देवाक काळजी

 

जगात देव आहे! निश्चितच आहे. हा पहा माझा स्वतःचा अनुभव!

माझे बाबा असतील सत्तर – पंचाहत्तरीचे. त्यांचे खरं वय काय ते त्यांनाही माहीत नाही मग आम्हाला कसं माहीत असणार. आमच्या आजोबांनी बाबांचा पहिलीत प्रवेश घेताना त्यांची जन्मतारीख अशीच ठोकून दिली होती. बाबा नेहमी मला सांगायचे, “मी पहिलीत होतो तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले.” अश्या थाटात सांगायचे की बाबांनी शिकायचे मनावर घेतले त्यामुळे गदगदित  होऊन राणीने हिंदुस्थानला स्वातंत्र्य बहाल केले.

ह्या वयातदेखील बाबा दवाखान्याची पायरी चढले नव्हते. जुने खोड! पण अलीकडे मी बघत होतो, बाबांना थोडं चाललं तरी थकवा येऊ लागला होता. आमची रहाण्याची जागा पहिल्या मजल्यावर होती. तो जिना चढून जाताना त्यांना थांबत थांबत जावे लागत होते. ते पाहून मी बाबांना  म्हटले, “बाबा तुमची तब्येत ठीक नाही आहे का? जिना चढलात तर  धाप लागली तुम्हाला.”

“हे बघ मक्या, नोबडी इज गेटिंग यंगर! झालं आता माझं वय झालं. वयोपरत्वे असं चालणारच. तू लक्ष देऊ नकोस. तुझी कामं तू कर.” बाबांनी मला धुतकारले.

पण माझ्या डोक्यातून हा विषय गेला नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये राणेंशी बोलताना सहज हा विषय काढला.

“मकरंद, सांभाळून हो. तू तुझ्या फॅमिली डॉक्टरला दाखवून त्यांचा सल्ला घे. तपासून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? झाला तर फायदाच होईल.” राणेंनी सल्ला दिला.

राणेंचे बोलणे मला पटले. मी डॉक्टर काकांकडे जायचा बेत निश्चित केला. “बाबा. उद्या आपण डॉक्टरकाकांकाडे जाऊन तुमची तब्येत दाखवून येऊ या.”

बाबांनी नेहमीचे रडगाणे लावले. “तुझ्याकडे पैसे ज्यास्त झाले काय? का डॉक्टरची उगा धन करायची? मला काय धाड झाली नाही.” एवढे बोलून बाबांनी मला छाती फुगवून दाखवली. पण तेवढ्याने त्यांना दम लागला हे ते लपवू शकले नाहीत.

“पहा किती धाप लागली तुम्हाला. ते काही नाही उद्या जायचे म्हणजे जायचे.” शेवटी झाले बाबा तयार.

डॉक्टरांनी बाबांना चेक केले. त्यांच्या दवाखान्यात जेवढ्या सोयी होत्या त्या सगळ्या वापरून झाल्या. म्हणजे स्टेथोस्कोप, ब्लड प्रेशर, शुगर, रक्तातली प्राणवायूची लेवल इत्यादी. त्यांचा चेहरा हळू हळू लांब लांब होत गेला.

“बाबा, तुम्ही जरा बाहेर बसा. तोवर मी मकरंदला तुमची औषधं लिहून देतो.” बाबा बाहेर गेल्यावर डॉक्टर मला म्हणाले, “मकरंद, खूप उशीर झाला आहे. बाबांची तब्येत खूप सिरिअस आहे. मी चिठ्ठी लिहून देतो. ती घेऊन तू तुझ्या चॉइसच्या हॉस्पीटल मध्ये त्यांना अॅडमिट कर. चिठ्ठीत मी सगळ लिहिले आहे. ते डॉक्टरांनी वाचलं की त्यांना समजेल. अजून बऱ्याच टेस्ट कराव्या लागतील.” ऐकून माझा धीर खचला. पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला. धीर एकवटून मी डॉक्टरांना विचारले, “अहो, पण असं काय झाले आहे? मला तुम्ही नीट समजाऊन सांगा तर.”

“मकरंद, मी काही हार्ट स्पेश्यालिस्ट नाही. पण मला जेवढे समजते त्याप्रमाणे त्यांचे हार्ट फुग्यासारखे फुगले आहे. कदाचित हार्ट बदलावे लागेल. आधीच हृदय बदलून घेण्यासाठी लोक क्यूमध्ये उभे आहेत. त्यामुळे स्पेअर हार्ट केव्हा मिळेल त्याची ग्यारंटी नाही. तो पर्यंत पेशन्टनेपण दम धरयला पाहिजे. पैसा हा दुसरा फॅक्टर! त्याचा विचार नंतर करू. मकरंद, तुझा देवावर विश्वास आहे? आहे ना. मग आता तोच तुला आधार!?”

यावर मी काय बोलणार? फाशीची शिक्षा देऊन टाक मोडून टाकणाऱ्या न्यायाधीशाची मला आठवण झाली. डॉक्टरांनी बाबांचे भविष्य लिहून टाकले होते.

काही निर्णय घ्यायच्या आधी राणेंचा सल्ला घ्यावा असा विचार केला. राणेशी बोललो. तो तरी मला दुसरे काय सांगणार.

दुसऱ्या दिवशी मी डोक्याला हात लावून विचार करत बसलो होतो. तेवढ्यांत राणे दत्त म्हणून हजर!

“काय मिळाले की नाही हॉस्पिटल? झाली की नाही अॅडमिशन?” राणेंनी विचारले.

“नाही ना. सगळेजण बाबांचे कागद बघतात, माझी माहिती विचारतात आणि सांगतात की जागा नाही म्हणून. कठीण आहे राणे. हॉस्पिटल मध्ये अडमिशन घेणे. एक वेळ आय आय टी, आय आय एम मधे अॅडमिशन मिळेल. एवढेच काय पण ‘पोवळे पाटील पूर्व प्राथमिक (इंग्लिश मिडीयम) शाळेत’ देखील प्रवेश मिळेल पण माझ्या बाबांना------ ”

मला वाक्य पूर्ण करण्याचा अवसर न देता राणे बोलला, “कसा रे तू. हातावर हात ठेवून बसला आहेस. बाप मरायला टेकला आहे आणि तू इकडे गलित गात्र होऊन बसला आहेस?”

“काय करू राणे, तूच सांग मला. कुठलेही हॉस्पिटल घ्यायला तयार नाही. काल दिवसभर पायपीट केली. सगळीकडे नन्नाचा पाढा. असं वाटतं की आपणच एक हॉस्पिटल खोलावे. तेवढे उरलेय बघ.’’ मी केविलवाण्या सुरात बोलत होतो.

“चल उठ. जा आणि टक्सी घेऊन ये. खाली उभी कर, तवर मी बाबांना तयार करतो.” अस म्हणून त्याने मला बाहेर पिटाळले. मी टॅक्सी आणली. बाबा  हळू हळू लिफ्ट पर्यंत चालत आले. लिफ्ट पासून टॅक्सी पर्यंत कसे बसे हात धरून आले आणि टॅक्सीत बसले.

“तू मागे बाबांच्या बरोबर बस. मी पुढे बसून ड्रायव्हरला रस्ता दाखवतो.” राणेंनी सर्व  सूत्रे हातात घेतली. मी आपली बघ्याची भूमिका घेतली होती.

टक्सी शहराची भरवस्ती सोडून आड वाटेने जाऊ लागली. मी ह्या शहरात गेली वीस वर्षे रहातो आहे. पण शहराचा हा हिस्सा मी कधीही बघितला नव्हता. माझा राणे वरचा विश्वास डगमगायला लागला. “राणे आपण कुठे जात आहोत? ह्या ओसाड जागी कुठले हॉस्पिटल आहे?”

“मकरंद. थोडा दम खा. आपण हॉस्पिटलच्या जवळजवळ जवळ आलो आहोत. आता पाच मिनिटात तुला हॉस्पिटल दिसेल.” ह्या माळरानात, दगडधोंड्यात इस्पितळ काढणारा माणूस एकतर महा मूर्ख असावा किंवा चक्रम असावा. मी चूप बसलो. आता राणे जरी सूर्य पूर्वेला उगवतो अस मला पटवायचा प्रयत्न करू लागला तरी मी त्याच्यावर विश्वास न ठेवण्याचा निश्चय केला. एनीवे “पाच मिनिटात” समजेलच. हातच्या कंकणाला आरसा कशाला?

इतक्यांत टॅक्सी गरकन वळली आणि समोर नेत्रदीपक इमारत दिसू लागली. फुलझाडांच्या ताटव्यातून मार्ग काढत आमची टॅक्सी इस्पितळाच्या पोर्च मध्ये थांबली.

“हॉ आले आपले हॉस्पिटल. तू बाहेर ये. आणि उगाच मजले मोजायला लागू नकोस. मी तुला सांगतो. पंचवीस मजली इमारत आहे.”

“हे एवढे मोठे हॉस्पिटल आपल्या शहरात आहे आणि मला काडीमात्र माहिती नाही? कमाल आहे.”

“कमाल ह्याच्या पुढे आहे.” राणे गूढ हसत बोलला.

आतून दोघे वार्डबॉइज व्हीलचेअर घेऊन धावत आले. त्यांनी बाबांना अलगद उचलून व्हीलचेअरवर बसवले.

“अरे मकरंद, आधी रेट तरी विचारून घे. हे आपल्याला झेपण्यासारखे आहे काय? नसते लचांड व्हायचे. हे असले लोक पैसे चुकते केल्याशिवाय डेड बॉडी देत नाहीत.” ब्लॅक ह्युमर आणि मर ण ह्यांची सांगड. माझे बाबा महान!

“अहो बाबा, तुम्ही काय बडबडत आहात? ते पैशाचे मी निस्तारीन. तुम्हाक कशाक काळजी? मी आहे ना.” राणे कॉन्फिडेंटली बोलला. शाहरुखखान सारखा.

हा खरतर देशाचा पंतप्रधान व्हायचा. चुकून आमच्या ऑफिसमध्ये यू डी सी म्हणून काम करत होता. केवढे आमचे सौभाग्य! राणे बद्दल माझा आदर द्विगुणित झाला.

“मकरंद, पळ आता, लवकर बाबांची अॅडमिशन घे.” राणे मला ढकलत म्हणाला.

बाबा केव्हाच आत गेले  होते. मी घाई गर्दीने “इमर्जेन्सी” रूम कडे गेलो.तिथे एक तरुणी गळ्यांत स्टेथोस्कोप लटकवून बसली होती.

“गुड मॉर्निंग मॅडम. माझ्या बाबांना अॅडमिट करायचे आहे. त्यांना घेऊन आलो आहे.” असं बोलत बाबांचे कागद तिला दिले.

“गुड इविनिंग. ते तिकडे बेडवर झोपले आहेत तेच तुमचे बाबा ना.” माझ्या हो नाही साठी ती थांबली नाही. ती आमच्या फॅमिली डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी वाचत होती. मी तिची नकारघंटा ऐकायची मानसिक तयारी करत होतो.

“ठीक आहे. तुम्ही आता त्या तिथे, पलीकडे, तिकडे आमचे आर एम ओ बसले आहेत. त्यांच्याकडे जाऊन काय ते सोपस्कार करा. तोवर मी तुमच्या बाबांना काही प्राथमिक औषधपाणी करते.”

माझा विश्वास बसला नव्हता. “म्हणजे तुम्ही बाबांना अॅडमिट करून घेत आहात?”
“मग काय नको करू? तुम्ही त्यासाठी त्यांना इकडे आणले आहे ना?” तिने खवचटपणे विचारले.

मी काय बोलणार? उठलो आणि आर एम ओ च्या  टेबलाकडे चालता झालो.

आरएमओ एक लांब नाकाचा, लांब आणि टोकदार कानाचा बुटका माणूस होता. त्याच्या समोर गलेलठ्ठ रजिस्टर पडले होते. त्यांत तो लिहित बसला होता.

“बसा.” अस बोलून त्याने माझे स्वागत केले. त्याच्या समोर टेबलावर पाच सहा टेलिफोन होते. त्यातला कुठलातरी एक वाजला. कुठला टेलेफोन वाजला हे त्याला बरोबर समजले. तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्याने टेबलाचा खण उघडला आणि त्यातून छापिल फॉर्म काढले, “इथे तुमचे नाव, पेशंटचे नाव व इतर माहिती भरा .इथे खाली सही करा.”

“तुम्हाला माझा आधार क्रमांक, माझे पॅन कार्ड, मोबाइल --- ते काही नको?” मी आपले विचारले. ही आपली एक सवय लागून गेली होती. म्हणजे मला एकदा स्वच्छता गृहात जायची वेळ आली होती. तिथेही त्या द्वारपालाने प्रथम ही माहिती विचारून आत सोडले होते.

“बाबांना रूम नंबर १५०५ मध्ये हलवले आहे. त्या तिकडे डावीकडे पाच लिफ्ट आहेत. कुठलीही एक पकडा आणि पंधराव्या मजल्यावर जा.”

मला त्यांना पैशाविषयी काही विचारायचे होते इतक्यात बाहेर गलका झाला. सायरनचे आवाज येऊ लागले. पटर पटर आवाज करत दोन चार हेलीकॉप्टर बाहेर उतरली. बाहेरून काळा पोशाख केलेले पाच सहा आडदांड टगे बाप्येलोक आत घुसले. त्यांच्या हातात स्टेनगन का काहीतरी होते. त्यांच्या पाठोपाठ व्हीलचेअर बसलेल्या  दुसऱ्या माणसाला ढकलत ढकलत एक सुंदर तरुणी येत होती. ही सगळी जत्रा आरएमओ च्या टेबलसमोर येऊन थांबली.

“अरे ओ चिरकुट, चल उठ, रस्ता पकड. ताबडतोब, नाऊ,गेट लॉस्ट,” एका रेड्याने मला स्टेनगनने ढोसत हुकुम केला. मी टरकून गेलो, खुर्चीतून उठायला लागलो.

“अहो, बसा हो तुम्ही. ह्या कचकड्याच्या भावल्यांना काय घाबरता.” आरएमओने मला खाली बसवले.

“हेलो देअर, मी डॉक्टर आहे. प्रेसिडेंट आईच्यानहॉवर यांचा वैयक्तिक डॉक्टर! आमच्या प्रेसिडेंटसाहेबाला घेऊन आलो आहे. प्लीज त्यांना तुमच्या इस्पितळात दाखल करून घ्या.” त्याच्या विनायपूर्ण भाषणाने आरएमओ थोडा निवळला, “प्रथम ह्या गनदांडग्यांना आवरा आणि बाहेर जायला सांगा, मग आपण पुढचे बोलू.”

“पण ते प्रेसिडेंटसाहेबाचे सुरक्षाकवच आहे. शिवाय ते माझ्या अखत्यारीत नाहीत.”

“मग तुम्ही सगळे इथून फुटा. चला दुसरे हॉस्पिटल शोधा. माझ्याइथे लफडा नाय पाहीज्याल.” आरएमओ अस्सल मराठीत बोलला. आता ती सुंदर तरुणी पुढे झाली. तिने  त्या रानडुक्करांशी काही गुफ्तगू केले. ती रानडुक्करे गुरगुरत पण नाराजीने बाहेर जाऊन थांबली. पण अजून एक सूटेड-बुटेड हातात काळी सुटकेस घेऊन उभाच होता.

“हा का थाबला आहे?”

“क्यू की सर, हा “न्युक्लीअर अॅंटी अॅंटी अॅंटी अॅंटी---- बॅलिस्टिक मिसाईल स्कायनेटवर्कची कमांड मॉड्यूल” घेऊन उभा आहे. तो चोवीस तास डॅडींच्या—- सॉरी हं, आय मीन--- प्रेसिडेंटच्या  आजूबाजूला भिरभिरत असतो. असा आमचा प्रोटोकॉलच आहे. तेव्हा  कृपाकरून त्याला राहूद्या. त्याचे काय आहे, समजा ह्या नाजूक क्षणी –- जगाच्या महान देशाच्या महान नेत्याच्या महान आजारपणाचा फायदा घेत -- आमच्या म्हणजे जगाच्या शत्रूने मिसाईल डागले तर?” त्या तरुणीने आपले  सुहास्य स्वीचऑन करत प्रश्न केला.

एक मिनिट, आरएमओने कुठेतरी फोन लावला,  अनिर्वाच्य भाषेत संभाषण केले आणि फोन कट केला. “मादाम, अॅडवायजर टू प्रेसिडेंट, आमच्या माहितीनुसार पुढील पंच्याऐंशी वर्षे मोठ्या लढाईची शक्यता नाहीये. तेव्हा त्या काळपेटीवाल्याला बाहेर पिटाळा. आमच्या नियामाप्रमाणे रुग्ण नि फक्त एक सहचर रूम मध्ये राहू शकतात. अजून एक अट आहे, इथे रहात असताना रुग्ण चिवचिवाट करू शकत नाहीत.”

“चिवचिवाट? चिवचिवाट म्हणजे काय?”

“काय हो? चिवचिवाटला आपण मराठीत काय म्हणतो?” आरएमओने माझ्याकडे वळून विचारले.

“मला वाटत तुम्हाला ट्वीट म्हणायचे आहे का?” मी अडखळत अडखळत बोललो.

“हा, बरोबर त्यांना ट्वीट करता येणार नाही. विचारा त्यांना, ट्वीटर शिवाय ते जगू शकतील?”

ती अट ऐकून प्रेसिडेंटच्या गोटात खळबळ उडाली. तिकडे घमासान चर्चा सुरु झाली. शेवटी प्रेसिडेंट नाराजगीने का होई ना राजी झाले. लहान मुलाच्या हातून खेळणे काढून घेताना त्याची आई ज्या युक्त्या वापरते त्या वापरून त्या तरुणीने प्रेसिडेंटच्या हातातून हळूच मोबाईल काढून घेतला.

“ह, आता सांगा, काय प्रॉब्लेम आहे?”

“प्रॉब्लेम काय आहे तेच कळत नाहीये. प्रेसिडेंटसाहेब रात्रंदिवस फेकायला लागले आहेत. त्यामुळे त्यांना खरा काय आजार आहे हे ही समजत नाही. त्यांना खूप ताप आहे, खोकला आहे. ब्लड प्रेशर हाय  आहे. सुगर हाय आहे. हे सगळे इतके हाय आहे की आतापर्यंतचे सर्व जागतिक विक्रम त्यांनी तोडले आहेत. साहेब मात्र मजेत फिरत आहेत. त्यांना ह्या कशाचाही त्रास नाही कि जाणीव नाही. मी टेस्ट करून करून थकलो आहे.” प्रेसिडेंटसाहेबाचा डॉक्टर थकलेल्या आवाजात बोलत होता.

“मला वाटत की इतके दिवस त्यांचा मेंदू फेकत होता. आता त्यांचे सगळे शरीर फेका फेकी करायला लागले आहे. तुम्ही घाबरू नका. आमचे डॉक्टर ननावरे त्यांच्यावर e-लाज करतील.”

त्या विनोदी नाटकात मी राणेला पार विसरून गेलो होतो. बिचारा माझी वाट पाहत असेल. मी त्वरेने बाहेर पडलो. राणे टॅक्सी ड्रायव्हर बरोबर गप्पा छाटत उभा होता.

“सॉरी राणे, मी ह्या टेन्शनमध्ये तुला विसरून गेलो.”
“ते सगळे सोड. बाबांना रूम मिळाली ना? मग बस झालं. मी निघतो. रात्र झाली आहे. तुझ्या आणि माझ्या घरचे वाट बघत असतील. मी जबाबदारीतून मोकळा झालो.”

“राणे, दोस्ता, तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही.” मी त्याचे दोनी हात हातात घेऊन भावनाविवश होऊन बोललो.

आपले हात सोडवून घेऊन राणे म्हणाला, “अरे, आपणच एकमेकांना मदत करायची. तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू! जा आता. डॉक्टर येतील तेव्हा तू जवळ पाहिजे.”

राणेला सोडून मी आत आलो. लिफ्ट पकडली आणि रूम नंबर १५०५ मध्ये गेलो. एक नर्सबाई बाबांना ड्रिप लावत होती. तिचेही कान लांब आणि टोकदार होते. खर तर कुणाच्या व्यंगावर टीका टिप्पणी करणे उचित नाही, पण ------

बाबा मात्र पूर्ण भांबावून गेले होते. नर्स गेल्यावर ते मला म्हणाले, “मकरंद, तू मला कुठं आणले आहेस? हे आपल्याला झेपणार आहे काय? तू इथे  जन्मभर भांडी घासलीस तरी बिल फिटणार नाही.” बाबा वाटेल ते बरळायला लागले.

“अरे, बाबा आमच्या इथे आम्ही भांडी घासत नाही, भांडी घासायचे मशीन असतं इथे.” नर्सबाई बोलली.

“मकरंद, बघ रे बाबा, भांडी घासायचे काम सुद्धा मिळणार नाही. कसं होणार तुझे.” बाबा थांबायचे नाव घेत नव्हते.

“बाबा तू झोपतोस की नाही? का देऊ इंजेक्शन?” नर्सने दम भरल्यावर बाबा चूप बसले.

रात्रीचे दोन वाजले होते. मी बाजूच्या बेडवर पडून झोपेची आराधना करत होतो. तेवढ्यात नर्सची धावपळ सुरु झाली. “डॉक्टर आले आहेत तपासायला. बाबा उठ.” डॉक्टर रूममध्ये आले. त्यांच्याबरोबर त्यांचा मदतनीस डॉक्टर होता. डॉक्टरांनी बाबांना तपासले. त्यांच्या रिपोर्टची फाईल नजरेखालून घातली. माझ्याकडे वळून  ते बोलू लागले.

“माझे नाव ननावरे. जगप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉक्टर ननावरे. मी तुमच्या बाबांना तपासले आहे. त्यांचे रिपोर्ट पाहिले आहेत. त्यांचे हृदय कंडम झाले आहे. नवीन टाकावे लागेल. माझ्याकडे स्पेर हृदय आहेच. आहे काय आणि नाही काय. टाकून देऊ. तुम्ही काळजी करू नका. मी नेहमी ओरिजिनल जेन्युइन स्पेअर पार्टस वापरतो. तुमचे बाबा ज्या मेक आणि मॉडेलचे आहेत, मी त्याच फॅक्टरीतून माल आणतो. बाबांना त्यासाठी सन २३२० मध्ये माझ्या कोथरुडच्या वर्कशॉप मध्ये हलवावे लागेल. आय होप यू हॅव नो ऑब्जेक्शन.”

“ह्यांना 2320 मधल्या माझ्या कोथरुडच्या वर्कशॉप मध्ये टाईम-टेलेपोर्ट करा.” डॉक्टरांनी नर्सबाईला सूचना केली, मग आपल्या मदतनीसाला विचारले, “नेक्स्ट कुठला पेशंट?”

“सर, सन 1680 मधून एक तातडीची केस आहे. छत्रपति शिवाजी महाराज अत्यवस्थ आहेत असा राजवैद्याचा निरोप आहे. तेव्हा.....” त्यांच्या मदतनीसाने माहिती दिली.

डॉक्टरांनी निराशेने डोके हलवले, “फार उशीर झाला आहे. राजवैद्याने आपल्याला उशिरा सूचित केले. आता तेथे जाण्यात काही अर्थ नाही. मी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर आहे हे खरे पण मी काही देव नाही.” माझ्याकडे वळून, “तुमचे बाबा उद्या  दुपार पर्यंत परत येतील. उगाच काळजी करत बसू नका,”  एवढे बोलून डॉक्टर निघून गेले. ते जे काही बोलले त्यातले शब्द मात्र कळले पण अर्थ नाही. बाबा ऑपरेशनचे ऐकून जाम घाबरले होते.

नर्सबाईने बाबांना हलवण्याची तयारी केली. “अहो बाई, मला काहीही  झाले नाहीये, मी आजारी नाही.”

“चूप बस बाबा.नाहीतर इंजेक्शन देईन ह.” नर्सने धमकावल्यावर  बाबा चूप झाले. मी तरी काय बोलणार? जे जे होत होते ते चूप चाप पाहायचे अशी पॉलिसी घेतली. बाबांना इकडे आणून आपण चूक तर केली नाही ना असे विचार मनात येऊ लागले. बाबांना स्ट्रेचरवर टाकून घेऊन जायला लागले तेव्हा माझा धीर खचला.

“बाबा, घाबरू नग. जिझसचं नाव घे. तो तुला तारून नेईल,” नर्सने बाबांना धीर दिला.

आयला, ही बाबांना बाटवायला बघते आहे काय. एनीवे आपल्याला काय जो आपला भर उचलायला तयार होईल तो आपला देव आणि तोच आपला धर्म!

“मकरंद, हे लोक मला कुठे घेऊन चालले आहेत?” बाबा काकुळतीला आले.

“बाबा, त्यांना थोडे चेकिंग करायचे आहे त्यासाठी घेऊन चालले आहेत.” मी बाबांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत म्हणालो.

“तू माझ्याबरोबर चल.” बाबांनी माझा हात पकडला. माझ्या डोळ्यांत पाणी आले.

“चल. तू पण बरोबर चल नाहीतर् बाबा तेथे धिंगाणा करेल.” नर्स बाईने मला बोलावले. 

ह्या नर्सा सगळ्यांशी एकेरीतच बोलतात.

बाबांना टाईम-टेलेपोर्टच्या मशीन रूम मध्ये नेण्यात आले. ते मशीन आडव्या ठेवलेल्या नळकांड्याच्या आकाराचे होते. फ्रंन्ट लोडिंग वॉशिंग मशीन असते तसे. दरवाजा उघडून बाबांना आत टाकण्यात आले. माझ्या डोळ्यांत पाणी तरारले. बाबाचे आता पुन्हा दर्शन होणे नाही असं वाटू लागले. बाबांच्या आठवणी दाटून आल्या. लहानपणी हट्ट केलातरी बाबांनी मला कधी चॉकलेट घेऊन दिले नाही का गावदेवीच्या जत्रेत भिरभिरे. त्याचा मनातला राग विरून गेला.

“अरे रडतोस कशाला रे तू? तुझा बाबा फिट आणि टाईट होऊन परत येणार बघ.” नर्सचे धीर देणारे शब्द ऐकून थोडं बरं वाटलं. तिने आपल्या झग्याच्या खिशातून “शुभ वर्तमान” नावाची मराठी पुस्तिका काढून दिली. “हे वाच म्हणजे तुझं चित्त थाऱ्यावर येईल.”

“त्या पेक्षा अफूची गोळी दे.लावून ताणून देईन,” असं बोलायचं मनात होतं पण नर्स बाईचा गैरसमज होऊ नये म्हणून बोलायचे  रद्द केले.

मी तेथून बाहेर पडणार इतक्यात एका पेशंटला स्ट्रेचरवर घालून नर्सबाई आत आली. त्या पेशंटचा चेहरा ओळखीचा वाटला. अरे ओळखला. हा तर सुप्रसिध्द उद्योगपती मिस्टर फलानाधीकाना! आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या. हातावर मोजे चढवले होते. हा काय इडी/सीबीआयच्या लफड्यात अडकला की काय? छातीत दुखण्याचा बहाणा करून इस्पितळात दाखल झाला असणार. आणखी काय. नर्सला विचाराले.

“तुला  ती मिडास राजाची गोष्ट माहीत आहे काय?” नर्स मला सांगू लागली, “तो रे .हात लावेन तिथे सोने करणारा? ह्याने ज्या धंद्यात हात घातला त्याचे सोने झाले. काल शेवटी ता मिडासचे जे झाले तेच ह्यांचे पण झाले. सकाळी नाश्ता करत होते तो नाश्ता सोन्याचा झाला!  ज्यूस प्यायला गेले तर ज्यूस सॉलिड सोन्याचा झाला. आता बोल. त्याला  हातकड्या घातल्या, हातावर मोजे चढवले आणि इकडे आणला. आम्हाला काय? सज्जड देणगी घेतली आणि अॅडमिट करून घेतले. असले लोक असतात म्हणून आमच्या  खर्चाची  भरपाई होते,”

नर्सला पटवून झोपेची गोळी घेतली आणि दिली ताणून!
दुसऱ्या दिवशी दुपारी नर्स लगबगीने बाबांना घेऊन आली. बाबा चक्क चालत चालत आले. नर्सबाईने बाबांना माझ्या ताब्यात दिले.

“सांभाळ तुझ्या बाबाला. चौखूर उधळला आहे. डॉक्टर येतील आणि तुझ्याशी बोलतील. मी जाते आता.”

बाबांनी नर्सचा गालगुच्चा घेतला. नर्स रागावली नाही का लाजली नाही. फक्त म्हणाली,

“हात मेल्या.”

मला हाय व्होल्टेज विजेचा धाक्का बसला जणू.

“मक्या, क्यूट आहे ना ही. एकदम माल!”

मी काय बोलणार? बरं झालं कारण तेवढ्यात डॉक्टर आले.

“ऑपरेशन व्यवस्थित झाले. नव्वकोरं हार्ट टाकलं आहे. शरीरात मुरायला किंचित वेळ लागेल. तो पर्यंत ते लहान मुलासारखे वागतील. हट्ट करतील. समजून घ्या त्यांना. हार्ट जून झाले की महिन्याभरात  होतील नॉर्मल. निर्ढावलेले आणि मुर्दाड बनायला वेळ लागेल. बाबा इकडे बघा माझ्याकडे, हां, हट्ट करायचा नाही. नाहीतर इंजेक्शन देईन.”

“डॉक्टर, माझे बाबा निर्ढावलेले आणि मुर्दाड नव्हतेच,”

“व्हाट आय वांट टू से की पूर्वी सारखे व्हायला. सरते शेवटी काय आहे, डोकं हृदयाला सांभाळून घेते. उनाडक्यावर त्याचे लक्ष असते. आणि मी त्यांचा मेंदू बदलला नाहीये. तेव्हा ते जसे होते तसेच रहातील. काळजी करू नका.”

बाबांचं ऑपरेशन जरा जास्तच सक्सेसफुल झालं असं दिसतय.

“पथ्यपाणी वगैरे?”

“काही नाही, काय पाहिजे ते खाउ देत.”

“पण त्यांचा डायबेटीस?”

“अहो पॅनक्रीअस पण नविन टाकली आहे. आमच्याकडे पेशंट आला की आम्ही सर्वांगीण उपचार करतो. तुम्ही आता खाली जा आणि डिस्चार्ज घ्या.”

इथे मी धास्तावलो. पैशाचे काय? बाबांना घेऊन खाली लांब नाक्या आरएमओकडे  गेलो. बाबा वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक नर्सला हाय हॅल्लो करत होते. आवरता आवरता नाकीनउ आले.

“अहो बाबा, तुमच्या वयाला हे शोभा देत नाही.”

“म्हणजे मी काय म्हातारा झालो आहे काय? मक्या, अभी तो मैं जवान हूँ.” बाबांनी छाती फुगवून दाखवली.

“बर बर, चला आता खूप झाले.”

मी आरएमओशी बोललो एव्हा मला दुसरा धक्का बसला. मला एक पैचेही बिल लावले नव्हते,

“तुमच्या नि बाबांच्या खात्यांत भरपूर क्रेडीट आहे. त्यातून खर्च वळता केला आहे. तस्मात् बिल शून्य!” 

हॉस्पिटलच्या बाहेर पडलो तर समोरच त्या दिवशीचा टॅक्सीवाला उभा होता.

“मला राणे सरांनी पाठवले. त्यांनी सांगितले की आज तुम्हाला डिस्चार्ज मिळेल. मी तुम्हा लोकांची केव्हाधरून वाट बघतो आहे.”

मी मनोमन राणेचे पुन्हा आभार मानले. केवढी माझी काळजी त्याला.

दुसऱ्या दिवशी सगळ्यांत आधी आमच्या फॅमिली डॉक्टरला जाऊन भेटलो. जाताना तास्त्यात बाबांना भय्याची ‘बरफ का गोला’ची गाडी दिसली. झालं तिथेच बाबा अडले. कालाखट्टाच्या गोळ्यासाठी हट्ट धरून बसले. डॉक्टरकाकांच्या दवाखान्यात व्यवस्थित वागलात तर येताना घेऊन देईन अशी कशीबशी समजूत घालून त्यांना घेऊन गेलो.

डॉक्टरांनी पुन्हा तपासण्या केल्या.समाधान झाले नाही म्हणून पुन्हा पुन्हा केल्या.आधी उजव्या दंडावर बीपी घेतला. ते रीडिंग ठीक वाटले नाही म्हणून डाव्या दंडावर चेक केला. त्यांना इंस्ट्रुमेंट संशयास्पद वाटले म्हणून डॉक्टरांनी स्वतःचा रक्तदाब पहिला. इसीजी झाला. सगळ्या टेस्ट झाल्यावर डॉक्टरांना वाचा फुटली.

“अहो तुम्ही ह्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता? ह्यांचे हार्ट आणि बीपी नवजात अर्भका सारखा ताजेतवाने टवटवीत कसे झाले?”

इतका वेळ बाबा डॉक्टरकाकांच्या गळ्यात लटकणाऱ्या स्टेथोस्कोपशी खेळत बसले होते. तो तोंडासमोर धरून हलो हलो करत होते.

“मक्या मला असला टेलिफोन घेऊन दे.”

मी बाबांना डोळ्यानेच दटावले.

डॉक्टर काकांचा निरोप घेऊन मी दुसऱ्या रस्त्याने बाबांना घरी घेऊन आलो. त्यामुळे त्यांना ‘बरफ का गोला’ ची आठवण झाली नाही. रस्त्यात फुगेवाला होता. देवाची कृपा की बाबांचे तिकडे लक्ष गेले नाही. ते रस्त्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याकडे बघत होते. नाहीतर पंचाहत्तरीतील एक “मुलगा” फुगा नाचवत कसा चालला होता त्याची चविष्ट चर्चा कॉलनीत चालू झाली असती.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन राणेला भेटलो. त्याचे दोनी हात हातात गेऊन गदगदीत स्वरात म्हटले, “राणे, मित्र असावा तर तुझ्यासारखा!” अजून भारावून गेलो, ”ए फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इंडीड!!” वर राणेचा विनय पहा. म्हणतो कसा, “अरे माझ्या राजा, काय झाले ते तर समजू दे ना?”

“राणे, काल तू माझ्या घरी आलास, माझी आणि बाबांची गठडी वळून आम्हाला त्या इस्पितळात घेऊन गेलास केवळ तुझ्यामुळे माझ्या बाबांना आज नवजीवन प्राप्त  झाले.”

“झालं तुझं? का अजून काही बकबकायचे आहे? नाही ना. मग ऐक. मी काल पूर्ण दिवस माझ्या सालीच्या लग्नाची बोलणी चालली होती तिकडे फसलो होतो. मी तुझ्याकडे कसा येणार? आणि हे कुठले इस्पितळ म्हणतो आहेस तू? नाव माहीत नाही. गाव माहीत नाही. पत्ता माहीत नाही. मला सांगतो आहेस की मी येऊन तुम्हा दोघांना टॅक्सीत घालून घेऊन गेलो. कुठल्या जगात वावरतो आहेस? काहीतरी ढोसून ऑफिसला आला आहेस तू ......”

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular Posts