ते लोक
“लोचा” मी जेव्हा प्लांट मध्ये काम करत असे त्यावेळची ही कथा आहे. परब माझ्या शिफ्टमध्ये काम करत असे. माझे आणि परबचे एक अतूट नाते होते. परब जो एकदा माझ्या शिफ्ट मध्ये आला त्यानंतर तो कधीही दुसऱ्या शिफ्टमध्ये गेला नाही. कसं असतना कि ऑपरेटर आणि शिफ्ट इंजिनिअर हे अधून मधून बदलत असतात. सर्व साधारणपणे कोण ऑपरेटर कामचुकार आहे, कोण शिफ्टमध्ये झोपा काढतो, कोण ड्युटी चुकवून संडासात जाऊन झोपतो आणि कुणाची अक्कल गुढग्यात आहे ह्याची शिफ्ट इनचार्जला चांगली कल्पना असते. पण आमचा हा प्लांट असा डिझाईन केला होता कि प्लांटच्या कुठल्याही कोपऱ्यात माशी जरी शिंकली तरी सेन्ट्रल कंट्रोलरूम मध्ये अलार्म येणार. ही थोडी अतिशयोक्ति झाली म्हणा. सांगायचा मुद्दा हा कि जुन्या प्लांट्स मध्ये ऑपरेटरहा महत्वाचा दुवा असे, तसा तो ह्या प्लांटमध्ये नव्हता. म्हणून कोणी शिफ्ट इंजिनिअर ऑपरेटरबद्दल आग्रही नसत. कुणीही चालेल असा अटिट्युड असे. कुणीही चालेल पण हा परब नको ह्याबद्दल, का कुणास ठाव, सगळ्यांचे एकमत होते. माझा अपवाद सोडून. परबबद्दल लोकांना एव्हढी अनामिक घृणा का वाटायची हे कोडे मला कधी सुटले नाही. नंतर हळू हळू मला समजायल...