गोष्ट आहे पक्कीची
गोष्ट आहे पक्कीची. आधी
तुम्हाला पक्की कोण त्याची ओळख करून द्यायला पाहिजे. नाहीतर तुम्ही पण पक्कीला
वेडा ठरवून त्याच्या गोष्टी वाचणार नाहीत. पक्कीची पक्की ओळख झाली की मग तुम्ही
त्याचे फॅन व्हाल!
पक्की ऊर्फ पक्या ऊर्फ प्रकाश हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याचे वय किती? तो
कितीवीत शिकत आहे? कुठल्या शाळेंत जातो? मला नका विचारू कारण त्याची उत्तरे मला
माहीत नाहीत. कधी कधी तो इतका प्रगल्भ वागतो की त्याचे वय साठ+ असावे असे वाटावे.
कधी कधी त्याच्या निरागस वागण्याने तुम्हाला वाटेल की तो पाच सहा वर्षांचा असावा.
तुम्हीच ठरवा. शेवटी बाघा महाराज म्हणतात तेच खरे आहे, “ जैसी जिसकी सोच.”
पक्की मुलगा आहे हा देखील निव्वळ योगायोग. तो मुलगी पण
झाला असता. पक्कीच्या मते शहाण्णव टक्के मुली ब्याण्णव टक्के मुलांपेक्षा एकशेदोन
टक्के हुशार असतात. काही कळले? म्हणून “कधी
कधी तो इतका प्रगल्भ वागतो की त्याचे वय साठ+ असावे असे वाटावे” असे मी उगीच नाही
लिहीलं. पक्कीनेच मला सांगितलं आहे की ह्याचा अर्थ साध्या भाषेत सांगायचा झाला तर
असा आहे की मुलगा आणि मुलगी ह्यांच्यामध्ये
काहीही फरक नाही.
तर असा हा पक्की माझा
लहानपणाचा दोस्त. मी मोठा झालो. वयाने वाढलो. काय करणार मोठे न होणे आपल्या हातांत
थोडेच असते. पक्की मात्र लहानाचा लहानच राहिला. नशीबवान आहे बेटा.
ही गोष्ट मला पक्कीने
सांगितलेली. ती मी तशीच्या तशी लिहिली. आता मी लेखक आहे. त्यामुळे १+१=२ असं लिहायला लागलो तर तुम्ही म्हणाल की हा काय
शास्त्रीय निबंध आहे की ललितलेखन आहे. मग थोडा मिर्चमसला लावला आहे. कच्च्या
कैरीला तिखटमीठ लावतात तसे.
पक्कीच्या आईवडिलांना पक्कीची फार फार काळजी वाटत असते. हा
मुलगा केव्हा नॉर्मल होणार ह्या काळजीने
त्यांना कधी कधी अस्वस्थ होत असे .त्यांनी
पक्कीला कितीतरी डॉक्टरांच्याकडे नेले. पण कुणीही पक्की सारखी केस बघितली
नव्हती. काहीजण म्हणाले की हा मोठा झाल्यावर आईनस्टीन होणार. तर काही जणांच्या मते
हा दहावी पास झाला तरी खूप झाले. एका डॉक्टरने सांगितले की ह्याचे लाड कमी करा. ते
बाबांना एकदम पटले. दुसऱ्या दिवशीपासून पक्कीचा गोळ्या चॉकलेटचा खुराक बंद झाला.
पिक्चर टीवी बंद झाला. रात्री लवकर झोपायचे सकाळी लवकर उठायचे असे कडक शिस्तीचे
रुटिन सुरु झाले. पक्कीला त्यामुळे काही फरक पडला नाही. पूर्वी तो मित्रांना फुकट
सल्ले देत असे. आता त्याने एक गोळीचा चार्ज आकारायला सुरवात केली. त्याला स्वतःलाच
ते बरोबर वाटले नाही. पुन्हा त्याने फुकट सल्ला द्यायला सुरवात केली. ह्या
त्याच्या निस्वार्थीपणावर खुश झालेले त्याचे मित्र त्याला डबल गोळ्या द्यायला
लागले. कडक शिस्तीचे रुटिन पण बंद झाले कारण लक्ष कोण ठेवणार? प्रथम बाबा उठून त्याच्या
मागे लागायचे. नंतर त्यांचा पण उत्साह ढेपाळला. ते स्वतः पूर्वीसारखे वागू लागले.
म्हणजे सात वाजता उठणे इत्यादी. मग पक्की पण शिस्तीच्या कचाटयातून सुटला.
असा हा आपला पक्की त्या
दुपारी सोसायटीच्या अंगणातल्या जांभळीच्या
झाडाखाली बसून एकोणतीसाचा पाढा “पाठ करण्यांत” मग्न होता. “पाठ करण्यांत” म्हणजे वाचण्यात. पक्की कुठलीही गोष्ट “पाठ”
करत नसे. तो वाचत असे. पण आज झाडावर पक्षी इतके कलकलाट नि चिवचिवाट करत होते की
त्याच्या डोक्यांत पाढा काही केल्या शिरत नव्हता. पक्की झाडाकडे बघून ओरडला, “चूप
बसा आणि मला अभ्यास कारू द्या.” आपल्या मिस दंगा करणाऱ्या मुलांवर का ओरडतात ते
त्याला आता कळले.
तेवढ्यांत एक नवल घडले.
झाडावरचे एक वाळलेले पान ग्लायडर सारखे हवेवर हलकेच तरंगत तरंगत पक्कीच्या अगदी
समोर येऊन टपकले. त्या पानावर नखशिखांत हिरवा सूट घातलेली अळी पायलट बसली होती.
हिरवी पॅंट, हिरवा कोट, हिरवा शर्ट, डोईला हिरवी हॅट पायांत हिरवे मोजे आणि हिरवे
बूट! तिने वाकून पक्कीला नमस्कार केला. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचे नवल वाटणे
साहजिक आहे. पक्कीला ह्यांत काही नवलाई आहे असे वाटले नाही. बाबांना भेटायला
कितीतरी लोक येतात. तशी ही अळी पक्कीला भेटायला आली. त्यांत आश्चर्य कसले?
“माझे नाव हिरवी. पक्की
पक्की म्हणतात ते आपणच ना? बर झाले बाई. लगेचच भेटलात. नाहीतर लोक आपला पत्ता
देतात पण त्या पत्त्यावर कधी भेटत नाहीत. वर इथे “वैकल्पिक पत्ता असला तर द्या” ती
जागा पण मोकळी सोडतात. मग आम्ही कुठे कुठे शोधायचे? केव्हा एकदा नोकरीतून रिटायर
होऊन फुलपाखरू होते असे झाले आहे. म्हणजे सगळीकडे मनमुराद भटकायला मोकळी. आता
तुमचाच पत्ता पहाना. चिऊने मला हे पत्र दिले पण आपला पत्ता दिला नाही. आपला म्हणजे
तुमचा. मी विचारले तर म्हणते कशी, “अग कुणालाही विचार. कुणीही सांगेल.खूप फेमस आहे
तो.” अहो फेमस फेमस म्हणजे काय हो ? आधी ती तोंडातली गवताची काडी काढून टाका बरं.
वाईट सवय. तुमच्या आईने बघितले तर काय म्हणेल? ”
पक्कीने तिच्या बडबडीकडे
दुर्लक्ष केले. “हिरवे, तुझे काय काम असेल ते लवकर सांग. मला हा पाढा पाठ करायचा
आहे.”
अळी थोडी हिरमुसली. “सगळेजण
माझ्याशी असेच बोलतात. फुलपाखरू झाले की मग मात्र माझ्या पाठीमागे पळत सुटतील. आता
मुद्द्याचे. हे आपले पत्र आहे. इकडे “मिळाले” म्हणून जी जागा आहे तिथे सही करा.” पक्कीने
दाखवलेल्या जागी सही करून अळीला कागद परत दिला, “मोठी झालीस की तू फुलपाखरू नाही ,
पतंग होणार आहेस. हिरवी अळी फुलपाखरू होत नाही ती पतंग होते.” जाता जाता पक्कीने
तिला समजावले.
“ते मला माहीत नाही का?
फुलपाखरू आणि पतंग ह्यांच्यातला फरक कुणाला समजतोय इथे ?”
एवढे बोलून हिरवी आपल्या
ग्लायडरवर बसून पुन्हा हवेच्या झोक्यावर दुसरा पत्ता शोधायला निघाली. पक्कीने लिफाफा फाडून पत्र वाचायला सुरुवात
केली.
पक्की सर,
उद्या ह्याच ठिकाणी
ह्याच वेळेला आम्हाला आपला बहुमोल सल्ला देण्यासाठी आपण कृपया येण्याची तसदी
घ्यावी ही नम्र विनंती. आपल्या न्याहारीसाठी ताजी करवंदे आणि जांभळे अश्या फलाहाराची व्यवस्था करण्यात येईल, आपले कोणी मित्र
असल्यास त्यांनाही आमंत्रण आहे.
आपले नम्र,
अध्यक्ष, संपूर्ण जांभळी रहिवाशी संघ.
पक्कीने चिठ्ठी पुन्हा
एकदा वाचली. नीटपणे छानपैकी घडी करून खिशांत ठेवली. तो पुन्हा एकदा पाढा वाचण्यांत मग्न झाला.
पक्कीच्या डोक्यावरच्या फांदीवर बसलेली खारुताई ते सर्व दृश्य
काळजीपूर्वक बघत होती. पक्कीने पत्र खिशांत टाकताच तिने वरच्या फांदीवर उडी मारली.
ही बातमी अध्यक्षांच्या पर्यंत पोहोचवण्याची तिची जबाबदारी पार पाडण्यासाठी ती सरसर
पळू लागली.
दुसऱ्या दिवशी पक्की
नेहमीप्रमाणे जांभळीच्या झाडाखाली अभ्यास करत बसला होता महाराष्ट्रात मोसमी
वाऱ्यांचा पाउस कसा पडतो त्याचा धडा पक्की वाचत होता.
“नैर्ऋत्य
मोसमी वाऱ्यानांच मोसमी वारे किंवा मान्सूनचे वारे असे म्हणतात. या वाऱ्यांपासून
भारतीय उपखंडात पाऊस पडतो म्हणून या वाऱ्यांना भारताच्या दृष्टीने अनन्यसाधारण
महत्त्व आहे. हे वारे पाऊस कसा आणतात ते पाहू, नैर्ऋत्य वारे
मुख्यत: समुद्रावरून प्रवास करत भारतात प्रवेशतात. मान्सून म्हणजे दुसरे तिसरे
काही नसून समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यांपासून पडणारा पाऊस आहे,” पक्की जोरात
वाचत होता.
वर झाडावर पक्ष्यांचा
कलकलाट सुरु झाला होता. खारुताई सगळ्यांना शांत करायचा प्रयत्न करत होती. पण
तिच्या ओरडण्याने गलका अजूनच वाढला होता. तिथे चिमण्या आल्या होत्या, कोकिळा आणि
कोकीळ जोडीने आले होते, कावळे, कबूतर तर नेहमीचे,पोपटांचा तर थवाच आला होता. पोपट
आले म्हणजे मैना आल्याच की. शिपाई बुलबुल पण आले होते. आपल्या इथे शिपाई बुलबुल
आहेत हे पाहून पक्कीला थोडे आश्चर्य वाटले. एक किंग फिशर पण आला होता जवळ पास
पाण्याचासाठा नसतानाही हा किंग फिशर आला कुठून? दोन तीन घुबडे आणि वटवाघळे आली होती. वटवाघळे जरा दूर खाली डोके
वर पाय करून लटकली होती.
अखेर एक गरुड झाडावरून उतरून पक्कीच्या समोर येऊन बसला. पक्की इतक्या जवळून गरुड
प्रथमच बघत होता. इतका रुबाबदार पक्षी !
उगीच नाही तो पक्ष्यांचा राजा होता. तो पक्कीच्या समोर आला तशी सगळीकडे शांतता
पसरली. थोडे खाकरून त्याने आपला रुबाब जमवला मग बोलायला सुरवात केली, “मी पक्षीराज
गरुड. ह्या जांभळीच्या झाडाचा रहिवासी नाही. पण इथले पक्षी म्हणजे माझ्या प्रजेचा
हिस्सा आहेत. त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. म्हणून मी इथे आलो आहे. ह्या
पक्ष्यांनी मला असे सांगितले आहे की हे झाड तोडण्याचा विचार चालला आहे. हे खरं आहे
का ?”
पक्की हे असे काही
पहिल्यांदाच ऐकत होता.
पंचरंगी पोपट करवंद आणि
जांभळांचे भरलेले द्रोण घेऊन पुढे आला. ती रसरशीत ताजी
टप्पोरी करवंद आणि जांभळे बघून पक्की
खुश झाला. अशी फळं त्याने प्रथमच बघितली
होती. रोज रोज गोळ्या आणि चॉकोलेट खाणाऱ्या पक्कीला हा चेंज एकदम पसंत पडला., “हा,
आता बोला काय प्रॉब्लेम आहे.”
हिरव्या पोपटाने पक्कीला समजावून सांगण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली.
“पक्की दोन दिवसापूर्वी तुमच्या सोसायटीची मीटिंग झाली. त्यांत
पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या दामलेंनी हे झाड तोडण्याचा प्रस्ताव मांडला. काही
लोकांनी कुरकुर केली तरी पण प्रस्ताव पास झाला. सोसायटीचे चिटणीस मराठे
महानगरपालिकेच्या परवानगीसाठी अर्ज घेऊन कचेरीत जाऊन आले.”
खरं तर पक्कीला दामलेंचा खूप हेवा वाटायचा. जांभळीच्या फांद्या
त्यांच्या खिडकीच्या अगदी जवळ आल्या होत्या. खिडकीतून हात बाहेर काढला की रसरशीत
जांभळे हाताशी. त्याला का झाडाचा एवढा आकस की एकदम तोडायालाच निघाला.
“मला माहीत आहे हे सगळे
कारण त्यांचा गब्दुल नावाचा कुत्रा आहे ना
त्याने मला सांगितले. दामल्या खूप घाबरट आहे. रात्री झाडांच्या पानाची सळसळ झाली
की भीतीने त्याला झोप येत नाही. झाडाच्या फांदीवरून चोर घरात घुसून चोरी करतील अशी
स्वप्नं त्याला पडतात. एकदा वॉचमनने त्या झाडावर साप चढत होता अशी तक्रार केली.
तेव्हा लोकांनी सर्प मित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना बोलावले होते. मग तर दामल्या पार टरकला.” पोपटाने
डिटेलवार तपशील दिला.
साप म्हटल्यावर सर्व
पक्षी गलका करू लागले. ती गोष्ट खरी होती. पक्ष्यांची अंडी खाण्यासाठी कधी कधी साप
येत असावा. तेव्हा सर्वांनी गरुडाचा धावा केला होता. गरुडाने येऊन सापाचा पक्का
बंदोबस्त केला. पक्षी तेव्हाच निर्धास्त झाले पण दामल्यासाठी साप अजून होताच.
दामल्याची समजूत घालणे
जवळ जवळ अशक्य होते. कोणी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तर तो शेवटी विचारत असे,
“ठीक आहे. उद्या माझे काही बरे वाईट झाले तर तुम्ही माझ्या बायका पोरांची काळजी
घ्याल?” आधीच सगळे जण स्वतःच्या बायका
पोरांची काळजी घेताना तंग झालेले त्यात ही नसती बला कोण घेणार. असा तो सगळ्यांना
निरुत्तर करत असे.
गरुडाने पुन्हा बोलायला
सुरवात केली, “तेव्हा पक्की, आता तूच काय ते बघ रे बाबा. तूच आम्हाला ह्या
संकटातून वाचव. ह्यांची घरटी, छोटी छोटी पिल्लं, घेऊन आता हे कुठे जाणार? पावसाळा
तोंडाशी आला आहे. सगळ्यांनी आत्ताच घराची पावसाळ्यासाठी डागडुजी केली आहे.
पावसाळ्यासाठी थोडी थोडी बेगमी केली आहे. माणसं एवढी क्रूर असतात? आम्ही
माणसासांठी काय काय करतो आणि हे पहा चालले झाडं तोडायला. पक्की हे झाड आता चाळीस
वर्षांचे आहे. धरतीमातेने ह्याला आधार दिला, पावसाने ह्याला प्यायला पाणी दिले.
सूर्याने ह्याला ऊब दिली.ह्या झाडाने तुम्हाला जांभळे दिली. पण तुम्ही माणसं मात्र
हवा दूषित केल्याशिवाय जगूच शकत नाही. ही झाडे बिचारी तुम्ही दूषित केलेली हवा
शुद्ध करतात. जमीन झाडांना पकडून धरते, हे जमिनीला पकडून ठेवतात, झाडे पाउस आणतात.
झाडाच्या छायेत माणसे विसावतात तेव्हा त्यांना एसीमध्ये बसल्याचा आनंद मिळतो. काही
झाडे तर औषधी पण असतात. ह्या ह्या जांभळाचा रस म्हणे मधुमेहावर गुणकारी असतो असे
म्हणतात म्हणे! चिऊताई तुमच्या किती
पिढ्या झाल्या ह्या झाडावर?”
चिऊताईने थोडी आकडेमोड
केली, आपल्या मैत्रीणीना विचारले, “कमीत कमी बारा
तेरा. कमी नाही जास्तच झाल्या असतील!”
एक चिमणी तर रडायला लागली.
“रडू नको चिऊताई, हा पक्की काहीतरी इलाज करेलच.”
मधेच वटवाघूळांनी आपला
सूर लावला, “आम्ही पक्षी नाही. ह्या झाडाचे रहिवासी पण नाहीत. मात्र इथली जांभळी
खाण्यासाठी आम्ही दर रात्री येतो. तेव्हा हे झाड तोडायला आमचापण विरोध आहे.”
पक्कीला आईडिया आली, “मी
सोसायटीला ‘झाडांचे फायदे’ ह्या
विषयावर प्रेझेंटेशन देइन.”
सर्वज्ञानी चिऊताइने निराशेने मान हलवली. “काही उपयोग नाही. दुसऱ्या
मजल्यावरच्या कॉलेजांत जाणाऱ्या श्रीने आणि बाजूच्या सुधीने सोसायटीला प्रेझेंटेशन
दिले होते. काही उपयोग झाला नाही. लठ्ठ दामल्याच्या मठ्ठ डोक्यांत काही शिरेल तर
ना.”
“ते काहीही असो. तुमचे
काम नक्की होणार,” पक्कीने पक्ष्यांना
दिलासा दिला. सर्वांनी पंख फडफडवून आपला आनंद जाहीर केला. थॅंक्यू SSSS थॅंक्यूSSSS म्हणत सगळे निघून गेले.
दुसऱ्या
दिवशी सकाळी पक्की गोष्टीचे पुस्तक वाचत बसला होता, तेवढ्यांत
दामले घरी कांदा पोहे खायला टपकले. कांदा पोहे फस्त कारताना त्याची आणि पक्कीच्या
बाबांची चर्चा चालू झाली. विषय अगदी जिव्हाळ्याचा होता. ह्या वर्षी आय पी एल कोण
जिंकणार. धोणी बाबांचा आवडतीचा खेळाडू त्यामुळे त्यांनी चेन्नाईची बाजू लावून
धरली. तर दामल्या मुंबईचा मूळ रहिवासी त्यामुळे त्याने मुंबईची बाजू उचलून धरली.
शेवटी दोघांचे एकमत झाले की दिल्ली आय पी एल जिंकणार !
“मी
पहिल्यापासून तेच सांगतो आहे. पण तुम्ही ऐकाल तर शप्पत.” इति दामले.
बाबांनी
कपाळावर हात मारला, “अरे माझ्या देवा, दामल्या अरे माझे पहिले वाक्य काय होते?
आठव. आठव जरा. मी म्हणालो होतो ह्यावेळी दिल्लीची टीम, जबरदस्त बॅलन्स्ड
आहे.-----”
हा
पक्कीला मध्ये घुसायला चांगला चान्स होता. मी बाहेर येऊन बाबांना विचारले, “बाबा
त्याच्या आइला म्हणजे काय हो?”
पक्कीचे बाबा भयंकर खवळले. “पक्क्या
कुठे हे घाणेरडे शिकलास?” ते पक्कीच्या पाठीत धपाटा मारणार होते पण दामल्या मध्ये
पडला. त्याच्या चेहेऱ्यावर कौतुकाचे भाव होते, “माधवराव, असे मुलांशी धाकाने वागू
नये. नवीन शास्त्र असे शिकवते की मुलांच्या शंकांचे आपण व्यवस्थित समाधान करायला
पाहिजे. तुमचा प्रकाश खूप हुशार मुलगा आहे. प्रकाश, मला सांग हा शब्द कुठे ऐकलास
तू?”
“काका, काल ना मी जांभळीच्या खाली अभ्यास करत होतो तर वरून दोन
माणसे बोलण्याचा आवाज ऐकू आला. वर बघतो काय तर दोन धुरकट माणसे झाडाला लटकलेली. एक
जण दुसऱ्याला म्हणाला, ‘मी ऐकले आहे की सोसायटी हे झाड तोडणार आहे. मग आपण कुठं
जायचं?’ तर पहिला कसं म्हणतो, (मी सांगितला तो शब्द) ह्या सोसायटीच्या लोकांना मी इथे
--अजून एक तसला शब्द-- त्याने उच्चारला. तो दुसरा शब्द सांगू मी तुम्हाला?”
“पक्की, चूप बैस.” बाबा पक्कीवर ओरडले.
“आत जा पाहू. आत्ताच्या आत्ता. ताबडतोब. ह्या क्षणी.”
जाता
जाता पक्कीने दामलेचा चेहरा बघितला. त्याचा चेहरा निस्तेज आणि बघण्यासारखा झाला
होता. आधी चोर, मग साप आणि आता झाडाच्या फांदीला लटकणारी फिक्कट धुरकट माणसे.
दामलेने हळूच काढता पाय घेतला. “ येतो मी माधवराव,” असे बोलून तो सटकला. पक्कीचे
काम झाले होते. जवळ जवळ.
त्या
दिवशी दुपारी पक्की रोजच्या सारखे झाडाखाली वाचत बसला होता. झाडावर प्रचंड गडगडाट
झाला. कुणीतरी मोठ्या आवाजांत घोषणा करत होते.
“सावधान.
बावन वीर, छत्तीस जंजीर, आग्या वेताळ मसण्या वीर महाराज पधार रहे है.आस्ते कदम.
निगाह रखो!!”
झाडावरून उडी मारून
काळाकभिन्न, तेल चोपडलेले लांब केस, कपाळाला शेंदुराचा मळवट,त्यावर भस्माचे पट्टे
ओढलेला, गळ्यांत कवड्यांच्या माळा, एकाच पायांत एक तोडा कमरेला लाज
राखण्यापुरतं जरतारी काळे वस्त्र असा
ब्रह्मराक्षस पार्टी पक्की समोर उभा
ठाकला. पक्कीची भीतीने बोबडी वळली. पळून जायचे पण सुचले नाही. पाय जणू लोण्याचे
झाले होते.
पण
असा धीर सोडला तर पक्की पक्की कसला. तो उसने ओढून ताणून आणलेले अवसान एकवटून त्या
माणसाला म्हणाला, “कोण तुम्ही? इथे काय
काम आहे. बोलावू माझ्या बाबांना?” सगळ्या मुलांप्रमाणे पक्कीलाही बाबांच्या
शक्तीचा जबर अभिमान होता.
“माझे
नाव मुंजाबा, बाबांना नको बोलावू. माझे काम तुझ्याशीच आहे. मी पण ह्या झाडावर
राहतो. माफ कर काल मी मीटिंगला येऊ शकलो नाही. काल माझे मौन व्रत होते. मला
तुमच्याशीच खास काम आहे.”
मुंजाबाने पक्की समोर बसकण मारली, “मी
ऐकले आहे की पक्की,
तू फ्री-लान्स कन्सल्टिंगची कामे घेतोस
म्हणून? माझे पण एक जरुरीचे काम आहे. तुझा सल्ला पाहिजे आहे.”
“
बोला मी आपल्याला काय मदत करू शकतो?” पक्कीची भीती आता पूर्ण चेपली होती.
रडक्या
आवाजांत मुंजाबाने आपली कहाणी पक्कीला ऐकवली. त्याने नुकतीच जांभळीची एक फांदी
भाड्याने घेतली होती. तो भुताच्या योनीतून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी श्री शिव
शंकराची आराधना करत होता. त्याचा अखंड नाम जप चालला होता. नामस्मरणी तल्लीन होऊन केवळ
जांभळे भक्षण करून हा ज्येष्ठ महिना काढायचा असे त्याचे कठीण व्रत होते. पण आता जर
हे झाड सोसायटीने तोडले तर त्याची इतक्या दिवसाची मेहनत फुका ठरणार होती.
“झक
मारली आणि ह्या सोसायटीत जागा घेतली. त्या तिकडे पडक्या बखळीत काय वाईट होते? हा,
तिकडे तप करायला शांतता लाभत नव्हती. मुलं येऊन सारखी आरडा ओरड करीत क्रिकेट खेळत.
म्हणून इकडे आलो तर काय?” मुंजाबा रडकुंडीला आला होता. एक झाड आणि हजार बिमार.
पक्कीचा मेंदू विजेच्या वेगाने काम
करू लागला. “मुंजाबा, तू असं कर. आज रात्री ठीक दोन वाजता ही पाचव्या मजल्यावरची
खिडकी आहे ना. ती दामले नावाच्या भित्र्या माणसाच्या फ्लॅटची आहे. त्यावर टक टक
करायचे. म्हणायचे “दामल्या झाड पाडशील तर याद राख”. एक शिवी हासड. जर त्याने खिडकी
उघडलीच तर तुझे हे अक्राळ विक्राळ स्वरूप दाखव. बस्स इतकेच करायचं. तुझं काम झालं
म्हणून समज.”
“हे
अगदी सोप्पं आहे. फक्त सध्या मी शिवी देउ शकत नाही. व्रतस्थ आहे ना. त्या ऐवजी
दुसरं काहीतरी सुचव.”
“मग
तू असं कर. हिंदी सिनेमातले विलेन हसतात तसे हसून त्याला भ्या दाखव.”
मित्रहो ह्यापुढची गोष्ट सांगायलाच पाहिजे
का? यथावकाश सोसायटीने झाड तोडायचा विचार पुढे ढकलला. दामलेच्या गुरुजींनी
दामलेंना घराची आणि झाडाची शांती करायची सूचना केली. दामलेंनी एका सुमुहूर्तावर
जांभळीच्या झाडाची सहकुटुंब सहपरिवार यथासांग पूजा बांधली. सर्वांसाठी सोसायटीभोजन
घातले.आजूबाजूच्या सर्व सोसायटींच्या मेंबरांसाठी दुसऱ्या मजल्यावरच्या कॉलेजांत
जाणाऱ्या श्रीने आणि बाजूच्या सुधीने झाडांचे महत्व वर्णन करणारे प्रेझेंटेशन दिले.
समोरच्या सोसायटीतल्या अविनाशने ( सेकंड इयर डिप्लोमा इन जर्न्यालिझम ) ह्याचा
रिपोर्ट बनवून ( फोटोसह ) पेपरात छापून आणला,
तेव्हापासून
श्री रा. रा. दामले ह्यांना पुन्हा कधी भूतांचा, सापांचा आणि चोरांचा मानसिक त्रास
झाला नाही, अशी ही आमच्या पक्कीची करामत.
Comments
Post a Comment