पृथ्वी एक अंतराळयान


 



तुम्हाला  मनातून अंतराळ वीरांचा हेवा वाटत असेल. लहानपणी अनेक स्वप्ने असतात. त्यापैकी एक म्हणजे अंतराळवीर होण्याचे! जुल व्हर्नचे ‘चंद्रावर स्वारी’ पुस्तक वाचले असणारच. पण पुढे मोठे झाल्यावर तुम्ही अंतराळवीरांच्या ट्रेनिंगची चित्रफित बघितली असेल किंवा हॉलीवूडचे चित्रपट बघितले असतील. मनातल्या मनात तुम्ही विचार केला असेल, “नको रे बाबा, त्यापेक्षा आपला ९ ते ५ जॉब चांगला आहे.”

पण....

तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण आपण सगळेच अंतराळवीर आहोत! तुम्ही, तुमची प्रिया पत्नी, चिरंजीव गोट्या, शेजारचे काका-काकू, सोसायटीचा वॉचमन? येस, तो सुद्धा.

आणि आपले अंतराळयान आहे पृथ्वी. 

जो निसर्ग केळयाचे वा नारळाचे वा संत्र्याचे पॅकेजिंग करतो  त्याच निसर्गाने आपल्या पृथ्वी यानाची रचना केली आहे. ह्या यानात तुम्हाला शुद्ध हवेचा आणि पाण्याचा पुरवठा  करणारी यंत्रणा आहे. मलमुत्राची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा आहे. इत्यादी. नाहीतर आपण बनवलेल्या यानात मूत्र गळून स्वच्छ करून पुन्हा... जाऊद्यात झालं.

तर ह्या पृथ्विरूपी यानात बसून आपण कुठे जात आहोत? सकाळी सहा पासून दुसऱ्या दिवशी सहा वाजेपर्यंत आपण काय करततो? सकाळी आपले नेहमीचे कार्यक्रम आटोपून आपण खुर्चीवर<strong><em> बसून </em></strong>चहा नाष्ट्याची वाट पहात बसतो, नाश्ता झाल्यावर कार/बस मध्ये  <strong><em> बसून </em></strong>   कचेरीत जातो. कचेरीत  <strong><em> बसून </em></strong> कंटाळा आला की घरी परततो. त्यानंतर टी व्ही समोर<strong><em> बसून </em></strong>  निरर्थक आरडा ओरडा पहात ऐकत बसतो.  त्या बघण्याचाही कंटाळा येऊन आपण आपल्या नकळत  गुपचूप झोपी जातो. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता... 

तर ह्या चोवीस तासात आपण उठणे, बसणे, जेवणे, बसणे, बसणे, जेवणे, झोपणे ह्या शिवाय काहीही केले नाही.

ह्या  पृथ्वीनामक यानात आपण ‘बसलो’  असताना पृथ्वी आपल्या आसाभोवती गिरकी घेत असते, सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असते, आपल्या ‘यानासह’ सूर्यमाला आपल्या आकाशगंगेच्या मध्याभोवती प्रदक्षिणा करत असते. आणि हे सर्व लटांबर  सावरत आकाशगंगा अजून कुठेतरी घाईघाईने पळत असते. अशी ही आकाशगंगा बघून आपल्याला मुलांचे हात पकडून गर्दीतून वाट काढणाऱ्या कुणा लेकुरवाळ्या माउलीची आठवण येणे साहजिक आहे.


आपले पृथ्वियान चोवीस तासात स्वतःच्या आसाभोवती  एक --फिरकी म्हणा किंवा गिरकी म्हणा--  घेते. पृथ्वीचा आस म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव ह्यांना जोडणारी काल्पनिक रेषा. पृथ्वी पश्चिमे कडून पूर्वेकडे फिरत आहे. अवकाशातून उत्तर ध्रुवावरून जर आपण पृथ्वीचे निरिक्षण केलेतर पृथ्वी घड्याळ्याच्या दिशेच्या उलट दिशेने (counterclockwise) फिरत असलेली दिसेल, म्हणून टोकियोला मुंबईच्या आधी आणि लंडनला मुंबईच्या नंतर सूर्योदय होतो.

आपले पृथ्वियान चोवीस तासात स्वतःच्या आसाभोवती  एक --फिरकी म्हणा किंवा गिरकी म्हणा--  घेते. ह्यात मला थोडी दुरुस्ती करायची आहे. खरतर चोवीस तास नाही -२३ तास, ५६ मिनिटे, आणि ४.०९०५३ सेकंद अशी दुरुस्ती पाहिजे. पृथ्वीचा विषववृत्तीय परीघ आहे ४००७५ किलोमीटर. म्हणजे विषववृत्तीय पृष्ठभाग  प्रती सेकंद ४६० मीटर्स  किंवा साधारणपणे १६५६ किलोमीटर्स/तास(जवळपास ताशी १००० मैल) वेगाने फिरत आहे. 


ब्रेकिंग न्यूज! पृथ्वीचा हा वेग हळूहळू मदवतो आहे. दिवस मोठा होत चालला आहे. दिनामानात प्रत्येक शतकात १.८ मिलीसेकंदाने वाढ होते आहे. ह्याचा अर्थ ६०० दशलक्ष वर्षांपूर्वी दिवस २१ तासांचा होता! ह्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. उदा. चंद्र आणि सूर्य ह्यांच्या भरती ओहोटीचे परिणाम, पृथ्वीच्या वस्तुमानाचे वितरण, बर्फ बनणे, हवामान बदल, महासागर आणि पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र इत्यदी.

अजून एक ब्रेकिंग न्यूज!

२०२० साली शास्त्रज्ञांनी आश्चर्यजनक शोध लावला आहे--- पृथ्वीचा फिरकीचा(spin) वेग वाढला आहे. २०२० साली २८ दिवस नेहेमीपेक्षा कमी लांबीचे(शोर्ट) होते. ह्याचीही अनेक कारणे सांगितली जात आहेत. जाऊ देत. आपल्याला महिन्याच्या महिन्याला पगार मिळाला म्हणजे झालं.


ह्या बरोबर पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करत आहे. सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्यामधिल अंतर थोडे कमी जास्त होत असते. सर्वसाधारणपणे हे अंतर १५० दशलक्ष किलोमीटर आहे. ह्यालाच खगोलशास्त्रज्ञ एक अस्ट्रॉनॉमिकल युनिट (AU) असे संबोधतात. अर्थात आपल्याला पृथ्वीच्या  ह्या परिभ्रमणांची जाणीव होत नाही पण ह्यांचा वेग प्रचंड आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्याच वेग ताशी १००००० किलोमीटर आहे. पृथ्वी ज्या पातळीत सूर्याभोवती फिरते तिला एक्लीपटिक प्लेन असे नाव आहे. पृथ्वीचा आस ह्या पातळीच्या लंबरेषेशी २३.५ अंशांनी कळलेला आहे. ह्या आसाचा रोख “ध्रुव”तारा (pole star किंवा north star) दर्शवतो,  पण आपण समजतो तसा “ध्रुव” तारा अढळ  पदावर नाही.

इसवी सन २१०२ पर्यंत पोलारीस हाच आपला नॉर्थ स्टार राहील. त्या आधी ख्रिस्त पूर्व ३००० साली द्रॅको तारका समूहातील (constellation) थुबन नावाचा अंधुक तारा north star होता. अजून १३००० वर्षांनी वेगा नावाचा तेजस्वी तारा नॉर्थ स्टार होईल. 

पृथ्वी सूर्याभोवती कौंटरक्लॉकवाईज फिरते. स्वतःभोवती सुद्धा ती कौंटरक्लॉकवाईज फिरते. हा काही योगायोग नाही. सूर्यमालेतील ग्रह, लघुग्रह आणि सूर्य हे सर्व कौंटरक्लॉकवाईज फिरतात कारण सुर्यासभोवतालच्या ज्या तप्त वायुमंडलातून ग्रहांंची निर्मिती झाली ते वायुमंडल कौंटरक्लॉकवाईज फिरत होते.

  

हा आपल्या पृथ्वियानाच्या प्रवासाचा छोटा .अध्याय झाला. 

आपली सूर्यमाला आकाशगंगेत म्हणजे “अवर गॅलक्सि” मध्ये मोठ्या प्रवासाला निघाली आहे. ह्या प्रवासाच्या गतीचे दोन घटक आहेत. आपल्या शेजारचे तारे आणि आपली सूर्यमाला ह्यांच्यातली सापेक्ष गती हा पहिला घटक.

आकाशगंगेच्या मोठ्या चित्रफलकावर एक रंगाचा ठिबका काढा. दीर्घिकेत/ तारकासमूहात  सर्वसाधारणपणे १०० बिलिअन(बिलिअन म्हणजे १०^९ , दहावर नउ शून्य) इतके तारे असतात. ह्या ठिबक्याचा  आकार संपूर्ण चित्राच्या १०००० पटींनी कमी आहे. त्यात किमान एक कोटी तरी तारे असावेत असा अंदाज आहे. हा ठिबका म्हणजे आपले शेजार. आपल्या जवळपास किमान काही हजार ते काही लाख तारे असावेत. हे तारे मनमानेल त्या सापेक्ष गतीने  इकडे तिकडे फिरत असतात. इथे आपली सूर्यमाला जवळच्या शेजाऱ्याच्या मानाने ताशी ७०००० किलोमीटर वेगाने भ्रमण करत आहे. असे जर असेल तर मग हे तारे  आपल्या बाजूने पळताना का दिसत नाहीत? असे पहा की आकाशात उंचीवरून जाणारे विमान हळूहळू चालले आहे असे वाटते. तेच विमान जर आपल्या डोक्यावरून जात असेल तर आपल्याला त्याच्या गतीची  जाणीव होते. आपण आणि आपले “शेजारी” ह्यांच्यातल्या अफाट अंतरांमुळे आपल्याला शेजाऱ्याच्या गतीची कल्पना  येत नाही. पण जर का आपण हजार वर्षे आकाश निरिक्षण केले तर आपल्याला तारयांच्या गतीची कल्पना येऊ शकेल. आज जे आकाश आपल्याला दिसत आहे ते तसे हजार वर्षांपूर्वी दिसत नव्हते आणि  भविष्यातील हजार वर्षांनी ते तसे दिसणार नाही.

कोट्यावधी वर्षापासून आपले शेजारी  तारे अंदाधुंद फिरत आहेत पण  त्यांच्या टकरा टकरीचा योग मात्र दुर्मिळ आहे. कारण तेच. ह्या ताऱ्यांमधील प्रचंड अंतरे!

आता दुसरा घटक. 

आपल्या सूर्यमाले पासून आकाश गंगेचा मध्य २७००० प्रकाशवर्षे दूर आहे. (प्रकाशवर्ष ही अंतर मोजण्याची “फुटपट्टी” आहे. एक “प्रकाश सेकंद” म्हणजे प्रकाश एका सेकंदात जेव्हढा प्रवास करतो ते अंतर. प्रकाशाचा वेग प्रति सेकंद ३००००० किलोमीटर्स आहे. म्हणजे प्रकाश एका सेकंदात  ३००००० किलोमीटर्स अंतराचा टप्पा पार करतो. एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशकिरण एका वर्षात जेव्हढा प्रवास करेल ते अंतर. हिशोब केला तर एक प्रकाशवर्ष = ९.४६ ट्रिलिअन किलोमीटर्स. एक ट्रिलिअन = १०^१२ = १० वर बारा शून्य!) 

आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या मध्याभोवती ताशी ८००००० किलोमीटर वेगाने प्रदक्षिणा करत आहे. ही एक प्रदक्षिणा करायला पूर्ण करायचा वेळ आहे २३० दश लक्ष वर्षे!

प्रभामंडल

आकाशगंगेत कोट्यावधी तारे आहेत. ते आकाशगंगेच्या मध्यापासून विविध अंतरावर आहेत. जेव्हा शास्त्रज्ञांनी त्यांच्या वेगाचा अभ्यास केला, तेव्हा काही आश्चर्यजनक गोष्टी समोर आल्या. आकाशगंगेचे वस्तुमान आकाशगंगेच्या सभोवती पसरलेल्या प्रभामंडळात (halo)एकवटले आहे आणि हे वस्तुमान अदृश्य(dark matter) आहे. 

विश्वात कोट्यावधी तारकामंडले(galaxy) आहेत. यातील काही एकमेकांपासून दूर जातात तर काही एकमेकांकडे प्रवास करतात. आकाशगंगेच्या भोवती किमान दोन तारकासमूह चक्कर मारतायेत. त्यांची नावे आहेत छोटा आणि मोठा मेगेलानिक क्लाउड. दस्तुरखुद्द आपली आकाशगंगा Andromeda तारकासमूहाकडे ताशी ३००००० किलोमीटर वेगाने प्रवास करत आहे. घाबरायचे कारण नाही कारण त्यांची टक्कर व्हायला अजून कोट्यावधी वर्षे वेळ आहे. 

तो पर्यंत आपण एकमेकांचा द्वेष करूया, जमलतर एकमेकांचे जीव घेयुया, क्रिकेटच्या मॅचेस  बघूया, सासू सुनांच्या हाणामारीच्या सिरिअल्स बघूया. 

विनाशाला अजून खूप वेळ आहे.

तोपात्तर चला ऐश करूया. 

(चित्र विचित्र कथांसाठी माझा ब्लॉग इथे आहे.)

(https://iammspd.blogspot.com)





 



Comments

Popular Posts