मिस्ड कॉल

 

मिस्ड कॉल

विनू आणि गोट्या शेताच्या बाजूला असलेल्या  चिंचेच्या झाडाच्या चिंचा पाडत होते.

“ए पोरांनो कुठला गाव आहे हा?” दोन मध्यम उंचीच्या मध्यम वयाच्या बाप्यांनी प्रश्न केला.

“गावात नवीन दिसताय जणू, नाव नाय माहित? मग इथपोत्तर आलात कसे?” विनू आश्चर्यचकित झाला.

“मी आहे अल्फा१ आणि हा माझा मित्र झेटा२६. आम्हाला तहान लागली आहे. प्यायला पाणी मिळेल का?” स्वतःला अल्फ़१ म्हणणारा विचारत होता. आता गोट्या पुढे सरसावला.

“अल्फा पाव्हणं, हे आहे पाळदे बुद्रुक! तुम्हाला दुसरा बाजीराव माहिती आहे का? नाही माहीत? सोडून द्या. तुम्ही असं करा समोर मळयात विहिरीवर मोट चालू आहे. तिथे पाणी प्या. पुढे गावाच्या वेशीवर चहाचा ठेला आहे. तिथे चहा मिळेल. पुण्याला जायचे असेल तर दुपारी येस टी आहे.”

पाव्हणं मोटेचे पाणी पिऊन पुढे निघाले.

मुलांनी सांगितले तसे चहाचा ठेला लागला.

“आम्ही परग्रहनिवासी आहोत. आम्हाला दोन कटिंग द्या, त्याबदल्यात आम्ही तुम्हाला कुठल्याही रोगावर ‘अक्सीर इलाज’ च्या गोळ्या देऊ.” चहावाल्याआने विचार केला, सौदा काय वाईट नाही.

“मला वर्षाचे तीनशे साठ दिवस चोवीस तास सर्दी होते. सकाळी साधारण दोनशे शिंका येतात. ह्याच्यावर चालेल काय तुमचा ‘रामबाण इलाज’”?

“चहावाले, अरे चालेल काय धावेल! सर्दी ही वैश्विक बिमारी आहे. ह्या घ्या दोन गोळ्या. उद्यापासून सर्दी गायब! आम्ही दहा रुपयाला एक अश्या विकतो पण तुम्ही भले माणूस दिसता. आम्ही तुमच्यावर बेहद खूष आहोत. तुम्हाला काही चार्ज नाही.”

दोघांनी दोन कप तुडूंब चहा झाल्यावर विचारले, “ह्याचे किती पैसे झाले?”

चहावाल्याआने हात जोडून म्हटले, “आपल्याकडून काय पैसे घ्यायचे! आशीर्वाद द्यावा हीच विनंती.”

“ह्या गावाचा मुख्य कोण आहे? आम्हाला त्याला भेटायचे आहे.” झेटाने विचारले.

“तुम्ही असं सरळ गेलात की चावडी भेटेल. तेथे एक ढेरपो... म्हणजे जरा गलेलठ्ठ शेठ बसलेले दिसतील. तेच ते आमचे सरपंच शेठ भवानराव देशमुख पाळदे पाटील.”

अल्फा आणि झेटा चावडीत पोचले. शेठ भवानराव देशमुख पाळदे पाटील लोडाला टेकून बसले होते.

“हाय, कस काय पाटील बर हाय का? मी अल्फा१ अन हा झेटा२६. आम्ही परग्रहवासी आहोत. केप्लर-१८६फ ह्या सिग्नस तारकासमूहातील केप्लर१८६ ह्या ताऱ्याच्या पाचव्या ग्रहावर आमचा तीन खोल्यांचा फ्लॅट आहे. वैश्विक कार्यकारीणीच्या आदेशावरून आसेतुहिमाचल यात्रा करत आपल्यासाठी शुभेच्छा घेऊन आलो आहोत. ह्याचा स्वीकार करावा.”

पाटलांचे डोके एवढ्यानेच भणाणले. ते एव्हढेच म्हणू शकले, “बर मंग? नाही म्हणजे प्रॉब्ल्र्म काय आहे?”

अल्फाने खिशातून साबुदाण्या सारख्या गोळ्यांनी भरलेली बाटली काढली. “वैश्विक कार्यकारीणीच्या चेअरमन साहेबांनी आपल्यासाठी भेट पाठवली आहे. एका ग्रहाच्या प्रमुखाकडून दुसऱ्या ग्रहाच्या प्रमुखाला! त्याचा स्वीकार करावा.”

“हे घेऊन म्हन्जी मी काय करायच्रं?”

“ह्या गोळ्या म्हणजे अमृत आहे. कोणत्याही बीमारीवर अक्सीर इलाज. आमच्या डॉक्टर शास्त्रज्ञांनी ४०० वर्षांपूर्वी संशोधन करून हा फॉर्म्युला बनवला.

सर्वेपि  सुखिनःन्तु सर्वे सन्तु निरामयाः 
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् 

अशी आमची पॉलिसी असल्यामुळे ही औषधी आमच्या चेअरमन साहेबांनी विश्वात वाटण्याचे ठरवले आहे. हे फकस्त सॅंपल आहे.”

पाटील साहेबांनी बराच विचार केला. ह्याची एजंसी घेतली तर? गाजराची पुंगी. वाजली तर वाजली.

“मला ह्याची एजन्सी मिळेल तर विचार करू.”

अल्फाने झेटाकडे बघितले. झेटाने अल्फाकडे. दोघांनी एकेकांकडे बघितले.

“चेअरमन साहेबांना विचारावे लागेल.”

“विचरा. विचरा. जरूर विचरा पण तेव्हढे आमचे नाव लक्षात असुद्यात.”

“बर तर पाटील, आमची जायची वेळ झाली. दुसऱ्या ग्रहांना पण कव्र करायचे आहे.” हात जोडून अल्फा म्हणाला.

“अहो, एव्हढ्या दूरवरून आला आहात तर जेवण करुनच जा.”

अल्फाने झेटाकडे बघितले. झेटाने अल्फाकडे. दोघांनी एकेकांकडे बघितले, “पाटीलबुवा तुम्ही फारच आग्रह करता बुवा.”

दोघांनी पोटभरून जेवण केले. सटर फटर गप्पा झाल्या. दोघेही जायला उठले. “तेव्हढे ते आपले काम ....”

“एजन्सीचे ना? मला खात्री आहे होणार म्हणून.”

संध्याकाळी दोन हवालदार सायकल हाणत गावात पोचले.आणि तडक चावडीवर पोचले. पाटील निवांत  पडले होते पेपर वाचत. हवालदार आलेले पाहतांच काही लफडे आहे हे त्यांना समजले.

“असं मधेच अवेळी येणं झालं?”

“त्याचे काय आहे, पुण्याच्या वेड्यांच्या इस्पितळातून दोन वेडे पळून गेले आहेत. तेव्हा जरा जपून रहा. वरून वरून वाटत की हे जेंटलमन शहाणे लोक आहेत पण त्यांच्याशी वाद घालत बसलो तर खवळतात. सायन्स फिक्षण गोष्टी वाचून ह्यांचा भेजा पोकळ झाला आहे म्हणून मग ह्यांच्या नातेवाइकांनी ह्यांना इस्पितळात भरती केल, आपण परग्रहवासी आहोत असा ह्यांचा स्वतःविषयी गैरसमज झाला आहे. तेव्हा असं कोणी गावात आले तर आम्हाला खबर करायची. आम्ही येस्त्तोपतूर त्यांचाशी गोड गोड बोलून त्यांना थांबवा, काय समजलात ना पाटील?”

पाटलांनी आवंढा गिळला. कोयनेलचा कडू जहर डोस घेतल्यासारखा चेहरा झाला. पण काही बोलले नाहीत. आपला मूर्खपणा आपल्या जवळच ठेवावा असा सूज्ञ विषार केला.

“त्या तिकडे त्या डोंगराच्या पल्याड दोन चार पाळदे वाड्या आहेत. पाळदे चोराची, पाळदे धाकटी पाती, पाळदे देवाची. आणखी पण आहेत. तिकडे विचारून बघा.इकडून निघाले ते त्या साइडला गेले. पाटलाला ही ब्याद लवकर गावाबाहेर पिटाळायची होती.

 जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारी, ध्रुवाचा 'वेड' हा तारा
========================================================
प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि येत उषःकाल हा

झेटा-२६ गाण गात गात यान चालवत होता. हायपरस्पेसमधून यान बाहेर पडून पृथ्वीच्या भोवती चकरा मारत होते. चकरा मारता मारता ऊंची ही हळू हळू कमी कमी होत होती. पृथ्वीच्या जवळ जाताना त्याला ते पहाटेचे मनोहारी दृश्य दिसले.

“आपल्याला कुठे उतरायचे आहे?” त्याने अल्फा-1 ला विचारले.

“झेटा, तुला सूचना मिळालेल्या आहेत. पुन्हा पुन्हा का विचारतो आहेस?”

“तस नाहीरे, पण त्या गावाचे नाव उच्चारताना तुझ्या चेहर्‍यावरचे भाव बघून मला हसू येत.”

“पुणे!! झाल? पुण्याच्या डेक्कन जिमखान्यावर नाही, नाहीतर तू नेमक तसच  करशील आणि आपण दोघे हग्या मार खाऊ.आपल्याला आधी पुण्याच्या सीमारेषेवर उतरावे लागेल पुण्यात चंचु प्रवेश मागाहून.”

पुण्याचे विहगम दृश्य पाहून त्यांनी यान मुळशीकडे वळवले. झुंजु मुंजू होता होता यान एका आड बाजूला उतरले.

अल्फा आणि झेटा यानाच्या बाहेर पडले. दरवाजे बंद करून त्यांनी यान दाट झाडीत लपवले.

सरड्या सारख्या दिसणार्‍या त्यादोघांनी स्वतःकडे एक नजर टाकली.

“आपण जर असे गेलो तर हे लोक आपल्याला  दगडांनी ठेचून मारतील. हे बाह्य रूप बदलायला पाहिजे. आपल्या हाऊ टु सरवाईव्ह ऑन टेरान मधे काय लिहिले आहे? काय वेशभूषा करावी असे लिहिले आहे?”

अर्धा पाऊण तास चालल्यावर ते एका खेड्यापाशी आले. दोन मुले पाटी दप्तर  लटकाऊन शाळेत चालली होती. त्या दोघांना पाहून गोट्या नावाचा मुलगा दचकला, “विन्या, कालचे दोन वेडे परत आले बघ.” अर्थात हे ते च्या भाषेत बोलत होते. त्यांना समजू नये म्हणून॰ एनिवे अल्फा आणि झेटा ह्यांना मराठीच  समजायला वेळ लागणार होता. कानात टाकलेल्या बॅबलफिशला मराठीचे प्राथमिक ज्ञान होते. हळू हळू जमून जाईल.

ते पृथ्वीवरचे जीव प्रथमच बघत होते. तीन साडेतीन फुटाचे—सॉरीएक मीटर उंचीचे जीव बघून त्यांना गंमत वाटली.

“हॅलो. मानव, कैसे हो?” हिन्दी सगळयांना समजते असे त्यांना सांगण्यात आले होते.म्हणून त्यांनी हिंदीत सुरवात केली.

“तू अल्फा आणि तू झेटा नं ? पुन्हा आलात का? पाणी पाहिजे असेल तर तिकडे विहीर आहे. चहा पाहिजे असेल तर गावावाच्या वेशीवर मिळेल. अस बोलून गोट्या आणि विनूने काढता पाय घेतला.

अल्फा आणि झेटा ह्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ह्यांना आपली नाव कशी  माहीत झाली? हे लोक मनकवडे आहेत की काय? अधिक विचार न करता ते गावाच्या दिशेने चालू लागले.

“तुला पाणी प्यायचे आहे?”

“नाही. 

गावाच्या वेशीवर आल्यावर त्यांना तो ठेला लागला. काही लोक तिथ कषाय रंगाचे पेय पित होते. तर काही लोक पांढरी कांडी तोंडात धरून नाका तोंडातून धूर काढत होते. धिस वाज मात्र टू मच फॉर अल्फा. तो ते दृश्य अनिमिष नेत्रांनी बघत राहिला. “बारा ग्रहांचे पाणी प्यालेला मी. अख्ख्या विश्वात हे प्रथमच बघत आहे.” ही वाज टोटलि फँसिनेटेड.

“ह्या लोकांचा हा जठराग्नि आहे का वडवानल!. हे जीव  आतून पेटून उठले असणार! बापरे.”

चहावाल्या पोराने दोन कप चहा समोर आदळले.

“हे जे काय आहे ते अफलातून आहे. मला दिवसभराच्या कामासाठी एनर्जी आली आहे. झेटा खुश झाला होता.

“चल लवकर आपल्याला बरीच कामे उरकायची आहेत.” बाकड्यावरून उठून जायला लागणार तो चहावाल्याने आवाज दिला, “ओ फेकू, चहाचे पैसे काय तुमचा बाप देणार? कालच्या आणि आताच्या चहाचे पैसे टाका.” अल्फाला समजेना चहा काय? पैसे काय? बाप काय?

वेड पांघरून पेडगावला जायचे नाटक करू नका॰ पैसे टाका त्याशिवाय एक पाउल पुढे टाकू देणार नाही. चहावाल्याने अल्फाच्या शर्टाची कॉलर पकडली. “गण्या. तो माझा सोटा देरे। तू ह्यांचे खिसे तपास. जे काय असेल ते घे काढून. काल मी तुम्ही दिलेल्या गोळ्या खाल्ल्या. ढिम्म देखील फरक पडला नाही. उलट आज जास्तच शिंका आल्या. चोर लेकाचे.”

दोघाच्या मनगटावर युनिव्हर्सल क्रोनोमिटर होता. कम्युनिकेटर होता, “घे ती घड्याळे आणि ते मोबाइल. विकले तर शे दीडशे नक्की येतील.” मग त्या दोघांना धक्के मारून हाकलून दिले.

थोडे  चालून गेल्यावर झेटा दुःखाने म्हणाला. “काय लोक आहेत हे, आणि आपण ह्यांचे भले करण्यासाठी चारशे प्रकाशवर्षे पार करून आलो.”

अल्फा त्याचे सांत्वन करत म्हणाला. “निराश होऊ नकोस.इथे चांगले जीव देखील असतील. आपले महत्वाचे काम म्हणजे ह्याच्या मुख्याची गाठ भेट घ्यायचं आहे.” मध्यंतरच्या काळात झेटाने त्याच्या मांडीत एंबेड केलेल्या इमरजेनसि बॅक अ‍ॅप डिवाईसने घड्याळ आणि मोबाइल परत आणले. ह्या असल्या परिस्थितीत वापरण्यासाठीच ते होते. नाहीतर घड्याळ आणि मोबाइल शिवाय विश्वात प्रवास करणे अशक्यच होते.

रस्त्याने जाणार्‍या एका शेतकर्‍याला त्यांनी पकडले. प्रणाम मानव. कसे आहात आपण? आपल्या मुखियाकडे आम्हाला घेऊन जाल का?”

तो एकदम खवळून उठला, “मला काय शेतीची काम नाहीत काय? जा सरळ. चावडीवर पसरला असेल तो ढेरपोट्या.”

अल्फा आणि झेटा चावडीत पोचले

चावडीवर शेठ भवानराव देशमुख पाळदे पाटील, सरपंच पाळदे ग्रामपंचायत, लोडाला टेकून बसले होते. अल्फा अन झेटाना बघून त्यांना 440 वोल्ट्सचा झटका बसला. त्यांचा क्रोध गगनाला भिडला. पण लागोलाग त्यांना हवालदार साहेबाने सांगीतलेल आठवलं॰

तेव्हा अस कोणी गावात आले तर आम्हाला खबर करायची. आम्ही येस्त्तोपतूर त्यांचाशी गोड गोड बोलून त्यांना थांबवा, काय समजलात ना पाटील?”

अल्फाने बोलायला सुरुवात केली. “प्रणाम मुख्यमहोदय. मी अल्फा१........”

पाटलांनी त्याला मधेच तोडले. “मी अल्फा१ अन हा झेटा२६. आम्ही परग्रहवासी आहोत. केप्लर-१८६फ ह्या सिग्नस तारकासमूहातील केप्लर१८६ ह्या ताऱ्याच्या पाचव्या ग्रहावर आमचा तीन खोल्यांचा फ्लॅट आहे. वैश्विक कार्यकारीणीच्या आदेशावरून आसेतुहिमाचल यात्रा करत आपल्यासाठी शुभेच्छा घेऊन आलो आहोत. ह्याचा स्वीकार करावा.” असेच म्हणायचे आहेना तुम्हाला.”

आता आश्चर्यचकित व्हायची पाळी अल्फा आणि झेटावर आली.

अगदी तसे नाही पण जवळ जवळ तसेच.” झेटा कसबस बोलला.

मधेच सरपंचांनी एका पंचाला बोलावून त्याच्या कानात खुसुरपुसुर केली.

ती साबूदाण्याच्या गोळ्यांची बाटली? वैश्विक कार्यकारीणीच्या चेअरमन साहेबांनी आपल्यासाठी भेट पाठवली आहे. एका ग्रहाच्या प्रमुखाकडून दुसऱ्या ग्रहाच्या प्रमुखाला! त्याचा स्वीकार करावा.” सर्व रोगांवर रामबाण इलाज. ती बाटली पण द्याना.

अल्फाला काही कळेना. तो चक्रावून गेला होता. तो अगदी हेच वाक्य बोलणार होता.

तो झेटाला एव्हढेच बोलला. “झेटा, कुछ तो गडबड है.” हे तो अर्थात त्यांच्या भाषेत बोलला. झेटाने संमती दर्शावली. अश्या शिळोपयाच्या गप्पा चालू असताना चहा आला.

“घ्या पाव्हन, चहा घ्या.”

अल्फाने घाबरून चहाकडे पाहिले. नको नको, चहा नको.” त्याला माहीत होते की चहा पिऊन झाल्यावर हे लोक आपल्याला धरून ठोकणार कारण त्याचाकडे “पैसे” नव्हते न.

“अहो, आम्ही तुम्हाला प्रेमाने देतो आहे अन तुम्ही नाही नाही म्हणता आहात. काय म्हणावं याला?”

“नको नको. आमच्याकडे पैसे नाहीत.”

वाचक हो एकूण घोळ तुम्हाला समजला  असेलच.

अर्थात अल्फा आणि झेटा कसे निसटले आणि पुढच्या मार्गी कसे लागले हे सर्व पुन्हा केव्हातरी सांगेन.

पण ह्या सगळ्या गोंधळामुळे  आपले किती नुकसान झाले ते पहा.

1)मानवाची लाईफ एक्सपेक्टंसी जी सध्या साठपासष्ट वर्षे आहे ती जवळ जवळ चारशे-साडेचारशे वर्षे झाली  असती.

2)सध्या आणि भविष्यात येणार्‍या महामारींवर रामबाण औषध मिळाले असते.

3)सहारा, गोबी, राजस्थान-थार, मोजावे इत्यादि वाळवंटांत नंदनवने फुलली असती.

सगळ्यात महत्वाचे

4)कोथरूड ते हिंजवडी प्रवास पाच मिनिटात झाला असता.

ही अशी त्या परग्रहवासीयाची प्रपोजल्स होती. आपण त्यांना वेड्यात काढले आणि पळवून लावले.

आता बसा दिवसरात्र कुठे लस मिळते का ते शोधत.

 

तात्पर्य

उद्या समजा बसमध्ये तुमच्या शेजारी बसलेला जर तुम्हाला म्हणाला, “सर मी अमुक अमुक ग्रहावरून तुमच्यासाठी खास गिफ्ट घेऊन आलो आहे ....”

त्याला वेडा नका म्हणू. त्याला सिरियसली घ्या.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular Posts