळीकडे लागलेल्या. चिंटूला एकदम देवाची दया

आली, कणव वाटली. बिचारा किती ओव्हरलोडेड असणार.

एक तरुण लेडी इन्स्पेक्टर चिंटूकडे एकटक बघत उभी होती. चिंटूच प्रथमच तिच्याकडे लक्ष

गेले. बरी होती दिसायला.मिस, तुम्ही का उभ्या?”

यू आर सो क्यूट!ती एकदम खळबळजनक लाजली आणि पळून गेली.

चिंटूच्या डोक्याला झिणझिण्या आल्या.

तेव्हढ्यात रुणझुणरुणझुणवाला साहेबाने चिंटूचे पाय पकडले. गदगदून म्हणाला,

गुरुजी, आज तुम्ही वाचवलेत नाहीतर ....पुढचे शब्द अडखळले. बाहेर येईनात. पण चिंटूला

ते ऐकू आले.

उठा, आणि जा आपल्या घरा. पुन्हा ह्या भोवऱ्यात पडू नका आणि मला पण खेचू नका.

द एंड ला अजून थोSSSडा वेळ होता.

फिजिक्स डिपार्टमेंटचा प्यून यायचा बाकी होता. तोही आला.

चिंतामणीसाहेब, एच ओ डी ने तुम्हाला बोलावले आहे. आत्ताच्या आत्ता.

तू चल पुढे. मी कपडे करून आलोच बघ.

निघायच्या आधी चिंटूने त्या क्रॉसओव्हरवरच्या सर्वशक्तिमान महान जादूगाराचे आभार

मानले.

प्युनच्या आधीच चिंटू डिपार्टमेंटमधे पोचला

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

चिंटू आता काय करतो?

मी थोडक्यात कल्पना देतो.

चिंटू फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये डेमो म्हणून काम करतो. जे शास्त्र कधी कुणालाम्हणजे

अगदी आईन्स्टाईन आणि फाईनमन ह्यांना पण --- समजले नाही त्या क़्वांटम फिजिक्सचे

प्रयोग तो विद्यार्थ्यांना सेटअप  करून देतो. यथामति समजाऊन पण सांगण्याचा प्रयत्न

करतो.

खर तर चिंटूला क़्वांटम फिजिक्स चांगले समजले आहे. कारण तो स्वतः तिकडेजाऊन

परत आला आहे.

त्याला सत्य आणि आभासी विश्व म्हणजे काय ह्याची पुरेपूर जाणीव आहे. आपण आभासी

विश्वात राहतो आहोत असा त्याचा ठाम विश्वास आहे. आभासी असले तरी काय झाले पैसे

तर पाहिजेतच ना. आभासी पैसे ही सही!

चिंटूने लग्न केले आहे. त्याच इन्स्पेक्टरीणशी.

चिंटूने ग्रीटिंग कार्ड बनवण्याचा उद्योग सुरु केला आहे. का?

एक तर कुटुंब खर्चाला मदत म्हणून. पण त्याही पेक्षा मला वाटत--त्याचा लेखन कीडा! तो

वळवळ करून त्याला स्वस्थ बसू देत नाही. पण पूर्ण कथा लिहिण्याची त्याला हिम्मत होत

नाहीये. विश्वाचे झिरझिरीत स्पेस-टाईमच्या धाग्यांनी विणलेले वस्त्र फाटले तर? एक कथा

लिहिली तर केव्हढा उत्पात झाला.

म्हणून तो ग्रीटिंग कार्ड मध्ये दोन दोन ओळींचे विश्व उभे करून कथा लिहितो. त्याच्या ह्या

दोन लाईनच्या कथांनी

भावाला बहिणींच्या, बहिणीला भावाच्या, आई-बाबांना मुलांच्या, प्रियकराला प्रेयसीच्या

(तुम्हाला कंटाळा येईल एव्हढी मोठी यादी आहे) इत्यादी आठवणी येऊन गहिवरून येते. मग

ते शे दोनशे रुपये फेकून ते कार्ड विकत घेतात. घ्यायच्या आधी खात्री करून घेतात कि कार्ड

चिंतामणी आर्ट्सचेच आहे. कारण चिंतामणी आर्ट्सम्हणजे गहिवर गॅरंटीड!

चला जायच्या अगुदर मी तुम्हाला चिंटूच्या दोन ओळींचीझलक दाखवतो.

Guess we could have asked for a better father but Iam not sure if God has

figured out how to make one yet.

I may be taller than you but I still look up to you.

Happy Birthday! Keep going round the sun for another 365 days.

It is a true sign of aging when the candles cost more than the cake.

Well, you were right about...absolutely everything. Thanks for being my mom!

Moms are like buttons—they hold everything in life togethe

If I wrote down all the reasons I love you, it'd take up a whole book!

Home is wherever you are, Mom

 

Your face was the first one I ever saw, and I fell in love immediately. I’ve been

loving you ever since.

 

To the world you are a mother, but to me, you are the world.

You must be a perfect mom, because I’m the perfect child.

You're a little piece of my childhood that will always be with me. I'm so glad I

have someone like you in my life. May we share and make many more

memories together, starting with your birthday!

भावना उचंबळल्या? गहिवर दाटून आला? आले डोळ्यात पाणी?

नाही?

येईल येईल.

 

 

 

Comments

Popular Posts