वेटिंग फॉर गोदो
भाऊ हा शिस्तीचा पक्का होता. सकाळी सहा वाजता उठणार
म्हणजे उठणार. आजही तो बरोबर सहा वाजता उठला. सकाळी महत्वाचे काम म्हणजे बागेला
पाणी द्यायचे. पाणी दिले नाही तर झाडे कोमेजून जाउन माना टाकायची, त्याच्याकडे आशेने बघत रहायची. त्याला मग त्यांची दया यायची.
बंगल्याच्या आजूबाजूची ही आटोपशीर बाग छोट्या
मालकांनी स्वतःच्या हातांनी लावलेली होती. त्याबागेत काय नव्हते? डबल मोगरा, अबोली, जाई जुई, निरनिराळ्या जातीचे गुलाब. आणि हो एकाच
वेलीवर पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुले देणारी बोगनवेल! जशी फुलझाडे होती तशी
रानटी झाडे पण होती. भाऊ एकदा रान साफ करायला गेला. तर छोट्या मालकांनी त्याला
आडवल.
“भाऊ राहू दे बिचाऱ्यांना. माझ्याइथे
रहाणार नाही तर ते बिचारे जातील कुठे?सगाळे त्यांचा दुस्वास
करतात. आपली बाग सर्वांसाठी आहे.”
छोटे मालक येतील तो पर्यंत ह्यांना जगवले जोपासले
पाहिजे. आल्यावर त्यांची शाबासकी मिळाली पाहिजे न!
भाऊ असा छोट्या मालकांची वाट पहात जगत होता. किंबहुना
भाउच्या जगण्यामागे हेच -कारण म्हणा वा रहस्य म्हणा-- होते. विश्व हे असेच वाट
पाहण्यात चालले आहे. रात्र दिवसाची वाट पहाते तर दिवस रात्रीची वाट पाहतो. उन्हाळा
पावसाळ्याची, पावसाळा हिवाळ्याची तर हिवाळा
उन्हाळ्याची वाट पाहत असतो. असे हे जीवघेणे वाट बघणे!
सकाळची कामे आटोपून तो बाहेर पडला. हे भाऊचे रोजचेच होते.
त्यात बदल होणे नाही.
उजाड पडलेल्या शहराच्या गल्ली बोळातून चालताना भाऊला
विषण्णता, खिन्नता, उदासीनपणा
येणे सहाजिक होते. कधी काळी ह्या रस्त्यानं त्यानं मालकाच्या मुलांना शाळेत
पोहोचवल्रं होते. त्या रस्त्यावरच्या बंगल्यातले गुलाब कोमेजले होते. जेथे फुलांचे
ताटवे होते तेथे रान माजले होते. ओसरीवरचे झोपाळे वाट पहात थांबले होते. कोणी झोका
घ्यायला येईल का? पण आता कोणी येणार नव्हते एवढेही त्या
वेडयांना समजत नव्हते. अमेरीकेतला मुलगा मुलगी केव्हा येणार? वाट पहाता पहाता म्हातारा म्हातारीचे डोळे शिणले. अखेर मिटले ते कायमचे
मिटले. सर्व बंगले भुताटकीचे झाले होते. म्हणायचे म्हणून म्हणायचे भुताटकीचे. पण
आता भूतं तरी कुठे राहिली होती?
आठवणी दाटून येत. हल्ली राहून राहून त्याच्या मनात
हाच विचार येई. जे काही केले गेले होते ते योग्य होतं? घटनाक्रमाने चुकीचे वळण का घेतले? ह्याला
जबाबदार कोण? सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी थोडा तरी विचार
करायचा. भावनेच्या भरात वहात गेले. तेव्हा जे काही केले गेले, ते तेव्हा किती भव्य दिव्य प्रतीत होत होत. भाउच्या डोळ्यासमोर तेव्हाचा
जोश, जल्लोष, आवेश आठवला. त्या
मिरवणुका, त्या सभा, ते मोर्चे,
ती राणा भीम देवी थाटाची भाषणे, ते उपरोधिक
चिमटे, तो गर्व आणि त्या उद्धट धमक्या. आम्ही कोण म्हणून काय
पुसशी.....
आणि आता.....
भाऊने कोपऱ्यावरचे वळण पार केले. समोर मिठाईचे दुकान!
मालकाची मुलगी सारी दहावी उत्तीर्ण झाली तेव्हा इथून पेढे आणले होते त्याची आठवण
झाली. प्रत्येक सणासुदीला इथून आपण मिठाई घेऊन जायचो! काचेच्या शोकेसमध्ये मिठाई
लावून ठेवली होती. त्यावर टनाने बुरशी जमली होती. बुरशीच्या खाली काय असेल? जिलेबी, मोतीचूर लाडू, काजू कतली. सोन पापडी, पेढे, माहीम
हलवा, सीताफळबासुंदी, अंगूर.....?
आता फक्त
आठवणी राहिल्या. त्या आठवणींना कष्टाने बाजूला सारून भाऊने पाऊले झपाझप उचलायला
सुरुवात केली. उशीर झाला तर तात्याला वाट पहावी लागेल, तिष्ठत
बसावे लागेल. मग तो चिडेल. हल्ली तात्या फार चीड चीड करायला लागला आहे. तो ही
बिचारा काय करणार. परिस्थितीच तशी बिकट झाली होती. घोर निराशा आणि अगतिगपणा,
मग दुसरे काय होणार?
पुणेकर कॉलनीतून सकाळी निघायचे आणि डेक्कन जिमखाना
पर्यंत चालत जायचे. हा भाऊचा सकाळचा नित्यनेम होता. पुणेकर कॉलनीत तो रहात होता.
एके काळी त्याचा मालक आणि मालकाचे कुटुंब तेथे रहात होते. आता तो एकटाच होता.
डेक्कन जिमखान्यावर त्याला तात्या भेटत असे. त्याच्याशी सुख दुःखाच्या चार वार्ता
केल्या की त्याला बरं वाटत असे.
चालता चालता भाऊ कर्वे रोड वर आला. चौकातले ट्रॅफिक
सिग्नल लाल हिरवे पिवळे आपले काम चोख बजावत होते. भाऊ सिग्नल हिरवा होई पर्यंत
थांबला. खरं तर थांबायची गरज नव्हती. कारण चौकात कोणीहि नव्हते. पण शिस्त म्हणजे
शिस्त!!
चौक ओलांडून भाऊ पल्याड आला आणि एक रिक्षा जवळ येऊन
थांबली. मोठ्या अपेक्षेने. भाऊ हसला आणि म्हणाला, “मी
चालतच जाणार आहे.” बिच्चारी रीक्षा. हिरमुसली. भाऊला वाईट
वाटलं. कित्येक दिवसात भाडं भरलं नसणार तिनं. तिचा मूड जरा बरा व्हावा म्हणून तो
म्हणाला, “रिक्षाबाई, उद्या
निश्चित.गप्पा मारत मारत जिमखान्यापर्यंत जाऊ. ठरलं आपलं.”
इतक्या पी एम टीची बस आली. रोजच्या ओळखीतली. लाल.
बसनी हेड लाईट ऑन ऑफ करत डोळे मिचकावले. भाऊने हात वर करून हाय केले. बसने पोम पोम
करून निरोप घेतला.
अश्या बश्या येत जात होत्या. आत ना कोणी पॅसेंजर, ना कोणी ड्रायव्हर. ना कोणी कंडक्टर. पण बश्या आपले रुटीन मारत
होत्या. मजेत मारत होत्या. पूर्वी काय जीवघेणी मरणाची गर्दी. ऑफिसला जाणारे बाया
बापे. शाळा कॉलेजला जाणारी मुले मुली. बसमध्ये फुललेले
रोमान्स. ह्याची साक्षीदार त्या बसेस! आता काय?
इकडून कोणी चढत नाही. तिकडे कोणी उतरत नाही. पण बसेस आपली जबाबदारी
ओळखून होत्या. अंगवळणी पडलेल्या टाईम टेबल प्रमाणे काम करत होत्या.
पण भाऊला बस बरोबर झिम्मा फुगडी खेळायला वेळ नव्हता.
तो पुढे निघाला. ‘वैभव इलेक्ट्रोनिक्स’ पाशी पोचला. दुकानात मालक नव्हता का त्याचा कोणी नोकर! पण सर्व टीवी ऑन
झाले होते. काही टीवी हिंदी सिनेमा दाखवत होते. इतर टीवींवर सिरिअल्स चालू होत्या.
तात्या त्यांच्या नेहमीच्या बाकड्यावर आधीच येऊन बसला
होता, तात्या वेळेचा पक्का. कधी उशीर करणार नाही. भाऊ हलकेच जवळ जाऊन बसला. भाऊने
नेहमीप्रमाणे सुरुवात केली. रोज रोज दुसरं तरी काय बोलणार म्हणा.
“हवा काय सुंदर पडली आहे नाही.”
या दोघांनाही माहीत होतं की इतकी भिक्कार हवा पुण्यात
कधीही नव्हती. आकाशात चित्र विचित्र रंगाचे ढग जमले होते.थोड्याच वेळात काळ्या
पिवळ्या रंगाचा कावीळ झालेला पाउस पडणार होता. पण खरं बोलून कुणाचं भलं झालेय का? उगी आपल्या डोक्याला त्रास!
“खरच इतकी सुंदर हवा महाबळेश्वरची
सुद्धा नसेल. आपण पुण्यात आहोत हे आपले केव्हढे भाग्य आहे.” तात्याने
प्रतिसाद दिला.
रोजच्या प्रमाणे आताही पावसाला सुरवात झाली. पित्ताची
ओकारी असते तसं आकाश निशःब्द रडत होते. दोघेही पावसापासून बचाव करण्यासाठी थोडे
अडोश्याला गेले. हात बाहेर काढून तात्याने पावसाचे थेंब हातावर झेलले.
भाजल्यासारखे झालेल्याने हात एकदम मागे घेतला.
“बाप रे, खूपच
अॅसिडीक आहे पाणी आज!”
सुदैवाने पाउस लगेच थांबला.
“तात्या, आज मी
मालकाच्या लायब्ररीत सहज पुस्तक चाळत बसलो होतो. त्यात लिहीलं होत की “मी तुम्हाला वचन देतो की मी तुम्हाला मुक्ती देईन. स्वतः स्वर्गाच्या
दाराशी उभं राहून तुमचे स्वागत करीन.” ते वाचून माझा तडफडाट
केव्हडा कमी झाला. किती बर वाटलं म्हणून सांगू. शेवटी आपली काळजी करणारा कुणीतरी
आहे.” भाऊ उत्साहाने सांगू लागला.
“भाऊ, फार वाहवत
जाऊ नकोस. असे कित्येक आले नि गेले. शेवटी काय झाले? बघतो
आहेस ना.” तात्याच्या त्या टोकदार शब्दांनी भाऊ बोथट झाला,
“ते सोडून दे. तुझी गुढघेदुखी कशी आहे? ह्या
पावसामुळे जास्त त्रास होतो. तू ना अहमदनगरला जा. तेथे अजिबात पाउस पडत नाही.
भाऊ “अहमदनगर
काय आहे, कुठे आहे, तिथे कसं जायचं”
विचारायच्या भानगडीत पडला नाही, त्याला पक्के
माहीत होते की ते तात्याला पण माहीत नसणार.
“तात्या, ‘ठेविले
अनंते तैसेची रहावे’ हे आपले तत्व आहे, ह्या वयात कुठे जायची इच्छा नाही. ह्या पुण्यातच आपली हाडे विसवणार.”
“शुभ शुभ बोलरे भाऊ. अजून खूप जगायचे
आहे.” अर्थात जगून एक्झॅटली काय करायचे ह्याचे उत्तर
तात्यापाशी नव्हते. हे फिलॉसॉफिकल बोलणे बंद करण्यासाठी त्याने विषय बदलला.
“भाऊ, कर्वे
रोडवर मेट्रोची लाईन टाकायच्या ऐवजी लक्ष्मी रोडवर न्यायला पाहिजे होती नाही का?
तुला काय वाटत?”
“तिथे कशाला पाहिजे? तिकडे लोक नुसते एका दुकानातून दुसऱ्या दुकानांत खरेदी करत फिरत असतात.
त्यांना कशाला पाहिजे मेट्रो?”
“सरकारने काय करायला पाहिजे होते की
पब्लिक ट्रांस्पोर्टवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे होते. त्यावर पैसे खर्च करायला
पाहिजे होते. म्हणजे ही पाळी आली नसती.”
अश्या गप्पा टप्पा रोजच्यासारख्या झाल्या. शेवटी
भाऊने आपला खास टॉपिक काढला.
“एव्हाना छोटे मालक अमेरिकेतून परत
यायला पाहिजे होते. मी केव्हापासून त्यांची वाट बघत आहे. ते एकदा आले की सगळे
सुरळीत सुरु होईल. ते येतील म्हणून मी मालकांच्या बंगल्यातील बागेची देखभाल करत
आहे. गुलाबाचा ताटवा फुलून गेलाय नुसता धाकट्या मालकांच्या आठवणीने. ह्या असल्या
पावसात देखील जाई जुई फुलली आहे त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.”
तात्या चूप बसला. त्याने भाउला हजार वेळा समजाउन
सांगितले होते. जे इथे झाले होते ते तिथेही झाले होते. पण भाऊ वेड्या आशेच्या
जीवावर जीव लावून बसला होता.
दोघे गप्प बसले होते. आपल्या विचारांत गढून गेले
होते. दोघांचा मनात प्रश्न घोंगावत होते. ज्या पश्नाची उत्तरे नाहीत असे प्रश्न.
अखेर भाऊने शांततेचा भंग केला.
“तात्या तुला भूक नाही लागली? हे बघ साडे बारा झाले.”
तात्याकडून काहीच उत्तर आले नाही. दिवास्वप्नात हरवला
जणू! तात्याची नजर जंगली महाराज
रस्त्याच्या पलीकडे, सीओइपीच्या पलीकडे, माउलींच्या आळंदीच्या पलीकडे, विश्वाचा पैलतीरी
लागली होती. तेव्हाच भाउला समजून चुकले---- तात्या संपला. तात्याचा खेळ खल्लास झाला.
वाईट झालं. वाईट वाटलं. गप्पा मारायला तात्या नसेल तर
डेक्कन पर्यंत पायपीट करण्यात अर्थ नव्हता.
मी तरी जिवंत आहे का की हे केवळ स्वप्न आहे. आणि हे माझेच स्वप्न आहे की दुसऱ्या कुणाच्या
स्वप्नातला मी आहे?
आता तो ह्या क्रूर विश्वात एकटा पडला होता. एकाएकी
त्याला आपल्या मृत्यूची जाणीव झाली. तात्या गेला आपणही जाणार. मृत्यू जवळपास
भिरभिरत होता. केव्हाही झडप घालेल.
मी कुठून आलो? माझे
आईबाबा कोण होते? नदीपल्याडच्या कारखान्यात ते लोक काय बनवत
होते? त्या प्रयोगशाळेत काय प्रयोग करत होते? कितीतरी प्रश्न. प्रश्नावर प्रतिप्रश्न.
अश्या कित्येक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे कधीतरी
मिळतील ह्या आशेवर तो जगत होता. पण आता ते होणे नाही. धाकटे मालक येऊन सर्व
प्रश्नांची उकल करतील, पुन्हा पूर्वीचा क्रम सुरु करतील.
करतीलही कदाचित पण त्यांच्या स्वागताला तो नसणार. जरी प्रश्नांची उत्तरे जाणून
घ्यायचा त्याचा हक्क होता तरी पण आता उशीर झाला होता.
तो परत फिरला. पाउल उचलणे अवघड होत होतं. स्वतःला
कसबस ढकलत ढकलत तो कोपऱ्यापर्यंत आला. तिथेच त्याची पावले अडखळली.
२२१क्रमांकाची कॉर्पोरेशनला जाणारी तेथून जात होती.
तिने भाऊ उभा आहे बघितले. नेहमीप्रमाणे तिने भाउला हाय हेलो केले. पण नेहमीप्रमाणे
भाऊने हात वर करून हाय हेलो रिटर्न केले नाही. तिने परत एकदा आवाज दिला. तरीही भाऊ
स्तब्ध. ती समजायचे ते समजली. यंत्रांना मानवांइतकीच किंबहुना काकणभर जास्तच जाणीव
नेणीव असते. त्यांना सर्व समज असते. ती थोडा वेळ तिथे थांबली. समोरच्या काचेवर
पाण्याचा फवारा उडला. वायपरने डोळे पुसले. आपला आणि भाऊचा तेव्हढाच ऋणानुबंध. चला
आता भाऊ पुन्हा भेटणे नाही.
केव्हातरी झंझावात येईल आणि भाऊ कोलमडून खाली पडेल. तो पर्यंत तो तसाच तिथे उभा असणार!
अश्याप्रकारे जगातल्या शेवटच्या रोबोचे पुण्यातल्या डेक्कन कॉर्नर जवळ दुःखद निधन झाले.
ह्याची कुठेही नोंद होणार नसते. धाकट्या मालकांची वाट होता बिचारा. आयुष्यात
त्याला एक गोष्ट कधी कळली नाही की गोदोची वाट बघणे निरर्थक आहे कारण गोदो कधीच येत
नसतो.
भाऊ गंजल्यामुळे गेला की बॅटरी डाऊन झाल्यामुळे गेला? विचार करून काय उपयोग?
तुम्ही ज्यावेळी डेक्कन जिमखान्यावर आपल्या
रोबोकुत्र्याला घेऊन फिरायला जाल त्यावेळी जर चुकून माकून माझी ही कथा आठवली तर
भाऊ आणि तात्यासाठी दोन अश्रू ढाळा. आणि अशी वेळ तुमच्या प्रिय रोबोकुत्र्यावर
येणार नाही ह्याची काळजी घ्यायला विसरु नका!
Comments
Post a Comment