इलाज नसलेला फीव्हर
इलाज नसलेला फीव्हर
मी संध्याकाळचा चहा पीत बसलो होतो. तेवढ्यात माझा
फोन थरथरायला लागला. बघतो तर काय पुष्पा वहीनींचा फोन! बहुतेक गरम गरम कांदापोहे
तयार आहेत. या खायला असा निरोप असणार किंवा रात्रीचे जेवण इकडेच करा, अस आग्रहाचे
निमंत्रण असणार. म्हणून मी उत्साहाने फोन
उचलला.
“हॅलो, वहिनी कांदा पोहे...”
मला पुढे बोलू न देता वहिनी बोलू लागल्या,
“अहो बंड्या भावोजी, तुम्ही ताबडतोब इकडे निघून या पाहू. तुमचे मित्र पहा कसं
वेड्यासारखे करताहेत. ह्यांचे मन दुपारपासून थाऱ्यावर नाही.”
“वहिनी, काय प्रोब्लेम आहे ते तरी सांगा मला.”
“तुम्ही येताय कि मीच ह्यांना घेऊन डॉक्टरांकडे जाऊ?”
“आलो, आलोच.”
मामला गंभीर दिसत होता. दोन दिवसापूर्वीच
तर पम्या मला भेटला होता. तेव्हा तर व्यवस्थित होता. एकदम काय झाले? फटाफट कपडे
करून मी पम्याच्या घरी पोचलो. बघतो काय तर
पम्या टीवी समोर हातात रिमोट घेऊन बसलेला. झपाझप चानल बदलत होता. त्याचे माझ्याकडे
लक्ष नव्हते. बाजूला कादापोह्यांनी भरलेली ताटली आणि कप भरून चहा होता. दोनीही
थंडगार झालेले.
“ह्यांनी सकाळी जेवण सुद्धा केलेलं नाही. तेव्हा पासून रिमोट घेऊन सारखे चानल बदलताहेत. काय शोधताहेत काय माहित. विचारलं
तर चकर शब्द काढायला तयार नाहीत. तुम्हीच बघा.”
मी खुर्ची ओढून पम्याच्या शेजारी बसलो.
“पम्या लेका काय शोधतो आहेस. तारक मेहता शोधत असशील तर आज मला पण मिळाला नाही. आणि
‘दया दरवाजा फोड’ तर रात्री असतं.”
“तारक मेहता आणि दया? ते कुणाला बघाचय. मी कुठे क्रिकेटचची मॅच आहे का ते शोधतोय. सगळे
झाले क्रिकइनफो, क्रिकबझ, क्रिकेट365, क्रिकेट२४*७, ऑलवेज११, क्रिकेट मेरा प्यार
सगळ चेक केल. कुठेच मॅच नाही.”
“पम्या, आज कुठेही क्रिकेटची मॅच नाही.”
“काय सांगतोस काय? पेपरला, टीवी वर, न्यूज चानलवर कुठेही ही महत्वाची बातमी आलेली
नाही.”
“म्हणजेच मी जी बातमी सांगतो आहे ती खरी आहे.” मी जोरात बोललो.
“यू मीन टू से की अगदी हॉलंड विरुद्ध स्वीडन अंडर १३ मुलींची मॅच आज होती ना. ती
पण कुठे दिसत नाही.”
“पम्या, ती मॅच उद्या आहे. आज कुठलीही मॅच नाही.”
“ती टी एन पी एलची तामिळ टायगर्स विरुद्ध कुम्भकोणम इलेवन ती पण दिसत नाहीये.”
“ती कालच झाली.”
“ती पहिली होती. आज रिटर्न लेग होती.”
अस आमच बोलण चालल असताना पम्या ओरडला,
“बंड्या ही बघ. इथ मॅच चालली आहे.” कुणीतरी सिक्स मारली. पम्या खुश.
“पम्या ही त्या ट्रिपल X कोलाची जाहिरात आहे. “ट्रिपल X” है तो मुमकिन है वाली.”
“काही तरीच काय. ट्रिपल X कोलाच्या जाहिरातीतील
कोलाने न्हाणारी तरुणी कुठ आहे? बोल.”
जाहिरात संपली आणि बरोबर मॅचही.
पम्याने पुन्हा सर्फिंग चालू केले.
“बंड्या, ही बघ इथे आहे मॅच!” पम्या
उत्साहाने ओरडला.
“पम्या, अरे अक्षयकुमारचा नवा पिक्चर आला आहे “खिलाडी२०२२” त्यातली ही मारामारी
आहे. अक्षयकुमार क्रिकेटची बॅट घेऊन विलनला मारतो आहे असं ते दृश्य आहे. असे WWE
क्रिकेट यायला अजून दहा वर्ष तरी लागतील. सध्या तिकडे आपली वाटचाल चालू आहे म्हणा.”
मी वहिनींना बाजूला घेऊन हलक्या आवाजात सांगितले, “ह्याचा क्रिकेट फीवर खूप बळावला
आहे. केस हाताबाहेर जायच्या आधीच उपचार करावे हे उत्तम. माझ्या माहितीतला एक
डॉक्टर आहे. तो “क्रिकेटिक निनावी” नावाची NGO चालवतो. तो ह्यावर इलाज करू शकेल.”
मी डॉक्टरला फोन करून परिस्थितीची कल्पना दिली आणि सांगितले की मी पेशंटला घेऊन
येतो आहे.
मग मी पम्याकडे परतलो.
“पम्या, आत्ताच मला आठवलं. आज रात्री पापुआ
न्यू गिनी विरुद्ध टास्मानिया अंडर १९ विश्वकप क़्वालिफ़िकेशन सामना आहे. तो या
तुझ्या साध्या टीवीवर दिसणार नाही. माझ्या एका मित्राकडे सॅटेलाईट अन्टेना आहे. त्याच्या
टीवीवर आपण बघू शकू. चल उठ तयार हो. आपण त्याच्या कडे जाऊ.”
“बंड्या हे पहिले छूट का नाही सांगितलेस? मी पण तसली अन्टेना बसवून घेतली असती. पापुआ
न्यू गिनीचा सेसे बाऊ काय फलंदाजी करतो. आणि काबुआ मोरिया! क्लास लेफ्टहॅंड मिडींअम
पेसर. वा वा चल लवकर. एक मिनिट, बंड्या, पण
टास्मानियाची टीमच नाहीये. माझी फिरकी घेतोयस?”
पम्याने मला बरोबर पकडले होते. “सॉरी.
पम्या मला म्हणायचे होते,---मलेशिया. चल आता लवकर.”
“मलेशियाची टीम ओके डोके आहे. पण चालेल. क्रिकेटके लिये हम कुछ भी कर सकते है. कहीभी
जाने के लिये तय्यार है.”
आम्ही डॉक्टरांच्या कडे गेलो तेव्हा डॉक्टर स्वतःच क्रिकेटची मॅच बघत बसले होते.
मी कपाळावर हात मारून घेतला. हा पम्याचा काय इलाज करणार?
“आयला मॅच!” पम्या उत्तेजित होऊन ओरडला, “काय कव्हर मधून चेंडू काढला आहे. हा सुनील
असणार. त्याच्या शिवाय असा शॉट कोण मारणार.” जणू तो सुनील का कोण पम्याचा लंगोटीयार.
शाळेत बरोबरच गोट्या खेळत असत ना.
“बंड्या, सध्या कोणते साल चालू आहे? २०२२ ना. मग सुनील कुठून आला. का त्याने पुनरागमन
केले आहे?”
“नाही नाही, ही सुनीलची पहिली टेस्ट आहे ज्यात त्याने 65 आणि 67 धावा केल्या होत्या. मी ती मॅच रेकार्ड करून ठेवली होती. आज
कुठेही मॅच नाही म्हणून लावली झालं.”
“मी सांगितले ना बंड्या हा सुनील आहे म्हणून.” पम्याचा ऊर अभिमानाने भरून गेला.
“पण आधी तुम्ही चहा घ्या. मग आपण सावकाश मॅच बघू.” डॉक्टर माझ्याकडे बघून डोळे
मिचकावत बोलले.
चहा प्याल्यावर पाच मिनिटात पम्या सोफ्यावर आडवा पडून हलके हलके घोरू लागला.
“बंडोपंत हा आता सकाळ पर्यंत झोपून राहील. क्रिकेटचे वेडही थोडे कमी होईल. पण एक सांगतो.
ह्यावर पक्का इलाज अजूनपर्यंत सापडलेला नाही. संशोधन चालू आहे. मी ह्याचे “क्रिकेटिक
निनावी” मध्ये नाव नोंदवून ठेवतो. बंडोपंत, रिअली यू हॅव टू ग्रो आउट ऑफ इट. त्याचे
असं आहे, इफ यू आर नॉट मॅड अबाउट क्रिकेट व्हेन यू आर यंग, समथिंग इज रॉंग विथ यू.
अॅंड इफ यू आर स्टील मॅड अबाउट क्रिकेट अॅट फॉर्टी, अगेन समथिंग इज रॉंग विथ यू.”
पम्याचे क्रिकेट वेड उपचाराने हळू हळू कमी होतंय. पण डॉक्टर म्हणाले तसं, ही हॅज
टू ग्रो आउट ऑफ इट.
Comments
Post a Comment